मुख्यमंत्र्यांनी टोचले विरोधकांचे कान, कोरोनाची दुसरी लाट सरकारी योजना नाही

राजधानी मुंबई

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट सरकारी योजना नाही. तिच्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनाची भाषा कशी काय करता येईल. कोरोनाच्या तिसºया लाटेचे निमंत्रक न होता अशी भाषा करणाºयांनी ज्या कुटुंबांनी आप्त स्वकीय गमावले, कर्ते गमावले अशा कुटुंबांच्या मदतीसाठी कोविड योद्धे होऊन काम करावे, अशी कानटोचणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांची केली.

मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील जनतेला समाजमाध्यमाद्वारे थेट संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते त्यांनी चांगली कामगिरी करून कोविडमुक्त गाव करणाऱ्या सरपंचाचे कौतुकही केले.

दुसऱ्या लाटेचा आपण चांगला मुकाबला केला असला तरी कोविडचे आव्हान कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी आपण कोविडमुक्त गावाचा संकल्प करून देशासाठी एक उत्तम उदहारण घालून द्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आपण राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार, असे वेगवेगळे अभियान यशस्वीरित्या राबवले आता शहर आणि गावांनी ठरवले तर आपण कोरोना मुक्त गाव आणि कोरोनामुक्त शहराची संकल्पना यशस्वीरित्या राबवू शकू. प्रत्येक घर, प्रत्येक गाव, प्रत्येक शहर कोरोनामुक्त झाले तर राज्य कोरोनामुक्त होईल असे सांगतांना त्यांनी गाव कोरोनामुक्त केलेल्या पोपटराव पवार,  ऋतूराज देशमुख आणि कोमलताई करपे या तीन सरपंचाच्या कामाचा गौरव केला. राज्यात दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या ही ६७ हजारांहून २४ हजारांएवढी कमी झाली असली तरी ती आजही पहिल्या लाटेतील उच्चांकी रुग्णसंख्येएवढी असल्याचे सांगतांना सावधगिरीने पुढे जावे लागत असल्याचे  मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढील १५ दिवस राज्यात लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे सांगतांना जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन नियम शिथिल करणार असल्याचेही म्हटले.

मदतीच्या निकषात सुधारणा करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार

कोरोनाच्या संकटाबरोबर राज्याने चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तींचाही सामाना केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

त्यांनी निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना केलेल्या वाढीव मदतीप्रमाणे तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे सांगतांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफ अंतर्गत करावयाच्या मदतीच्या निकषात सुधारणा करण्याच्या  पंतप्रधानांकडे केलेल्या मागणीचा पुनरुच्चार केला.

कायमस्वरूपी उपाययोजना

दरवर्षी येणाऱ्या वादळाची शक्यता लक्षात घेऊन सागरतटीय भागात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर शासन लक्ष केंद्रीत करत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. यामध्ये धुप प्रतिबंधक उपाययोजना, भूमीगत वीज वाहक तारा, भूकंपविरोधक घरांचे बांधकाम याबाबींचा समावेश असल्याचे ते म्हणाले

दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत

दहावीच्या परीक्षा यावर्षी न घेता मुल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगतांना त्यांनी बारावीच्या परीक्षांबाबतचा निर्णयही शासन लवकरच घेणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की ज्या परीक्षांचे महत्‍त्व (नीट, सेट, जेईई) विद्यार्थ्यांच्या पुढील भवितव्यासाठी अधिक आहे त्या परीक्षांचे निर्णय घेतांना केंद्र सरकारने देशभरासाठी एकच शैक्षणिक धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. ही मागणी आपण पंतप्रधान आणि केंद्र सरकारकडे करणार असल्याचेही ते म्हणाले.

ऑनलाईन शिक्षण सुविधांचे सक्षमीकरण

मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन शिक्षण सुविधांचे सक्षमीकरण करण्यासाठी, या क्षेत्रात क्रांतीकारक निर्णय घेण्यावर राज्य काम करत असल्याचे म्हटले.

कोरोनामुळे अनाथ बालकांसाठी राज्याची योजना

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी केंद्र सरकारने आज एक योजना जाहीर केल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की राज्य ही अशा बालकांसाठी योजना तयार करत असून त्यांचे पूर्ण पालकत्व राज्य सरकार स्वीकारणार आहे. आयुष्याची वाटचाल करतांना ही बालके पोरकी होणार नाही, त्यांच्या प्रत्येक पावलागणिक शासन त्यांच्यासोबत राहील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *