माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन

राजधानी मुंबई

मुंबई : माजी खासदार व राज्याचे माजी राज्यमंत्री तसेच मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे आज सकाळी १० वाजता कोरोनामुळे दु:खद निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते.

एकनाथ महादेव गायकवाड यांचा जन्म १ जाने १९४० रोजी सातारा जिल्ह्यातील बोरखळ येथे झाला. आमदार म्हणून ते मुंबईतील धारावी मतदारसंघातून १९८५-९०, १९९०-९५ व १९९९-२००४ असे ३ वेळा निवडून आले होते. सन १९९३-९५ या कालावधीत गृहनिर्माण, गलिच्छ वस्ती सुधार, घर दुरुस्ती व पुनर्बांधणी, समाज कल्याण आणि कामगार विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. तर, १९९९-२००४ या कालावधीत आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, कुटुंबकल्याण विभागाचे राज्यमंत्री म्हणून ते कार्यरत होते. सन २००४ च्या लोकसभा निवडणुकीत व त्यानंतर २००९ मध्ये सलग दुसऱ्यांदा ते खासदार म्हणून निवडून आले होते.

अभय शिक्षण केंद्राचे ते संस्थापक अध्यक्ष होते, रयत समता महासंघ, जनता ग्राहक सहकारी सोसायटी, राष्ट्रीय पर्णकुटी पुनर्रचना परिषद, याचे अध्यक्ष तर अखिल भारतीय अनुसूचित जाती परिषदेचे ते सरचिटणीस होते. अनुसूचित जाती जमाती कल्याण समिती, महाराष्ट्र विधानसभेचे समिती प्रमुख म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. वाचन आणि समाजसेवेची त्यांना आवड होती. स्वभावाने अत्यंत विनयशील व हसतमुख असलेल्या एकनाथ गायकवाड यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

माजी राज्यमंत्री एकनाथ गायकवाड यांना मंत्रिमंडळाची श्रद्धांजली

महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री, माजी संसद सदस्य, ज्येष्ठ नेते एकनाथ महादेव गायकवाड यांच्या निधनाबद्धल आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शोकप्रस्ताव वाचताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील समाजकारण-राजकारणातील दोन पिढ्यांसाठीचे मार्गदर्शक असे नेतृत्व आपण गमावले आहे. एकनाथ गायकवाड यांनी राजकारण आणि समाजकारणाचा समतोल साधत, पुढच्या पिढीसाठीही मार्गदर्शक अशा कामाचा आदर्श घालून दिला अशा शब्दांत मंत्रिमंडळाच्या भावना व्यक्त केल्या.

मार्गदर्शक नेतृत्व हरपले: उपमुख्यमंत्री अजित पवार

माजी खासदार सन्माननीय एकनाथराव गायकवाड साहेबांच्या निधनाने समाजातील वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्कांसाठी लढणारा हक्काचा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. एकनाथराव गायकवाड साहेबांचे नेतृत्व समाजातील सर्व थरांपर्यंत पोहोचलेले, सर्वमान्य नेतृत्व होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रगाढ निष्ठा आणि काँग्रेसच्या विचारधारेशी ते जीवनभर प्रामाणिक राहिले. त्यांचे निधन ही समाजातील पुरोगामी, सुधारणावादी चळवळीची मोठी हानी आहे. त्यांच्या निधनामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला आहे. आम्ही सर्वजण गायकवाड साहेबांच्या कुटुंबियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत माजी खासदार एकनाथ गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *