कोरोना संकटात सकारात्मक विचार बाळगा…

उपराजधानी नागपूर

नागपूर : कोरोनामुळे उद्भवलेल्या या संकटामुळे प्रत्येकाच्याच मनात भीतीचा संचार आहे. अनेकांमध्ये तर कोरोनाच्या भीतीपेक्षा रुग्णालयात बेड मिळणार नाही, हीच भीती जास्त आहे. अनेक जण चिंतेनेग्रासित आहेत. माणसाच्या मनाच्या भीतीचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो. यापासून कसे दूर राहायचे हे सर्व आपल्या मनावर आहे. यासाठी सुवर्ण ५ (गोल्डन फाईव्ह)चा अंगीकार आहे. सुवर्ण ५ म्हणजे, चांगली व पुरेशी झोप, सकाळी नियमित व्यायाम, प्राणायाम व योगा, व्यसनांपासून दूर राहणे आणि विवेकी विचार बाळगणे व ते पसरविणे या बाबींचा प्रत्येकाने अंगीकार करून सकारात्मक विचार बाळगावे, असा सल्ला नागपूर मानसोपचारतज्ज्ञ सोसायटीचे अध्यक्ष डॉ.सुशील गावंडे आणि एन.के.पी.एस.आय.एम.एस. आणि लता मंगेशकर हॉस्पिटलचे मानसोपचार विभागप्रमुख प्रा.डॉ. सुधीर भावे यांनी ‘कोव्हिड संवाद’मध्ये दिला.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या [ I M A ] संयुक्त विद्यमाने व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेने सुरू करण्यात आलेल्या ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात सोमवारी (ता.१९) डॉ. सुशील गावंडे आणि प्रा.डॉ.सुधीर भावे यांनी ‘कोव्हिडची भीती घालविण्याचे उपाय’ या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी नागरिकांमार्फत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देउन त्यांनी शंकांचे निराकरण सुद्धा केले. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक वास्तविक समस्या निर्माण झालेल्या आहेत. आर्थिक अडचण, कौटुंबिक वाद अशाही समस्यांनी अनेकजण त्रस्त आहेत. उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे काळजी व चिंता वाढली आहे. त्यामुळे अनेकांना निद्रानाशाचा त्रास होत आहे. आपल्या मनातील भीतीचा थेट परिणाम आपल्या प्रतिकारशक्तीवर पडतो. ताण-तणावामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. मनावर ताण येतो तेव्हा शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात, मानसिक व शारीरिक प्रभाव पडतो. भीतीमध्ये असल्यास शरीरातील प्रतिकारशक्ती ४८ तासापासून कमी व्हायला लागते. आपल्या मनातील भीती आपल्याला गंभीर आजाराकडे नेते. भीतीमुळे हृदयाचे ठोके वाढतात त्याचा परिणाम ऑक्सिजनवर होतो. त्यामुळे भीती बाळगणे सोडा. भीती कमी करण्यासाठी काही गोष्टी करणे महत्वाचे आहे. सोशल मीडियावरील संदेशांवर विश्वास ठेवणे सोडा, ते वाचू नका, पसरवू नका. याशिवाय न्यूज पाहणे बंद करा, वर्तमानपत्र वाचा. मनावर नियंत्रण ठेवा, आपल्या मनात कुठले विचार येउ द्यायचे अथवा नाही हे आपल्याच हातात आहे. त्यामुळे सकारात्मक रहा, असेही प्रा. डॉ. सुधीर भावे व डॉ.सुशील गावंडे यांनी सांगितले.

विचार सकारात्मक [ POSITIVE THINKING ] व विवेकी ठेवले तर ब-याच प्रमाणात आपल्या व्याधींवर नियंत्रण राहते. सकारात्मक विचार ठेवल्यास भावना सकारात्मक राहतात व आपली वागणूकही सकारात्मक राहते. कोरोना झाला तर मी मरणार ही भावना मनात ठेवण्याऐवजी कोरोनामधून बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के आहे. त्यामुळे मी ९८ टक्के सुरक्षित आहे ही भावना मनात ठेवा. घरात रहा, आपले छंद जोपासा, स्वत:ला गुंतवून ठेवा. आपली दिनचर्या ठरवून घ्या. त्यामुळे राहण्यास मदत होते, असाही मोलाचा संदेश प्रा. डॉ. सुधीर भावे व डॉ.सुशील गावंडे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *