Home राजधानी मुंबई राज्य सरकारकडून कोरोना काळात कारखान्यांना झळ न बसण्याची काळजी

राज्य सरकारकडून कोरोना काळात कारखान्यांना झळ न बसण्याची काळजी

35

मुंबई : कोरोना महामारी आटोक्यात आणतानाच राज्याच्या अर्थचक्राला झळ बसू नये याची देखील काळजी राज्य सरकार घेत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरच्या चर्चेत सांगितले. संसर्गाचा फटका सर्वात जास्त बसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज प्रधानमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली.
महाराष्ट्राला अधिक आॅक्सिजनची, लशीची तसंच रेमडीसीवीरची गरज आहे, आॅक्सिजन विमानाने आणणे शक्य नसल्यास वेळ वाचविण्यासाठी रिकामे टँकर्स विमानाने प्लँट्सच्या ठिकाणी पाठवून आॅक्सिजन भरून इतर मागार्ने राज्याला मिळावा, परदेशातून रेमडीसीवीर आयात करायला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राज्यात निवृत्त डॉक्टर्स, परिचारिका तसंच वैद्यकीय विद्यार्थी यांची देखील मदत घेण्यात येत असून टेलीमेडिसिन आणि टेली आयसीयूवर भर देण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लसीकरण करून संसर्ग थोपवणं शक्य आहे, म्हणून राज्य सरकार इतर देशांतून लस आयात करू शकेल का असा प्रस्ताव त्यांनी मांडला. राज्यात विषाणूचे दुहेरी उत्परिवर्तन आढळल्याने संसर्गातही वाढ झाली. यासंदर्भात पुढील वाटचालीसाठी योग्य तो अभ्यास व्हावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात 60 हजारांहून अधिक रुग्ण आॅक्सिजनवर आहेत, 76, 300 आॅक्सिजन बेड्स, 25 हजारपेक्षा अधिक आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, दररोज 1550 मे. टन आॅक्सिजनची आवश्यकता आहे. 300 ते 350 मे टन आॅक्सिजन बाहेरून आणला जात आहे. रेमडेसिव्हिरच्या 70 हजार व्हायल्सची गरज असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली.