Home राजधानी मुंबई पेटीएम फाउंडेशनकडून कौतुक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न देशासाठी मार्गदर्शक

पेटीएम फाउंडेशनकडून कौतुक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न देशासाठी मार्गदर्शक

6

मुंबई : पेटीएम फाउंडेशनचे विजय शेखर-शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोरोना उपाययोजनांसाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पुढाकाराचे कौतुक केले. कोविडच्या लाटेला रोखण्यासाठी मास्क वापरासह, लसीकरणाच्या माध्यमातून करण्यात येणाºया उपाययोजनांमध्ये महाराष्ट्राने पुढचे पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या दूरदृष्टीकोनातून सुरू असलेले प्रयत्न देशासाठी मार्गदर्शक असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

पेटीएम फाऊंडेशनने आॅक्सिजन निर्मिती-पुरवठा, लसीकरण आणि लस उपलब्धतेसाठी निधी यासाठी आवश्यक असे योगदान देण्याची हमी दिली आहे. राज्यात आॅक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीत, तसेच लसीकरणासाठी मुंबई-पुण्यातील मोठ्या कंपन्यांची कार्यालयांचा परिसर आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची तयारी. लशीसाठी आवश्यक अर्थसहाय्यही सामाजिक बांधिलकी निधीतून तसेच विविध मार्गातूप आर्थिक भार उचलण्याची तयारी दर्शवली आहे.

कोविडच्या संकटाने सगळ्यांनाच खूप मोठा धडा दिला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट आणि अशा अनेक संकटांना तोंड देणारी ठरेल, यावर भर दिला जात असल्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. पेटीएम फाऊंडेशनच्यावतीने राज्यात आॅक्सिजन निर्मिती प्रकल्प, आॅक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणासाठी राज्य शासनाला सहकार्य करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते.

पेटीएम फाऊंडेशन स्वत:हून पुढे आल्याबद्दल मुख्यंत्र्यांनी अशा संकटाच्या काळात राज्य आणि देशाच्या आर्थिक चक्राला गती देण्यासाठी असे प्रयत्न महत्त्वाचे ठरतील, असे कौतुकोद्गारही काढले. बैठकीस राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जºहाड, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आणि पेटीएम-फाऊंडेशनचे विजय शेखर-शर्मा, सोनिया धवन, राजेंद्र गुल्हर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, विकास होत राहील. पण जीव वाचले, तर विकासाला खरा अर्थ आहे. आपण विकास, म्हणून ज्याच्या मागे धावत होतो. त्या विकासाने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. आता आपल्याला आॅक्सिजनच्या मागे धावावे लागत आहे. कोरोनाने आपल्याला धडा दिला आहे. त्यामुळे येत्या काळातील आव्हानांना तोंड देण्याची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. पहिल्या लाटेत खूप सुविधा जाणीवपूर्वक वाढवल्या; परंतु त्याही अपुºया पडू लागल्या आहेत. आता लसीकरणानंतरही आरोग्य सुविधा वाढविणाºयावर भर आहे. आता जुलैनंतर पावसाळ्यामुळेही अनेक साथीचे आजार पसरू लागतात. त्यांना तोंड देण्यासह कोविडची तिसरी, चौथी आणि अशा कितीही लाटा आल्या तरीही त्यांना थोपविण्यासाठी, जास्तीत जास्तीत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आॅक्सिजन हे आता औषध ठरल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यातील आॅक्सिजन निर्मिती 1500 मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. त्याशिवाय ज्या-ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होतील, असे प्रयत्न आहे. त्यामध्ये तात्पुरत्या आणि दीर्घकाळाचे असे नियोजन आहे. रुग्णशय्यांची संख्या, तसेच कोविड केंद्रांचीही संख्या वाढवणार आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here