ग्रामविकासाचा पाया शिवछत्रपतींनी घातला : डॉ.नितीन राऊत

उपराजधानी नागपूर

नागपूर : ग्रामीण भागाचा विकास म्हणजेच सर्वसामान्य जनतेचा विकास आहे. हे जाणून अत्यंत कुशाग्र आणि दूरदृष्टी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात ग्रामविकासाचा पाया घातला, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस म्हणजेच ‘शिवस्वराज्य दिन’ [ SHIVSVARAJYA DIN ] साजरा करण्यात आला.  पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी गुढीचे पूजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, विषय समिती सभापती भारती पाटील, नेमावली माटे, जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले यांच्यासह जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी, अतिरिक्त  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी ए. एस. इनामदार, प्रकल्प संचालक विवेक इलमे आदी उपस्थित होते.

प्रांरभी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात गुढी उभारण्यात आली. महाराष्ट्र गीतांच्या पार्श्वसंगीतात हा अस्मितादर्शक सोहळा पार पाडला. त्यानंतर राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत झाले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी प्रथम संबोधित केले. ग्रामविकास मंत्रालयाने अतिशय उत्तम असा कार्यक्रम आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेची वाटचाल शिवाजी महाराजांच्या ग्रामविकास धोरणाप्रमाणे चालेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

चित्रीकरणासाठी सावधानता आणि खबरदारी पाळावी …
शंका असेल तर निर्बंध सुरूच ठेवा…

संबोधित करताना श्री. राऊत म्हणाले, शिवस्वराज्य दिन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस. स्वराज्याची, रयतेच्या राज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणाऱ्या या सुवर्ण दिवसाचे महत्त्व विशेष आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी क्रांतिकारी निर्णय घेतले. शिवस्वराज्यापूर्वी राजाचे सैनिक त्यांच्या मनात येईल त्या शेतात जाऊन हवे ते बळजबरीने घेऊन जायचे. परंतु ‘शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका’ ही शिवरायांची आज्ञा होती. शेतकऱ्यांच्या शेतात पिकलेल्या वस्तूंची मालकी ही शेतकऱ्यांची आहे. राजाची किंवा सरदारांची नाही. शस्त्र आहे म्हणून ती  बळजबरीने घेता येणार नाही. परंतु  धान्य, भाजीपाला हवे असल्यास त्याचे योग्य मूल्य द्या, हा क्रांतिकारी विचार पहिल्यांदा शिवरायांनी रुजविला. हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे महत्त्व सर्वत्र पोहोचावे, शिवछत्रपतीच्या उदात्त कार्याचा आदर्श भावी पिढीने घेऊन उत्तुंगपणे मार्गक्रमण करावे, या उद्देशाने शिवराज्याभिषेक दिन विविध उपक्रमाने साजरा केला जातो.

गनिमी काव्याच्या युद्धतं‌त्राने महाराष्ट्रातील गोरगरीब, सर्वसामान्य, अठरा पगड जातीच्या मावळ्यांच्या सहाय्याने शिवरायांनी परकीय सत्ताधिशांविरुद्ध स्वतंत्र लढा आरंभ करुन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.  तसेच सर्वधर्मसमभाव व धर्मनिरपेक्षता याचे आजच्या काळासाठी आदर्श ठरेल, असे उदाहरण शिवरायांनी घालून दिले आहेत. सर्वधर्मियांचा त्यांनी आदर केला. ‘राज्य हे रयतेचे राहील’, यासाठी त्यांनी सैनिक, सरदार तसेच मंत्रीमंडळ यांच्यासाठी आज्ञापत्रे लिहिली. भारतीय संविधानात जनतेच्या कल्याणाची जी मूल्ये आहेत, त्यापैकी अनेक मूल्ये शिवरायांच्या आज्ञापत्रात  पाहायला मिळतात. म्हणूनच शिवबा ‘जाणता राजा’ ठरतात, असेही ते म्हणाले.

आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत : मुख्यमंत्री

शिवरायांचा आदर्श ठेवून जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकास करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. कोरोना काळात ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ग्रामीण भागात हवेतून ऑक्सिजन वेगळा करणारा पहिला प्रकल्पही नागपूर जिल्ह्यातील कामठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात विक्रमी वेळेत उभारून आरोग्यविषयक आदर्श निर्माण केला आहे.  तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून ग्रामीण भागात कोरोना केअर केंद्र उभारण्यावर तसेच उपलब्ध रुग्णालयांची क्षमता वृद्धी करण्यावर भर देण्यात येत आहे.  शेतकऱ्यांच्या कल्याणाशिवाय शिवरायांच्या स्वप्नातील राज्य अस्तित्वात येऊ शकत नाही. यासाठी शेतकऱ्यांना थकीत बिल प्रकरणी दिलासा देणारी योजना आणली आहे. हजारो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. शेतीचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांच्या दारी आणि गावोगावी समृद्धी व्हावी, या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करीत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मंजुषा सावरकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *