Home BREAKING NEWS आध्यात्मिक …… मातृदिन

आध्यात्मिक …… मातृदिन

537
संत राजिंदर सिंहजी महाराज
दरवर्षी इंग्रजी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन (मदर्सडे) हा दिवस जगभरात मातें चा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. आई आणि मुलाचे नाते हेच केवळ एकमेव असे प्रेम आहे, जे पवित्र व निस्वार्थ आहे. 
आपण आपल्या जीवनातील उदाहरण घेतले असता, आपल्याला कळून येते की संसारिक प्रेमाचा सर्वोच्च आणि सर्वोत्तम आदर्श म्हणजे आई आणि मुलातील प्रेम आहे. आपण बघतो की अगदी लहान मूल कसे आपल्या आईचे केस ओढते आणि तिच्या गालावर चापट मारते. तरीही त्याच्या अशा कृतीचा आईला राग येत नाही. जर मल-मुत्राने माखलेले मुल तिच्या कडे आले तर प्रथम ती त्याला स्वच्छ करते, कपडे परिधान करते आणि मिठी मारते. आईचे मुलाप्रतीचे प्रेम म्हणजे एका हृदया पासून दुसऱ्या हृदया पर्यन्त पोहचणारा मार्ग होय. आई आणि मुलाच्या नात्यामध्ये लोभाला कोणतेही स्थान नाही. आई आपल्या मुलासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत असते. स्वतःच्या घासातील घास काढून ती आपल्या बाळाला भरविते.
त्याचप्रमाणे, बाळाला उब मिळावी म्हणून ती स्वतःचे वस्त्र त्याच्या भोवती लपेटते. आपल्या मुलासाठी करीत असलेल्या तिच्या त्यागाला आणि बलिदानाला अंत नाही. ह्या पवित्र नात्यात, आई मुलाच्या प्रेमाशिवाय, या जगातील इतर नाते संबंधातील प्रेम सोडून देते. जेव्हा मुल तिच्या कुशीत असते तेव्हा ती सर्वकाही विसरुन जाते व केवळ आपल्या मुलाच्या प्रेमात मग्न रहाते. या नात्यात, आई स्वतःला विसरते व आपल्या मुलाच्या इच्छेपूर्ती करीता स्वतःच्या इच्छांचा देखील त्याग निस्वार्थपणे करते.
आपल्याला माहित आहे की आईचे तिच्या मुलावर असलेले प्रेम हे नाजूक व हृदयस्पर्शी असते. हे ऐहिक प्रेमाचे शुद्ध रूप आहे जे स्वार्थापासून पूर्णपणे मुक्त आहे. याच बरोबर मुलांनी सुद्धा हे जाणलं पाहिजे व समजून घ्यायला पाहिजे की त्यांच्या आईने कशा प्रकारे त्यांची सेवा केली आणि त्यांच्या आरामासाठी तसेच सुखसोयी साठी किती त्याग केलेला आहे.
जेव्हा आपण मोठे होऊ तेव्हा आपल्या आईसाठी काय करावे हे सुनिश्चित केले पाहिजे. आपण आईचा मान राखून तिच्यावर प्रेम करुन असं करू शकतो. आपल्यासाठी तिने प्रेमाने केलेल्या सर्व गोष्टीं व  प्रयत्नांचा अन्तःकरणा पासून स्वीकार करायला हवा.
अशाच प्रकारे असे म्हटले जाते की संत-सद्गुरूंचे आपल्या शिष्यावरचे प्रेम हे हजारो मातांच्या प्रेमापेक्षा ही मोठे असते. सर्वशक्तिमान पिता-परमेश्वर आपल्या सर्वांवर खूप प्रेम करतात. संत-सद्गुरू आपल्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही, ते तर केवळ आपल्याला देण्यासाठीच येतात. ते नेहमीच आपल्याला अंतःकरणात जाऊन परमातम्या सोबत एकरूप होण्यासाठी प्रेरित करतात.
आपण मदर्स-डे वर अर्थात मातृदिनी वचन देवू या, प्रतिज्ञा करूया की आईच्या निस्वार्थ प्रेमाचे स्मरण फक्त मातृ दिनी न करता, आपल्या हृदयात त्या प्रेमाला सदैव वृद्धिंगत करूया. आपल्या हृदयात त्या प्रेमाला सदैव जपूया, त्याची कदर करूया. पिता-परमेश्वरा चे देखील आपण आभार मानू या, की त्यांनी आपल्याला मानवी जीवनाची एक सुवर्ण संधी दिली आहे. अगणित आशिर्वादां साठी आणि अनंत प्रेमा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपण आपले जीवन प्रेमाने, सदाचाराने जगावे. ध्यान-धारणेला वेळ देऊन, अध्यात्मिक मार्गावर वेगाने प्रगती करावी.
*****