Home राजधानी मुंबई तिसऱ्या संभाव्य लाटेत सर्वसामान्यांच्या फॅमिली डॉक्टर्सवर मोठी जबाबदारी

तिसऱ्या संभाव्य लाटेत सर्वसामान्यांच्या फॅमिली डॉक्टर्सवर मोठी जबाबदारी

73

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील एका वैशिष्ट्यपूर्ण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज राज्य टास्क फोर्समधील तज्‍ज्ञ डॉक्टर्सनी मुंबईतील सुमारे ७०० खासगी डॉक्टर्सना कोरोनाबाबतीत वैद्यकीय उपचारांबाबत निश्चित काय पद्धती अवलंबवावी याविषयी एकाचवेळी मार्गदर्शन केले [ cm thakare connected with 700 private doctors ] आणि त्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले.

विशेष म्हणजे तीन चार दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने मुंबईतील सुमारे ३०० डॉक्टर्सशी संवाद साधण्यात आला होता. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या दोन्ही सभांमध्ये मिळून मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टर्सनी सहभाग घेतला. केवळ काही डॉक्टर्सशी न बोलता तंत्रज्ञानाचा सुयोग्य उपयोग करून अगदी थेट तळागाळात काम करणाऱ्या शेवटच्या डॉक्टरशी बोलण्याचा आणि त्यांच्याही सूचना ऐकून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपक्रमाचे वैद्यकीय क्षेत्रात स्वागत होत आहे. अशाच रितीने राज्यातील इतर विभागातील डॉक्टर्सशी देखील संवाद साधण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधात वैद्यकीय क्षेत्र करीत असलेल्या लढाईसाठी त्यांची प्रशंसा केली तसेच येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, कोरोना काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे कारण कोणत्याही लहान मोठ्या आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या, परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. सर्वसामान्यांना आपण “माझा डॉक्टर” बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होणार आहे असे ते म्हणाले.

घरी उपचारातील रुग्णांकडे लक्ष हवे

लक्षणे नसलेले रुग्ण रुग्णालयात जातात आणि आवश्यक नसतानाही त्यांना बेड्स उपलब्ध करून दिले जातात यामुळे खऱ्या गरजू रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. त्याचप्रमाणे कोविड रुग्ण उशिराने दवाखान्यात जात असल्याने योग्य उपचारांना उशीर होतो, त्यामुळे फॅमिली डॉक्टर्सनी [ family doctors] काळजीपूर्वक तपासणी करताना कोविड लक्षणे ओळखून त्याप्रमाणे तत्काळ उपचार केल्यास वेळीच रुग्ण बरं होण्यास मदत होईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, घरच्या घरी विलगीकरणातील रुग्णांकडे आपण सर्व डॉक्टर्सनी लक्ष देणे, त्यांची विचारपूस करीत राहणे गरजेचे आहे, त्यामुळे रुग्णाला मानसिक आधारही मिळतो आणि त्याची तब्येत खालावत असेल तर वेळीच त्याला रुग्णालयात दाखल करणे शक्य होते असेही मुख्यमंत्री म्हणाले. यासाठी सर्व डॉक्टर्सनी घरी उपचार घेणाऱ्या रुग्णाला प्रोटोकॉलप्रमाणे उपचार मिळताहेत किंवा नाही याकडे व्यक्तिश: लक्ष द्यावे तसेच वॉर्ड अधिकाऱ्यांना देखील योग्य ती माहिती वेळोवेळी दिल्यास रुग्णांच्या बाबतीत पुढील व्यवस्थापन करणे पालिकेला सोपे जाईल.