Home राजधानी मुंबई लोककवी हरेंद्र जाधव यांचे वृद्धापकाळाने निधन

लोककवी हरेंद्र जाधव यांचे वृद्धापकाळाने निधन

44

मुंबई : भीमगीते, भावगीते, कोळीगीते, लग्नातील गाणी, लावण्या, पोवाडे, लोकनाट्य असे चौफर लिखाण करणारे लोककवी हरेंद्र जाधव यांचे रविवारी पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले. नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर-3 येथील निवासस्थानी त्यांनी 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

हरेंद्र जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध यांच्या जीवनावर आधारितही अनेक गीते रचलेली आहेत, त्यातील पाहा पाहा मंजुळा हा माझ्या भिमरायाचा मळा, हे खरचं आहे खरं, श्री भिमराव रामजी आंबेडकर, ही त्यांची शाहीर विठ्ठल उमपांनी गायलेली गीते आजही आवडीने गायली जातात. माझ्या नवºयानं सोडलीया दारू, बाय देव पावलायं गो, डोलकरा माझे डोलकरा अशी गाणीही गाजलेली आहेत.

तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता अवघ्या दीनांच्या नाथा, आता तरी देवा मला पावशील का, मंगळवेढे भूमी संताची…ही त्यांची गाणी मोठ्या प्रमाणात गाजलेली आहेत.

जाधव यांनी आतापर्यंत 10 हजारांहून अधिक गाणी लिहिली असून, अजित कडकडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे, अनुराधा पौडवाल, बेला सुलाखे, साधना सरगम यांच्यासह अनेक गायक, गायिकांनी गायली आहेत.