Home उपराजधानी नागपूर रिकामटेकडी मंडळी ताळ्यावर येत नसल्याने कडक लॉकडाऊन लागू

रिकामटेकडी मंडळी ताळ्यावर येत नसल्याने कडक लॉकडाऊन लागू

77

मुंबई / नागपूर : 14 एप्रिलपासूनची संचारबंदी आणि त्यापूर्वीचा आठवड्याच्या लॉकडाऊननंतरही राज्यातील काही रिकामटेकडी मंडळी ताळ्यावर येत नसल्याने आता सरकारने राज्यात 22 एप्रिल रात्री 8 वाजतापासून कडक लॉकडाऊन लागू झाला आहे. त्याबद्दल नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे.

संचारंबंदी काळातही रुग्णसंख्या आणि मृतकांची संख्या कमी होत नसल्याने मागील दोन दिवसांपासून कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक होत होत्या. राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा अशी चर्चा बैठकीत झाली होती. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून निवडा, असा सल्ला दिला होता. त्यानंतर राज्यातील कोरोनाचा संसर्ग पाहता लॉकडाऊनचा पर्याय निवडण्यात आला आहे. राज्य सरकारकडून राज्यात 1 मे सकाळी 7 वाजेपर्यत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.

काही नियम असे
– जिल्ह्याअंतर्गत असलेली वाहतूक बंद
– खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करता येणार नाही.
– मुंबईतील लोकल सेवा अत्यावश्यक सेवा
– सरकारी कर्मचारी, डॉक्टर नर्सेस, अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांना परवानगी
– सर्व सामान्यांना लोकलने प्रवास नाही.
– लग्न सोहळ्यांना 25 जणांसह दोन तासांची मर्यादा

याशिवाय किराणा दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री,भाजीपाला विक्री,फळे विक्री,अंडी,मटण, चिकन, मासे विक्री, कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने, पशुखाद्य विक्री- सकाळी, बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने तसेच, येत्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते 11या वेळेत सुरू असतील.

बेपर्वाई आणि निर्लज्जपणा
संपूर्ण राज्यात संचारबंदी असताना अनेक महाभाग (यात पुरुष, महिला, तरुण-तरुणी) यापूर्वी रस्त्यांवर फिरत असल्याचे दिसून आले आहे. पहाटे आणि रात्री जेवणानंतर शहरातील अगदी मुख्य रस्त्यांवर फिरत असल्याचे ‘अभिवृृत्त’ प्रतिनिधीला आढळले. एक महाभाग दोन-दोन कुत्र्यांसह नागपुरातील मानेवाडा रिंगरोडवर फिरत असल्याचे दिसून आले़ धक्कादायक म्हणजे दोन तरुण आपल्या बोटात मुखावरण (मास्क) अडकवून फिरत होते. एक जोडपे आपल्या पाच वर्षांच्या चिमुकल्यासह याच रिंगरोडवर पाहावयास मिळाले़ एक तरुणी आपल्या आईसोबत फिरत होती़ या सर्वांना कोरोना संकटाची जाणीव नसावी काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय मेडिकल चौकाशेजारच्या एका मैदानात काहीजण बॅडमिंटन खेळत असल्याचे या दरम्यान पाहावयास मिळाले. शासनाने मैदाने, बगिचे बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतरही याठिकाणी गर्दी होत आहे, हे विशेष.