Home पर्वती...वूमेन वर्ल्ड तुमची आमची चहावाली येतेय राजकारणात..

तुमची आमची चहावाली येतेय राजकारणात..

68

नवी दिल्ली : मागील काही वर्षांपासून चहा व्यावसायिकांना राजकारणात चांगले दिवस आल्याचे सांगण्यात येते. आता उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील चहा विक्रीचा व्यवसाय करणारी मीनाक्षी नामक 35 वर्षीय महिला ग्रामपंचायत निवडणुकीत उतरली आहे.
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांनी आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात चहा विकण्याचे काम केले आहे. सन 2014 मध्ये त्यांनी पहिल्यांदा पदाची शपथ घेतल्यावर सर्वत्र त्याची चर्चा झाली होती. असे असले तरी त्यांची ही गोष्ट अनेक देशवासीयांना प्रेरणा देणारी ठरल्याचा दावा केला जातो. आहे. आता मीनाक्षीही त्यांच्याकडून प्रेरणा घेत निवडणूक रिंगणात उतरली आहे. विशेष म्हणजे तिने सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे.
चोरावाला या गावातून मीनाक्षी अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या जागेवरून निवडणूक लढवत आहे. तिच्या गावात साधारण: सात हजार मतदार आहेत. नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन योजनेअंतर्गत मीनाक्षीला तीन वर्षांपूर्वी चहाचा स्टॉल उभारण्यासाठी मदत मिळाली, तेव्हापासून ती हा व्यवसाय करत आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रवासामुळे प्रेरित झाले आहे. त्यांच्या रूपाने एक चहावाला पंतप्रधान झाला आहे. मग माझ्यासारखी ‘चायवाली’ गावाची प्रमुख का होऊ शकत नाही, असा प्रश्न मीनाक्षीने विचारला आहे. मीनाक्षी अपक्ष म्हणून या निवडणुकीला उभी राहिली आहे. आपल्याला कोणत्या राजकीय पक्षाचा पाठिंबा नसला तरी गावकरी आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास मीनाक्षी व्यक्त करते.

दुसरीकडे तिचा पती ज्ञानसिंग मेरठ विद्यापीठाचा पदवीधर असून, मजुरीचे काम करत असतो. आपल्या पत्नीबाबत तो म्हणतो, की 2015 मध्ये गावकºयांनी माझ्या पत्नीला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिले. आताही ते नक्कीच आम्हाला मतदान करतील़ गावकºयांचा विश्वास पाठीशी असल्यामुळेच मीनाक्षीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडून आल्या गावाचा विकास करू,अशी ग्वाही तिने दिली आहे.

दरम्यान, महिलांना सक्रिय राजकारणात कायद्याने संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीही आता कुठे लोकांची त्यांच्याबद्दलची मानसिकता बदलू लागली आहे. अनेक गावांमध्ये महिलांनी सरपंच म्हणून किंवा अन्य पदांवरही चांगली कामगिरी करून दाखवली आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्येही महिलांचा सहभाग वाढू लागला आहे. मीनाक्षीसारख्या अधिकाधिक महिला राजकीय क्षेत्रात येतील,यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here