खासगी हॉस्पिटलमधील आक्षेपार्ह बिलांची तपासणी करण्यासाठी समिती गठीत करा

उपराजधानी नागपूर

नागपूर : कोरोना संसर्ग काळात प्रशासनाच्या आवाहनानंतर खाजगी हॉस्पिटलने केलेले सहकार्य अनमोल आहे. मात्र याच काळात काही असामाजिक तत्वांनी संधीचा फायदा तर घेतला नाही ना..? याची तपासणी करा. खासगी हॉस्पिटलमधील तक्रार, आक्षेप असणाऱ्या बिलांचे [ CORONA PRIVATE HOSPITALS BILL ] परीक्षण करण्यासाठी तटस्थ पद्धतीने काम करणाऱ्या वैद्यकीय समितीचे गठन करा. सत्य जनतेपुढे येऊ द्या, असे निर्देश ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज महापालिका आयुक्तांना दिले.

शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये नागपूर जिल्ह्यातील कोविडसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डी. एस. सेलोकार, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष अनूप मरार, कोविड टास्क फोर्सचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बैठकीत सर्वप्रथम लसीकरण सद्य:स्थिती, केंद्रे, साठा वाढविण्यासाठी उपाययोजना, लोकसहभाग, यावर चर्चा झाली. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी या चर्चेमध्ये सद्य:स्थिती विशद केली. ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांना वेळेत दुसरा डोस देण्याचे नियोजन करण्याबाबतच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केल्या. तिसरी लाट दारात असून त्यापूर्वी जिल्ह्यातील लसीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्याचे निर्देश दिले.

गाव पातळीवर लसीकरणासंदर्भातील प्रबोधन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांमध्ये गावांची विभागणी केली.लस मिळाल्याबरोबर वितरण सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.तिसऱ्या लाटेसाठी केलेल्या उपाययोजनेचा तपशील पालकमंत्र्यांनी मागितला. ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणाकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तिसऱ्या लाटेचे उग्ररूप ग्रामीण भागात राहील, अशी शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व आरोग्य यंत्रणा बळकट करणे सुरू असून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, औषध पुरवठा, आवश्यक यंत्र पुरवठा आणि बेड वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. यासोबतच ग्रामीण भागात उपलब्ध असणाऱ्या खाजगी डॉक्टरांकडून रुग्णसेवा व्हावी, यासाठी त्यांचे प्रशिक्षण व त्यांच्याशी समन्वय ठेवला जात असल्याचे सांगितले.

ग्रामीण भागात आरोग्य सुविधा नसल्याने नागरिकांची नाराजी असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी अस्तित्वात असणाऱ्या आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरणावर भर देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *