Home राजधानी मुंबई ६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीसाठी धोरणामध्ये बदल करू

६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीसाठी धोरणामध्ये बदल करू

57

मुंबई : वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्र वा अन्य केंद्रांपासून ६०० मीटरपेक्षा दूर असलेल्या कृषी ग्राहकांनाही नवीन कृषी पंप वीज जोडणी धोरणातील तरतुदी, कुसूम योजना आणि वीज कायदा २००३ मधील तरतुदी लक्षात घेऊन वीज जोडणी देण्यासाठी धोरणात्मक बदल करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज सांगितले. कृषी पंप धोरणाच्या अंमलबजावणीचा त्यांनी आज मंत्रालयातील एका बैठकीत आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

विद्यमान कृषी धोरणात ६०० मीटरपर्यंतच्या कृषी ग्राहकांना कृषी पंप जोडणी देण्याची तरतूद आहे. मात्र त्यापेक्षाही दूर अंतरावर असलेल्या ग्राहकांना अन्य योजनांमधून वीज जोडणी देणे शक्य असेल तर त्या ग्राहकांना कृषी पंप जोडणी दिल्यास राज्य सरकारवर जोडणीच्या खर्चाचा भार पडणार नाही, असे मतही त्यांनी नोंदवले.

या बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ऊर्जा विभागाचे उपसचिव प्रशांत बडगेरी, महावितरणचे संचालक (ऑपरेशन) संजय ताकसांडे, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे हे प्रत्यक्ष तर औरंगाबाद विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गीते, कोकण विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडखे यांच्यासह सर्व प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंता हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

राज्य सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या कृषी पंप जोडणी धोरणांतर्गत ऑक्टोबर २०२० पासून आजवर १ हजार १३० कोटींची वसुली झाली आहे. २०१८ पासून राज्यातील कृषी ग्राहकांना वीज जोडण्या देणे बंद करण्यात आले होते. त्यामुळे पैसे भरूनही हजारो ग्राहकांना जोडण्या मिळाल्या नव्हत्या. महाविकास आघाडी सरकारने ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांची थकीत विजबिलांतून मुक्ती व्हावी आणि प्रगती व्हावी यासाठी कृषी पंप वीज जोडणी धोरण आणले. या धोरणांतर्गत आजवर ५१ हजार नव्या ग्राहकांना कृषी पंपांच्या जोडण्या देण्यात आल्या आहेत. यामुळे अधिकृत जोडणीच्या अभावी आजवर अवैधरीत्या शेतात वीज वापरणारे हजारो ग्राहक आता वैध ग्राहक झाले आहेत. यामुळे एकीकडे वीजचोरीला आळा बसणार असून वीजबिल वसुलीही भविष्यात वाढणार आहे.

कृषी पंप धोरणानुसार पॉईंट ऑफ सप्लाय ( point of supply ) पासून शून्य ते ३० मीटरपर्यंतच्या शेतात पंप जोडणी मागितलेल्या ३५ हजार ६७० ग्राहकांना गेल्या काही महिन्यात वीज जोडणी देण्यात आली आहे. ३१ ते ६०० मीटर या अंतरातील वीज जोडण्या देण्यासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करावी लागणार आहे.