गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

राजधानी मुंबई

मुंबई :  कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांची  प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने राज्यातील सद्य:स्थितीचा आढावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. राज्यातील कायदा-सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या सूचना त्यांनी  संबंधितांना  दिल्या.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस विभाग सातत्याने कार्यरत आहे. या काळातील बंदोबस्ताचे नियोजन, कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा तसेच पोलिसांच्या अडचणींची माहिती देखील श्री. वळसे पाटील यांनी यावेळी घेतली.

बैठकीला गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, महासंचालक संजय पांडे, मुंबई आयुक्त हेमंत नगराळे आदी उपस्थित होते. राज्यात कडक निर्बंध लावले आहेत त्याची चांगली अंमलबजावणी होईल हे पाहताना आपला मुख्य उद्देश हा कोविडची संसर्ग साखळी तोडणे हा आहे हे लक्षात ठेवावे आणि कुठलाही अतिरेक किंवा विसंगत कृती करू नये. दलाच्या सक्षमीकरणासाठी तसेच सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. कर्तव्य बजावत असताना त्यांना जनमानसात फिरावे लागते, यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त आहे हे लक्षात घेऊन त्यांच्या आरोग्याबाबतही दक्षता घ्यावी. संसर्ग झाल्यास तत्काळ उपचारासाठी रुग्णालय व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. दलातील प्रत्येकाचे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे लसीकरण करून घ्यावे. त्यासाठी आवश्यक त्या सोयी सवलती उपलब्ध कराव्यात, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

आगामी काळातील सण, उत्सव शातंतेत आणि सुव्यवस्थेत पार पडावेत यासाठी विविध घटकांशी सुसंवाद वाढवावा, लोकांमध्ये सुरक्षेच्या उपायांबाबत विश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न करावेत, नियमांची अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, असेही ते म्हणाले. पोलिस आणि सामान्य जनता यांच्यात समन्वयाचे नाते निर्माण करण्याच्या सूचना करत जनतेला आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. या काळात समाजमाध्यमांवर पोलिसांनी करडी नजर ठेवावी. आक्षेपार्ह पोस्ट आणि अफवा पसरणार  नाहीत, याची खबरदारी घेण्यात यावी असे त्यांनी सांगितले.

पोलिस महासंचालक संजय पांडे, आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजना व अंमलबजावणीची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *