Home अनुपमा... महिला विश्व सुंदर नृत्य अविष्काराच्या अभिनयसंपन्न जयाप्रदा…

सुंदर नृत्य अविष्काराच्या अभिनयसंपन्न जयाप्रदा…

151
  • लेखिका अभिलाषा

 

जयाप्रदा…भारतीय चित्रपटक्षेत्रातील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री. जितेंद्र, धर्मेंद्रपासून संजय दत्तपर्यंत नायिका म्हणून अभिनय साकारला. मोठी प्रसिद्धी मिळवलेल्या जया यांचे वैवाहिक जीवन मात्र प्रचंड गुंतागुंतीचे राहिले. प्रेमविवाह करूनही जयाप्रदा यांना कधीच पत्नीचा दर्जा मिळाला नाही आणि आई सुद्धा होऊ शकल्या नाहीत. जयाप्रदा यांच्या जन्म आंध्रप्रदेशमधील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे खरे नाव ललिता राणी आहे. चित्रपटात काम करायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी हे नाव बदलून जयाप्रदा असे केले. त्यांनी तेलुगू चित्रपट भूमिकोसममधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती; परंतु करिअरला बॉलिवूडमध्येच आकार मिळाला. यात त्यांनी आपला अतिशय सुंदर असा नृत्य अविष्कार सादर केला होता.

सन १९७९ मध्ये के. विश्वनाथ यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘सरगम’ चित्रपटातून जया यांनी ‘बॉलिवूड एंट्री’ केली. (यातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचे नामांकन मिळाले होते.) सन १९८२ पर्यंत त्यांना हिंदीतील उच्चार जमत नव्हते; परंतु के. विश्वनाथ यांच्या कामचोरमध्ये त्यांनी यात बºयाच प्रमाणात यश मिळवले होते. यानंतर प्रसिद्ध मिळाली ती १९८४ साली आलेल्या तोहफामधून. यानंतर त्यांनी धर्मेंद्र, ऋषी कपूर, राकेश रोशन, जितेंद्र, मिथुन चक्रवर्ती, संजय दत्त, शशी कपूर, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, अमिताभ बच्चन आदींची नायिका म्हणून भूमिका साकारल्या. मुख्यत्वे जितेंद्र यांच्याशी त्यांची चांगली जोडी जमली़ या दोघा कलाकारांनी अनेक यशस्वी चित्रपट दिलेत़ यात ‘संजोग’ हा चित्रपट तुफान चालला़ जयाप्रदा यांचे खासगी जीवन अत्यंत रहस्यमय आणि रोमांचक राहिले. त्यांनी १९८४ मध्ये निर्माता श्रीकांत नाहाटा यांच्याशी प्रेमविवाह केला. लग्नाआधी जया आणि श्रीकांत यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली. कारण श्रीकांत विवाहित होते. जया आपल्या प्रेमासाठी श्रीकांतच्या दुसºया पत्नी झाल्या. मात्र, त्यांना तो दर्जा कधीच मिळाला नाही. लग्नानंतरही बरेच वाद झाले. कारण श्रीकांत यांनी जयाशी लग्न करण्याआधी त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. त्यांना पहिल्या पत्नीपासून तीन मुलं आहेत. मुल न झाल्याने जया यांनी त्यांच्या बहिणीच्या मुलाला दत्तक घेतले आहे.

काही चित्रपट असे : हैसियत, न्याय अन्याय, मकसद (१९८४), नया कदम, आवाज, पातालभैरवी, होशियार, जबरदस्त, ऐसा प्यार कहाँ, मैं तेरा दुश्मन, कामचोर, मर्दाेवाली बात, स्वर्ग से सुंदर, आखरी रास्ता, औलाद, मजाल, मेरा साथी, वीरता, फरिश्ते, इंद्रजित, रज्जो, शराबी (१९८४), मैं आवारा हूं, मेरा फैसला, हकीकत आदी. याशिवाय त्यांनी तेलुगू, कन्नड, बंगाली, तामिळ आदी चित्रपटांतूनही विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्या अभिनयात कधी ही कमी पडल्या नाहीत.

गाजलेली गाणी
– झू…झू…यशोदा का नंदलाला (संजोग)
– डफलीवाले डफली बजा (सरगम)
– दे दे प्यार दे (शराबी)
– धीरे धीरे सुबह  (हैसियत)
– अपना घर है (स्वर्ग से सुंदर)
– पतझड सावन बसंत बहार (सिंदूर)
– चुम्मा चुम्मा (पाताल भैरवी)
– प्यार का तोहफा तेरा (तोहफा) आदी…

राजकीय कारकीर्द : जयाप्रदा यांची राजकीय कारकीर्द अत्यंत चढउतरणीची राहिली आहे. सन १९९४ मध्ये दिवंगत मुख्यमंत्री तसेच चित्रपट अभिनेते एनटी रामाराव यांच्या आग्रहावरून त्यांनी तेलगू देसम पार्टीत प्रवेश केला. एनटीआर मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. एनटीआर यांची तब्येत बिघडली तेव्हा पक्ष विभागला गेला. चंद्राबाबू नायडू यांनी एका गटाचे नेतृत्व केले़ जयाप्रदाही त्यांच्यासोबत गेल्या. पक्षाच्या महिला आघाडीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. काही काळानंतर नायडू यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी मुलायम सिंह यांच्या समाजवादी पार्टीत प्रवेश केला. मात्र, सन २०१० मध्ये त्या अमर सिंह यांच्यासोबत पक्षातून बाहेर पडल्या. सन २०११ मध्ये दोघांनी राष्ट्रीय लोकमंच नावाचा पक्ष स्थापन केला. सन २०१२ मधील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४०३ जागांपैकी ३६० जागांवर उमेदवार उभे केले़ मात्र, एकही जागा जिंकता आली नाही़ सन २०१४ मध्ये जयाप्रदा यांनी अजित सिंह यांच्या राष्ट्रीय लोकदलात प्रवेश केला. यानंतर सन २०१९ मध्ये त्यांनी भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवली़ उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे आझम खान यांच्याकडून त्या पराभूत झाल्या. (छायाचित्रे : इंटरनेट)

 

*****