Home साहित्य-संस्कृती सांजबेला...एक कथा नवरा बायकोची सांजबेला कथा, कम्मोचा माहेरदौरा (भाग एक)

नवरा बायकोची सांजबेला कथा, कम्मोचा माहेरदौरा (भाग एक)

70

लेखक
संजय मुंदलकर

 

दारावरची बेल किती वेळापासून वाजत होती, कुणास ठाऊक? तिच्या आवाजाचा मार सहन न झाल्यानं माझे डोळे खाडकन् उघडले़ रात्री बºयाच उशिरा झोपल्यानं ते जरा जडच वाटत होते़ महत्प्रयासांनी उघडलेल्या डोळ्यांनी घड्याळात बघितलं, आठ वाजायला आलेले़ दुधवाला असेल म्हणून भांडे घेण्यासाठी स्वयंपाकघराचं दार उघडलं़ शेगडीजवळील पातेलं घेऊन निघालो तर मध्येच डायनिंग टेबलशी धडपडलो़ हा झोपेचाच परिणाम होता..़ हातात भांडं कसं, हे लक्षात आल्यावर समोरील दाराकडं निघालो़ या दरम्यान दुधवाल्याचं बेल वाजवणं सुरूच होतं़
‘अरे, आलो, आलो…’अशी मी त्याला साद दिली़; पण त्याच्यापर्यंत आवाज पोहोचला नसावा़ दार उघडताच त्यानं खिक्कन दात दाखवले़
‘‘सायेब, नमस्काऱ कवापासून बेल वाजवून राह्यलो़ तुमच्या घंटीनं बाजूचे लोटे सायेब उठले अन् लोटा घिवून बाहीरकडंबी गेले़ तुमी मातर आपले घोरतच! जरा लौकरश्यानं उठत जा़’’ तो म्हणाला़
‘‘लोटा घेऊन गेले म्हणजे….’’ मी विचारलं.
‘‘अवो सायेब, त्यांच्या नव्या घराचं काम सुरू न्हायं का…म्हून शानं त्यांना सध्या बाहीर जावं लागतं उरकाया़ नवी वस्ती असली का जागाबी असते मोठी उरकाया…’’
हा दुधवाला ना नको त्यावेळी काहीही बोलतो़ कधी कुणाची पट्टी काढेल सांगता येत नाही़ अशा बाबीमुळं त्याचा मला बराचदा राग येतो़
‘‘अरे, रात्री उशिरा झोपलो़ त्यामुळं जाग नाही आली लवकर.’’ जांभई देत मी उत्तरलो़
‘‘ सायेब, रातच्याला घेतली बितली नायी ना! नायी म्हटलं़़़ बाईसायेब घरी न्हाईत़ म्हूनशानं ईचारलं़’’ त्याची खी खी सुरूच होती.
क्षणभर मी त्याच्याकडं बघतच राहिलो़ मात्र, त्याच्या ह्या नसत्या चौकशीनं संतापलो़ मी आजूबाजूला पाहात म्हटलं, ‘‘ऐ सोम्या, इथंतिथं फालतू डोकं खूपसू नकोस़़़आणि जरा दुधाच्या क्वॉलिटीकडं लक्ष दे़ बेंबळेच्या पाण्यानं तुझ्या घराकडं धाव घेतली काय? आजकाल दुधात नुसत्या पाण्याचं दर्शन होताना दिसतं.पाण्यावर दूध तरंगल्यासारखं दिसते.’’

 

‘‘दुधाची कालिटी चांगलीस्स हाये सायेब; पण काय करणार, शिमग्याचे दिस हायीत ना! म्हशीबी पान्यात जरा जास्तीस्स हुंदडतात़ अन् हलेबी तरास देते त्याईले़ मंग पान्यात नुसता धुम्मा सुरू असतो बगा़ सकायी पान्यात बसते तं सांजच्यालेस्स उठते़ करणार काय त्याईलेबी पानी पाह्यजे का नायी? म्हून जरा मायापातय झाली असल़’’ तो आपली बाजू मांडत होता़
‘‘अरे सोम्या़ मायापातळ नाही़ दूध पातळ झालंय़ आणि मी तुझ्या म्हैशींच्या धुम्माबद्दल नाही विचारत़ फक्त दुधात पाणी नकोस घालू इतकंच! तुला पैसे मिळते ना बरोबऱ मग हे धंदे कशाला करतोस़ उद्यापासून फक्त दूध आणि फक्त दूधच मिळायला पाहिजे. त्याच्यासोबत पाणी नको़ पुढील सहा वर्षे तुला भाव वाढवून मिळणार नाही़’’ मी जरा रागावूनच बोललो़ ‘‘लेका, लहानपणी गावात नुसतं धारोष्ण दूध प्यालो मी़ बाबा तिकडं दूध काढायचे आणि बरोबर एक ग्लास ताजं ताजं दूध प्यायचो, पाण्याच्या एका थेंबाविना…तू मला दुधाच्या क्वॉलिटीचं सांगू नकोस़ बालपण खेड्यात घालवलं ती गायीगुरांच्या संगतीत़़क़्कायं! ’’
मला एकदम बाबांनी दोहलेल्या आमच्या हरिणी गाईची आठवण आली.
‘‘सायेब, काय बोलताय? दुधात पानी शेक्येच नायी़ गंगेच्या भोलेनाथाची शपथ घिऊन सांगतो़ बेईमानी करनार नायी सायेब़ तिसºया पिढीचा धंधा सुरू हाये़ उन्हायाचे दिस हायीत ना! म्हसाडा तलावाच्या पान्यात लयी टाईमलोक आराम करत्यात़ बस्स!’’ असं म्हणत ही़़़ही करीत तो निघून गेला़
‘मुर्ख लेकाचा’असं पुटपुटत मागे वळलो तर एक पाय वर्तमानपत्रावर पडला़ ‘सरकार कोसळणार’ असे शीर्षक बघताच माझ्या संतापात आणखी भर पडली़ ‘ह्या मुर्खांना आणखी कोणतं काम आहे़ लेकाचे जनतेला लुटत आहेत़ त्यांना काय लोकांच्या सुख-दु:खाशी सोयरसुतक! इथं माझा संसार कोसळायला लागला नि हे पांढरे बगळे देश बुडवण्यासाठी चोचा मारतात़ इकडून तिकडं सारे पक्ष एकाच जातीचे़’ मी स्वत: शीच पुटपुटलो़

बरोबर आहे ना ! अर्धा देश गरिबीत़, बेरोजगारीत खितपत पडला असताना हे लेकाचे आपल्या तुंबड्या भरत आहेत़ स्वार्थी आणि संधीसाधू राजकारणी लोकं देशावर मध्यावधी निवडणूक लादू पाहात होते़ त्यांना जनतेच्या कोणत्याही समस्यांशी देणंघेणं नव्हतं़ भ्रष्टाचार, बेरोजगारी, गुन्हेगारी दिवसागणिक वाढत होती़ भरीस भर भारनियमनाचा भडीमाऱ,अन्नधान्य, स्वयंपाकाचा गॅस, भाजीपाला आदींच्या भावात होणारी वाढ ही सर्वसामान्याच्या मानगुटीवर बसली होती़ दुसरीकडं ही बाब माझ्यासारख्या व्यक्तीसाठी मोठी संवेदनशील होती़ शेवटी आम्ही नोकरीवाले ना!

आपण कसला विचार करतोय, हे लक्षात आल्यावर सकाळी सकाळी डोकं भणभणायला लागलं़ पुढं होत मी टीव्ही संच सुरू केला़ तिथंही तोच तमाशा होता़ कुठल्याशा चॅनलवर दोन प्रमुख राजकीय पक्षाचे उपटसुंभ नेते दोन वर्षांनंतर येणारी निवडणूक आत्ताच घेण्याबाबत मत मांडत होते़ तर त्या चॅनलची नवशिकी अँकर त्यांना मुर्खांसारखी प्रश्न विचारत होती़ ते दोघंही एकमेकांवर कुरघोडी करीत होते़, अधूनमधून गुरगुरतही होते़ आपलाच पक्ष सत्तेवर येवू शकतो, असा बेगडी आत्मविश्वास दाखवत होते़ नंतर मी एक-दोन शिव्या हासडत चॅनल बदलविले़ स्क्रीनवर ‘आस्था’ नंतर ‘संस्कार’ उमटले़ त्याबरोबरच मला संसाराची आठवण झाली़ सोबत प्राणप्रिय बायको कुमुदिनी उपाख्य कम्मो (लाडात येऊन) उपाख्य कम्मोबा ( इथं अति लाडानं) आणि आमचे वारसदार मास्टर चिंटूचीही! क्षुल्लक गोष्टीवरून वाद करून ती माहेरी वर्ध्याला निघून गेली होती़ मोबाईलवरून बोलायचं तर दूरच, ह्या पठ्ठीनं साधा व्हॉट्स अप किंवा एसएमएसही केला नव्हता़ आमचे चिरंजीवच काय ते रात्रीच्या वेळी बोलायचे़

तेवढ्यात रिंग वाजली़ बेडरूमकडं निघालो़ कम्मोचा असेल, असं वाटलं असतानाचा भ्रमनिरास झाला़ कारण स्क्रीनवर अनोळखी आकडे दिसले़
‘‘हॅलो, संजय दिघीकऱ़़’’ मी परिचय दिला़
‘‘सुप्रभात!’’ पलिकडला आवाज.
‘‘सुप्रभात़़़ कोण बोलतायं?’’ मी जांभई देत विचारलं़
‘‘अरे सँडी, मी उमेश़़़विसरलास काय? काल सायंकाळी सोबत बसलो नव्हतो काय?’’
माझ्या कार्यालयातील सहकारी उमेश बेलपात्रे होता़(आवाजावरून ओळखलं त्याला.)
‘‘उम्या, तू होय लेका़ नवीन आकडे पाहून विचारात पडलोय मी! ़़़आणि काय रे काल सायंकाळी बसलो याचा अर्थ काय? स्थळ-काळाचं भान तुला कधीपासून व्हायला लागलं. आॅफिसमध्येच बसलो होतो ना आपण! कधी सायंकाळी उशिरापर्यंत दररोजच बसतो़ त्यात असं विशेष काय? कुणी एखादा भलताच अर्थ काढेल़ त्यातल्या त्यात तुझी वहिनी नाही घरात़़़नसती झंझट नको लावू माझ्यामागं़ बरं जावू दे ते़ सकाळी सकाळी काय म्हणतोस?’’
‘‘अरे़, बायकोच्या सेलवरून बोलतोय़ मी मोबाईलचं बिल भरलंच नाही़ सध्या खूप तंगी चालली रे़ महिना भरायला आला की माझी धडधडच वाढते़’’
उम्याचं रडगाणं सुरू झालं़ आता तो माझे कान पकवणार, हे निश्चित होतं़ तेव्हा ती म्हटलं, ‘‘अरे, स्वत:ला सांभाळ बाबा़ नाही तर भलतंच काही व्हायंच़ आणि तुला कसली रे तंगी? खोटारड्या..़ आँ़़़बायकोला नवा मोबाईल घेऊन दिलाय तीस हजाराचा अन् सांगतोय की तंगी. दर रविवारी कोंबडीची तंगडी खाण्यासाठी तुझं पोट शनिवारी रात्रीपासून कोक.़क़ोक करायला लागते. नुसते नाटकं आहेत लेका तुझे… ’’
‘‘सँडी, असं काही म्हणू नकोस रे! एकटाच आहे मी़ काही बरं वाईट झालं तऱ़़’’
हा उम्या असाच आहे़ पुढं काही बोललो असतो तर त्यानं नक्कीच हुंदके ऐकवले असते़ इतका ‘सेन्सेटिव्ह’ प्राणी मी आजपर्यंत बघितलाच नाही़
‘‘बघ उम्या, तू आपल्या मायबापांना आणि बायको पोरांना एकटाच आहे, हे माहित आहे मला़ जगाच्या कोणत्याही कोपºयात जा, कोणताही नवरा आपल्या बायको एकटाच असतो आणि पोरांनाही एकटाच बाप असतो. उगीच सकाळी-सकाळी तुझी भूपाळी ऐकवू नकोस़ काय झालं की काही हवंय ते थोडक्यात सांग़’’ मी रागात म्हणालो़
‘‘सॉरी सँडी,़़़ अरे, मी वहिनी आली की नाही ते विचारत होतो़ जेवणाचे हाल होतात रे तुझे, ते पाहावत नाही मला! बाय द् वे़़़आज तरी आॅफिसला लवकर ये़ नाही तर कालच्या सारखा ‘लेटमार्क’व्हायचा़’’ उम्यानं मोलाचा सल्ला दिला, निदान त्याच्या पुरता तरी!
‘‘काय रे, हाल जेवणाचे होत नाहीत, माझे होतात. तुला काही पाहावत नाही, तर कधी बोलावसं का जेवायला. आणि एकदा प्रमोशन होऊ दे़ मग बघतो त्या चमनगोट्याला़..कसा लेटमार्क लावतो ते…’’ मी काहीशी छातीशी फुगवत उत्साहात म्हणालो़
‘विनोद तेलपाणे’असं आमच्या बॉसचं नाव होतं़ मात्र, डोक्यावर केसांची तीव्र टंचाई असल्याने कार्यालयातील सहकाºयांनी त्यांचं नामकरण ‘चमनगोटे’ असंच केलं होतं़ शिवाय त्यांचं डोकं तेल-पाण्याचं मिश्रण लावल्यासारखं चकाकून दिसत़
‘‘बरं सँडी, स्वयंपाक तुच करतोस का? की कुणी ठेवली तू़़़’’
‘‘ब्बे उम्या, काय बोलतोस काय तू़ भानावर आहेस का तू? की सकाळी कपात भांग होती दारू? ठेवली म्हणजे काय ? म्हणजे बायको माहेरी काय गेली, म्हणून मी दुसरं लग्न करणारा वाटलो की काय तुला़़़’’ मी जरा मोठ्या आवाजातचं उम्याला ‘म्या़़़म्या़़़’ करायला लावलं.
‘‘ अरे सँडी, मला़़़म्मला तसं काही म्हणायचं नव्हतं.़़’’

आता हा उम्या पुन्हा माझ्या जखमांवर मीठ चोळू पाहात होता़ त्याला वेळीच आवर घालणं गरजेचं होतं़ नाहीतर त्याच्या कथा संपणार नव्हत्या़
‘‘ अरे मला कामवाल्या बाईबद्दल बोलायचं होतं़’’
‘‘मग सरळ बोलायचं ना! चक्क कुणी ठेवली का तू़़़असं विचारतोस…माझ्या घरात तिघांचं काम निघतातच किती? आणि तुझं सासर नागपुरातलंच. त्यामुळं तुला नाही कळणार खिचडी खाणाºयांच्या व्यथा़ बायको आईकडं गेली तरीही तुझ्या पोटाची सोय होते. शिवाय तीन-चार कच्च्याबच्च्या साळ्या असतात तुझ्या दिमतीला, म्हणून चंगळ असते तुझी! माझ्यासारखा जरा अनुभव घेऊन बघ, म्हणजे कळेल़ ’’ मी म्हणालो़
‘‘अरे आजकाल मोबाईल अ‍ॅपवरून आॅनलाईन जेवण पण मागवता येतं ना़ काय ते टोमॅटो की सोमॅटो आहे ना़़़’’ उम्या काही सूचवण्यापूर्वीच मी ताड्कन्न म्हणलो, ‘‘…काही बटाटा नको की वडा नको आणि असेलच तर मला काही करायचे नाही त्यांचे. झोपले असतील आता ते टोमॅटोवाले. रस्त्यावर रात्रभर हुंदडत असतात लेकाचे. सिग्नल सोडून भरधाव सुटतात़ काही दुसºयाच्या जिवाची पर्वा नाही लेकांना. ह्या पोट्यांना चांगलं सडकून काढलं पाहिजे. काल पायी चालणाºया एका काकांना धडक दिली एकानं. बरं झालं केवळ पडल्यावर निभावलं, नाहीतर या वयात हाडंबिडं मोडली असती तर….बरं ठेव.रात्री ‘संजू’ बघितला़ संजूबाबा आवडला़ आता गप्पा नकोय़ आॅफिसमध्येच बोलूया़’’ मी म्हणालो़
‘‘बरं झालं सँडी, डर्टी पिक्चर नाही बघितलास; अन्यथा तुला दांडीच मारावी लागली असती़’’ ही…ही करत उम्यानं आपलं ज्ञान पाजळण्याचा प्रयत्न केला.
‘‘़़़म्हणजे असं काय आहे त्यात?’’
‘‘़़क़ाही नाही रे़ अगोदर बघून घे़ नंतर सांग़’’
असं फालतू बोलून ही़़़ही करीत त्याने मोबाईल कट केला़ (पुढील भाग लवकरच)

लेखक
संजय मुंदलकर
9552981514

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here