Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन

50

पुणे : काँग्रेसचे खासदार राजीव सातव [ RAJEEV SATAV ] यांचे आज रविवारी कोरोनामुळे निधन झाले आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उमदा नेता अशी राजीव यांची ओळख होती.

मागील 23 दिवसांपासून राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज सुरूहोती. काही दिवसांच्या उपचारानंतर सातव यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर मात्र त्यांना न्युमोनियाचा पुन्हा संसर्ग झाल्याचे दिसून आले. उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांनी अंतिम श्वास घेतला.

राजीव सातव विद्यमान राज्यसभेचे खासदार होते. त्यांच्याकडे सध्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गुजरात प्रभारी पद याशिवाय कार्यकारी समितीचे ते निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार आणि राज्यसभेच्या खासदार होत्या. राजीव सातव यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी लाटेतही विजय मिळवला होता. राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. पुढे 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान सातव यांच्यावर गुजरात प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली.

सामान्य कार्यकर्त्यापासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, महाराष्ट्र युवक काँग्रेसचं अध्यक्षपद, दोन वेळा खासदारकी आणि कार्यकारिणी समितीचे ते सदस्य होते. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीतही काही दिवसांपूर्वी त्यांचे नाव आघाडीवर होते.

अभिवृत्तच्या वतीने हार्दिक आदरांजली…