Home उपराजधानी नागपूर बांधिलकी जोपासणारी पिढी घडावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बांधिलकी जोपासणारी पिढी घडावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

23

नागपूर : न्यायव्यवस्था हा लोकशाही व्यवस्थेचा अतिशय महत्त्वाचा स्तंभ आहे. तो मजबूत करण्यासाठी उत्तम दर्जाच्या विधी शिक्षणाची आवश्यकता असून येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठ त्या दृष्टीने महत्त्वाचे आणि जागतिक दर्जाचे ठरणार आहे. राष्ट्रीय दृष्टीकोन आणि चारित्र्य विकसीत करण्यासाठी हे विद्यापीठ निश्चितच महत्त्वाचे योगदान देईल, असा आशावाद देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आज येथे व्यक्त केला.

शहराजवळच्या वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या [ MAHARASHTRA NATIONAL LAW UNIVERSITY NAGPUR ] शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश तथा या विद्यापीठाचे संस्थापक कुलपती शरद बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, उर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे, विद्यापीठाचे कुलगुरू  प्रा.डॉ.विजेंद्रकुमार आदी उपस्थित होते.

भाषणाच्या प्रारंभी विधी विद्यापीठाच्या निर्मितीमागचा ओझरता प्रवास सरन्यायाधीशांनी मांडला. नागपूर शहराला असलेली उत्तम विधिज्ञांची गौरवशाली परंपरा पाहता इथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ असावे, अशी येथील नागरिकांची इच्छा होती. आज त्यांची स्वप्नपूर्ती होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून न्या.बोबडे म्हणाले, विद्यापीठाची शैक्षणिक इमारत हा आधुनिक वास्तुकलेचा सुंदर आविष्कार आहे. या इमारतीमधील वर्गखोल्यांचे बांधकाम हे जागतिक दर्जाचे आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा या क्लासरुम आहेत. उत्कृष्ट दर्जाचे पर्यावरणपूरक असे या इमारतीचे बांधकाम विद्यार्थ्यांच्या आकांक्षाना पल्लवीत करणारे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. न्यायमूर्ती भूषण गवई व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता यांनी विधी विद्यापीठाच्या निर्मितीसाठी केलेल्या प्रयत्नांचा आवर्जुन उल्लेख सरन्यायाधीशांनी केला.

न्यायमूर्ती भूषण गवई हे या विधी विद्यापीठाचे कुलपती असतील, असे सरन्यायाधीशांनी जाहीर केले. ते म्हणाले, येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठ हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. या विद्यापीठातून राष्ट्रीय दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होणार आहे. कारण देशभरातील प्राध्यापक आणि विद्यार्थी येथे अध्ययन-अध्यापन करणार आहेत. इथे प्रादेशिकता, संकुचितता यापेक्षा पुढे जाऊन राष्ट्रीय चारित्र्य असलेले विधिज्ञ घडतील. ऑक्सफर्ड- हॉर्वर्ड-केंम्ब्रीज या विद्यापीठाच्या तोडीचे विद्यापीठ ठरणार असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. या विद्यापीठाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे न्यायशास्त्र अभ्यासक्रमाचा समावेश. यामुळे  भारतातील या बाबतची समृद्ध ज्ञान परंपरा विद्यापीठाशी जोडली गेली आहे. त्यातून तयार होणाऱ्या भावी पिढ्या निश्चितच धन्यवाद देतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

कायद्याची चौकट पाळणाऱ्या महाराष्ट्राला न्यायदानाची मोठी आणि आदर्श परंपरा लाभली असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [ CM UDHHAV THAKARE ] म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातही न्यायदानाची परंपरा अत्यंत आदर्शवत होती. रामशास्त्री प्रभुणेसारख्या न्यायदात्यांनी ती पुढे चालवली. लोकशाहीत चार स्तंभाची भूमिका महत्त्वाची असते. त्यातून लोकशाहीला मजबूत आधार मिळत असतो. लोकशाहीचे छत समर्थपणे तोलून धरणारे वकील, विधिज्ज्ञ या विद्यापीठात घडावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here