महाराष्ट्राने विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांची शृंखला दिली

राष्ट्रीय

नवी दिल्ली  :  महाराष्ट्राने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात कर्तृत्ववान  महिलांची एक शृंखलाच दिली आहे. त्यांनी आपले कर्तृत्व उत्कृष्टपणे गाजवले. याची सुरुवात राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यापासून झाली व त्यांनीच याचा मुहूर्तमेढ रोवली असल्याचे प्रतिपादन निवेदिका क्षिप्रा मानकर यांनी केले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेअंतर्गत 38 वे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. “महिलांनी घडवलेला महाराष्ट्र” या विषयावर बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, अनेक महापुरुषांची महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका होती आणि त्यांच्या बरोबरीने महिलांच्या कर्तृत्वाला देखील नाकारता येणार नाही.

स्वतंत्र स्वराज्याची निर्मिती करण्याचे श्रेय राजमाता जिजाऊ यांना जातं आणि तेव्हापासूनच महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्राच्या जडणघडणीत प्राचीन, अर्वाचीन, मध्ययुगापासून आजपर्यंत महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. येथील महिला आंदोलक, क्रांतिकारक, समाजसेवक, शिक्षणतज्ञ म्हणून पुढे आल्या व त्यांनी राज्याच्या निर्मितीसाठी उल्लेखनीय कार्य केले. १६ व्या शतकात सर्वांना स्वराज्य हवे होते. त्यावेळेला राजमाता जिजाऊ यांनी शिवराय आणि मावळ्यांना हे स्वप्न दाखवली की, खऱ्या अर्थाने स्वराज्य तुमचे आहे आणि तुम्हाला ते राखायचे आहे आणि तिथून स्वराज्याच्या लढ्याची सुरवात झाली.

विविध क्षेत्रात महाराष्ट्रीय स्त्रियांचे योगदान

क्षिप्रा मानकर म्हणाल्या, अवघ्या २४-२५ वर्षाच्या तारा राणी यांनी औरंगजेबाविरुद्ध लढा दिला. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा व संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांनीही महाराष्ट्राचे नाव इतिहासात गाजवले. येसुबाई यांना पती जिवंत असताना सुद्धा विधवेसारखे राहावे लागले पण त्यांनी आपला लढा चालू ठेवला. राष्ट्र सेवा म्हणजे काय हे येसूबाई यांना पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते, असे मानकर म्हणाल्या. उमाताई दाभाडे एक अशी स्त्री होती जी नेहमी लढत राहिली. त्यांना सनातन विचारांचा खूप त्रास झाला परंतु आजही भारताची पहिली सरसेनापती म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर फक्त चांगल्या शासक-प्रशासकच नाही, तर एक उत्तम समाजसेविकाही होत्या. त्यांनी विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या अधिकारांमध्ये हक्क मिळवून दिला तसेच दत्तक पुत्र घेण्याचा अधिकारही मिळवून दिला, अन्नछत्र, विहीर सुविधा यांच्यामुळे उपलब्ध झाल्या. महिलांनी घडवलेल्या महाराष्ट्रामध्ये राजमाता जिजाऊ, येसूबाई, ताराराणी, उमाताई दाभाडे, अहिल्याबाई होळकर, त्याचप्रमाणे झलकरीबाई असा वारसा आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई, फातिमा शेख आणि मुक्ता साळवे

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांकरिता शिक्षणाची कवाडे उघडून दिली. त्या काळात प्लेगविरुद्ध लढा देताना त्यांनाही त्याची लागण झाली तरीदेखील त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले आणि म्हणून आदर्श ठरल्या. त्यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृह, अनाथ बालकाश्रम सुरु केले तर विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. या प्रकारे सत्यशोधक कार्य जोतिबा यांच्यानंतरही जिवंत ठेवले.

भारतातील पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख या सावित्रीबाईच्या बरोबरीने काम करत. त्याकाळात सनातनी विचारधारा मोठी असली आणि बहुजन महिलांना शिक्षणाचा विरोध असला तरी त्यांनी सावित्रीबाईंसोबत काम केले. त्यांची अस्पृश्य विद्यार्थिनी मुक्ता साळवे हिनं पंधराव्या वर्षी निबंध लिहून सनातन्यांना अनेक प्रश्न विचारले. जसे की, स्वातंत्र्य नसेल तर महिलांनी जगून उपयोग काय? त्यांच्या निबंधाची दखल घेतली गेली आणि पुरोगामित्वाचा विचार या भूमीला देण्याचे काम त्यांनी केले. मुक्ताच्या निबंधातून दलित साहित्याचा उगम झाल्याची माहिती श्रीमती मानकर यांनी दिली.

ताराबाई शिंदेतानूबाई बिर्जेडॉ रखमाबाईरमाबाई

क्षिप्रा मानकर म्हणाल्या, ताराबाई शिंदे यांनी पतीचे निधन झाल्यानंतर महिलेल्या जगण्याचा अधिकाराबद्दल प्रश्न उपस्थित केले. सत्यशोधक वातावरणात वाढलेल्या ताराबाई म्हणायच्या की, वेश्या व्यवसाय वाढण्याचा मुख्य कारण पुरुषांनी लावलेले निर्बंध आहेत. त्यांनी पुरूषांप्रमाणेच महिलांनाही पुनर्विवाहाचा अधिकार असण्याची भूमिका घेतली.

भारताच्या पहिल्या महिला संपादिका तानुबाई बिर्जे यांनी दिनबंधूच्या संपादिका म्हणून काम पाहिले आणि आपल्या लेखनामुळे धाडसी पत्रकार म्हणून समाजात कायम राहिल्या. रखमाबाई या पहिल्या डॉक्टर होत्या ज्यांनी परदेशातून शिक्षण घेतला व परत भारतात येऊन रुग्णांसाठी सेवा दिली. त्या काळात त्यांनी नाकर्त्या नवऱ्याविरुद्ध घटस्फोटाचा खटला दाखल केला ज्याची प्रदेशापर्यंत चर्चा झाली आणि तो जिंकून त्यांनी स्वतः स्त्रीमुक्ती काय असते हे आपल्या आयुष्यातूनच दाखवून दिला. क्षिप्रा मानकर म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी परदेशात असताना रमाबाईंनी भारतात त्यांचं काम सांभाळला. संत जनाबाई, बहिणाबाई यांना शिक्षणाचा लवलेश ही नसला तरी त्यांनी अभंग, ओव्या, कवितांच्या माध्यमातून जनजागरण केले आणि साहित्याच्या माध्यमातून राज्याच्या जडण-घडणीत आपले योगदान दिले.

शांताबाई शेळके, डॉ रजिया पटेल, सरोजिनी बापट यांनी हा वारसा पुढे नेला

जनाबाई, बहिणाबाईपासून पुढे साहित्याचा वारसा चालूच राहिला आणि शांताबाई शेळके, डॉ रजिया पटेल, सरोजिनी बापट यांनी साहित्यचा वारसा अखंड चालू ठेवला. सरोजिनी बापट यांच्या लिखाणातून स्त्रियांची जगण्याची पद्धत, संसाराला सावरण्यासाठी स्त्रीची धडपड काय असते हे पाहायला मिळते. डॉ रजिया पटेल यांना गावकऱ्यांनी त्यांचे शिक्षण थांबवले तेव्हा त्यांनी शहरात जाऊन शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सिनेमागृहात प्रवेश मिळवला आणि बंदी तोडून दाखवली म्हणून स्त्री सुधारणा व समाज समीक्षक म्हणूनच साहित्यक्षेत्रात डॉक्टर रजिया पटेल यांचे नाव मोठे आहे. क्षिप्रा मानकर यांनी डॉ अरुणा ढेरे, इरावती कर्वे, लक्ष्मीबाई नाईकवाडी, लीलाबाई पाटील, विमलताई देशमुख,कौसाबाई पाटील, इंदुताई पाटणकर, शरद पवार यांच्या मातोश्री शारदाबाई गोविंदराव पवार, नलिनीताई लडके यांच्या योगदानावर ही माहिती दिली.

मानव विकासाला केंद्रबिंदू मानणाऱ्या अहिल्याबाईमृणाल गोरेप्रमिला दंडवते

क्षिप्रा मानकर यांनी सांगितलं की, अहिल्याबाई रांगणेकर, मृणाल गोरे, प्रमिला दंडवते यांनी सर्वसामान्यांसाठी एक मोठी चळवळ उभारली. या स्त्रियांच्या त्रिकुटाचा त्याकाळात दबदबा होता. त्यांनी अनेक प्रश्नांवर आवाजही उठवला आणि रस्त्यावर उतरल्या. प्रमिला दंडवते यांनी गोवा मुक्ती आंदोलनातही सक्रिय सहभाग नोंदवला. अहिल्या रांगणेकर या निर्भीड कार्यासाठी ओळखल्या जात. मृणाल गोरे यांनी पंचायत समितीपासून लोकसभेपर्यंत प्रशंसनीय कार्य केले. मानकर यांनी ताराबाई मोडक, गोदावरी परुळेकर, कमला सोहनी यांच्या कार्याबद्दलही माहिती दिली तसेच कोरोना चाचणीचा किट बनवणाऱ्या अलीकडच्या मीनल डाखवे भोसले यांचाही उल्लेख केला. त्याचप्रमाणे अहमदनगरच्या “ सिड मदर” राहीबाई पोपेरे, वैद्यकीय संशोधक कमला रणदिवे, महिला गणितज्ञ मंगला नारळीकर, त्याचप्रमाणे लता मंगेशकर, आशा भोसले, स्मिता पाटील, किशोरी अमोणकर, हिराबाई बडोदेकर, जयमाला शिलेदार, शाहीर अनुसयाबाई शिंदे, वारकरी वारसा लाभलेल्या गायिका कार्तिकी गायकवाड, जिजाऊ ब्रिगेडच्या रेखाताई खेडकर, नाशिकच्या प्रज्ञा पाटील, कांचन माला, रेडिओवर अशिक्षित गायकांना संधी देणाऱ्या आरती सिन्हा या सर्वांच्या कामाचा उल्लेख केला. त्यांनी खंत व्यक्त केली की, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून आजपर्यंत एकही महिला मुख्यमंत्री झालेल्या नाहीत. त्यांनी युवा पिढीला महिलांचा समृद्ध वारसा पुढेही चालविण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *