प्रतिकात्मक छायाचित्र

बियाण्यांची उगवणक्षमता तपासल्यानंतरच पेरणी करा : विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार

उपराजधानी नागपूर

नागपूर : आगामी खरीप हंगामात पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवण क्षमता तपासल्यानंतरच प्रत्यक्ष पेरणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

खरीप हंगाम नियोजन तसेच खते व ‍बियाण्यांच्या उपलब्धतेबाबतचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी घेतला. विभागात खरीप हंगामात 19.35 लाख हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले असून शासनाने यावर्षी कमी दिवसाच्या पीक पद्धतीचा अवलंब करण्यासंदर्भात आवाहन केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मागणीनुसार बियाण्यांची उपलब्धता करण्यासंदर्भात यावेळी निर्देश देण्यात आले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर विभागातील खरीप आढावा घेण्यात आला. विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. महसूल उपायुक्त मिलिंद साळवे, सामान्य उपायुक्त श्रीकांत फडके, सिंचन विभागाचे मुख्य अभियंता उत्तम पवार, अधीक्षक अभियंता ज. ग. गवळी, कृषी सहसंचालक प्रज्ञा गोडघाटे तसेच विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

विभागात खरीप हंगामामध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करुन त्याऐवजी निंबोळी आदी जैविक खतांचा वापर वाढविण्याला प्राधान्य देण्यात येत असून, सरासरी दहा टक्के रासायनिक खत कमी करण्यासोबतच उत्पादन वाढीच्या दृष्टीने धान व सोयाबीनची पेरणी करताना पट्टापद्धतीचा वापर करणे, कापूस कापसाची लागवड, बीबीएस पद्धतीने करणे तसेच किड रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी निंबोळी अर्काचा वापर करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना करताना डॉ. संजीव कुमार म्हणाले की, सोयाबीन बियाण्यांची मागणीनूसार पुरवठा करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर नियोजन करावे. विभागात 1 लाख 61 हजार क्विंटलची मागणी असून पुरवठा त्यानुसार नियंत्रित करणे आवश्यक आहे.

विभागात रासायनिक खतांच्या मागणीनुसार युरीया, डीएपी, संयुक्त खते आदींचा साठा उपलब्ध आहे. ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत नागपूर विभागाला 6 हजार 300 चे लक्ष्यांक आहे, त्यानुसार शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना जोडण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *