Home साहित्य-संस्कृती अभिसांज ... एक कथा सांजबेला…नवरा बायकोची कथा, कम्मोचा माहेरदौरा (भाग दुसरा)

सांजबेला…नवरा बायकोची कथा, कम्मोचा माहेरदौरा (भाग दुसरा)

52

… नंतर मी बेड व्यवस्थित केला़ प्रात:र्विधी आटोपून किचनमध्ये दूध तापविण्यास ठेवलं़बिस्किट शोधले; पण दिसले नाहीत़ नंतर एकेक डबा शोधला़ प्रयत्न व्यर्थ! इकडं दूध ऊतू गेलं़ शेगडी दुधानं न्हाऊन निघाली़ जणू भगवान शंकरालाच अभिषेक झाला होता़ संपूर्ण ओटा धुणं भाग पडलं. करणार काय काढावाच लागला. ओट्यावरचं पाणी टाईल्सवर पडलं तर दोनदा घसरता घसरता वाचलो़ ही बायको कशी काम करते कुणास ठाऊक? क्षणभर तिचं कौतुकही वाटून गेलं. पातेल्यात चहासाठी दूध टाकलं़ पुन्हा बिस्किटांचा शोध सुरू केला तर चहाही ‘ओव्हरफ्लो’ झाला़ सगळा ओटा चहामय झाला़ मला परत ओटा धुवून काढावा लागला़ मग मात्र कुमुदिनीबद्दलचा राग खदखदू लागला़ उरलेला चहा कपात ओतून एक घोट घेतला तर तोही खूप कडू झाला़ नाईलाजानं ‘अमृतकाढा’ दोन-चार फुरक्यात संपवला़ आता पोटोबाचा प्रश्न उपस्थित होता़ स्वयंपाक काय करावा, असा विचार करीत डायनिंग चेअरवर बसलो़ भाजी नेमकी करावी, ही समस्या महाकठीण भासली़ शिवाय खिचडी खावून खावून माझीच खिचडी होण्याची वेळ आली होती़ पोळ्यातर मला जमत नव्हत्या़ मागील तीन-चार दिवसांपासून पोटाचं तंत्र पार बिघडून गेलंलं़ करणार काय? आमच्या ‘होम मिनिस्टरां’चा ‘माहेर दौरा’ सुरू होता़़़
तसं वाद होण्याचं कारण नव्हतंच मुळी! मनीषानं मात्र ‘राई’ला ‘उंची’ देत तिचा ‘पर्वत’ केला़ त्या सायंकाळी आॅफिसमधून आल्या आल्या तिनं बँकेचं पत्र माझ्या हाती ठेवलं़
‘‘बाप रे! दहा हजार रुपये़़़ पुढील महिन्यात.़़’’ मी त्या पत्रावरून नजर फिरवत म्हणालो. मी तिच्याकडं बघितले़ ती मौन होती. ती चहा बनविण्यासाठी किचनमध्ये गेली़ मला संकटं फडफड करत माझ्याच आजूबाजूला घिरट्या घालत असल्याची जाणीव झाली़ आता कुरुक्षेत्रावरील परिस्थिती कशी हाताळावी, हा मोठा प्रश्न होता़ बचावाची शक्यता नव्हतीच़; पानिपतही होऊ द्यायचं नव्हतं. तरीही आता सरळ धडक होणार, हे जवळजवळ निश्चितच! घरात तशी पार्श्वभूमी तयार होती़ आल्यापासून मनीषाचा मूड काही वेगळाच दिसत होता़ कुठून तरी सुरुवात करणं गरजेचं होतं म्हणून मी जवळ जात विचारलं,‘‘काय गं, काय झालं? ’’
‘‘काही नाही….?’’ असं म्हणत ग्लासमध्ये पाणी दिलं़ घशाला कोरड होतीच़ दोन ग्लास पाण्यानं सिंचन केल्यानं बरं वाटलं़ हॉलमध्ये आल्यानंतर मी परत विचारलं, ‘‘अशी गप्प का?’’
माझ्या हाती चहा कप देत म्हणाली़,‘‘बँकेचं पत्र दुपारीच आलंय़’’
मला गप्प पाहून ती म्हणाली, ‘‘मी म्हणते, एवढी रक्कम आता कशी काय भरू शकू आपण?’’
माझ्या लक्षात आलं, की मूळ मुद्दा ते पत्र होतं़
‘‘अगं भरूयात.’’ मी ते सहजरित्या नेण्याचा प्रयत्न केला़ निदान यावेळी तरी तिच्या डोक्यावर ताण द्यायचा नव्हता़ असे असले तरी मी मात्र आतून हादरलो़
‘‘कुठून आणणार एकाच वेळी इतकी रक्कम? काही कमी रक्कम नाही़ सोंग आणता येत नाहीत पैशांचं आणि कुठली लॉटरीही लागली नाही किंवा लागणारी नाही. चिंटूच्या वेळी मला नोकरी सोडायला लावली. आज कदाचित त्याच पैशांची मदत झाली असती. कर्जही लवकर फेडता आलं असतं.’’
अद्यापही ती चिडलेलीच होती. ती मैदानात उतरण्यास तयार होती, अगदी जय्यत. केवळ शस्त्र हवेत उडवणे बाकी होते.
‘‘अगं चिंटूकडंही लक्ष देणं महत्त्वाचं होतं.’’ मी मत मांडलं़
‘‘अहो, डिलिव्हरी लीव्ह मंजूर झाली होती ना! आणि घर बांधतानाही विचार केला नाही. कर्ज काढून सोहळे करायला मला नाही आवडत.’’ ती माझ्यावर कुरघोडी करीत होती. दुसरीकडं तिला शांत करण्याचा माझा प्रयत्न सुरू होता़
‘‘अगं, पण़़़ आपण असं कितीसं कर्ज काढलं? आणि कर्जाचे हप्ते भरतोय ना!’’ माझी सारवासारखी सुरू होती.
‘‘…तेही हफ्ते दोन महिन्यांपासून रखडलेत. बँक मॅनेजर परिचयाचे असल्यामुळे बाबांनी तेवढी सवलत मिळवून दिली.’’
‘‘रखडले म्हणजे तू बघतेस ना! घरातील खर्च तुला माहित आहे़ चिंटूच्या अ‍ॅडमिशनमुळं, विम्याच्या प्रिमियममुळं थोडा डिस्टर्ब झालाय… परत एकदा तुझ्या बाबांनी…’’ मी हळूच तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
‘‘… काही नको. आपल्यामुळं त्यांचे संबंध बिघडायला नको. तुमच्या पगारात काही दिवसांत तरी हे शक्य दिसत नाही.’’ तिनं एका वाक्यात निर्णय बोलून आपला पुढील मार्ग मोकळा केला. आणि माझ्या कमाईच्या सार्वभौमत्वावर हल्ला केला़ यातून सरळ-सरळ संघर्षाचा पवित्रा घेतल्याचं स्पष्ट झालं़ तिची तलवार म्यानमध्ये सळसळत होती.
तिच्या या बोलण्यानं ‘कुरुक्षेत्र’ जवळच असल्याचा भास झाला़ पानिपत माझंच होणार हेही निश्चित होतं. शेवटी महाभारत एका स्त्रीमुळं घडलं, हे पौराणिक सत्य माझ्यापुढं होतं़
‘‘मग तुच का नाही करत नोकरी?’’ आता माझाही आवाज वाढला़ माझ्या या वाक्यानं पुढं काही होईल, असं वाटलं नव्हतं़ तसा माझा उद्देशही नव्हता़
‘‘हो! करणारच मी नोकरी… माझी जबाबदारी समजते मला. चिंटू मोठा झालायं. कळतं आता त्याला सर्व.’’ असं म्हणत ती किचनमध्ये गेली़ तिथं चाललेल्या आदळआपटीवरून तिची सर्व बाजूंनी तयारी असल्याचं लक्षात आल़ं अर्थात तिच्या आतापर्यंतच्या बोलण्यावरून मोर्चाबांधणी कधीचीच झाल्याचा भास मला होऊ लागला.
‘‘जबाबदारीची जाणीव केवळ तुलाच… नाही का? माझं सर्व केरात़़़व्वारे वा!’’
तिच्या संतापाला हवा देणारं बोललो असलो तरी मी सावध पवित्रा घेतला होता.
मलाही या प्रकाराची चीड येत होती़ प्रत्येकवेळी ‘नोकरी सोडली़़़नोकरी सोडली’, असं तिचं टुमणं सुरू असायचं़
ठिणगीनं आता पेट घ्यायला सुरुवात केली होती. तिनं आगीचं स्वरूप घेऊ नये, इतकीच माझी अपेक्षा होती; परंतु सध्याची स्थिती बघता तेही शक्यच दिसत होतं. तेवढ्यात चिंटू आल्यानं तो विषय तिथंच संपला आणि मोठा संघर्ष टळला. तिनं आपली ‘जीभ’रुपी तलवार म्यान केली़ मनातून सुखावत चिंटूला धन्यवाद दिले. तरीही घुसमट होतीच़ त्यानंतर दोन-चार दिवस अबोलपणात गेले़ चिंटूच काय तो आम्हा दोघांशी संवाद साधत होता. तिथून तिसºयाच दिवशी ती चिंटूसह वर्धेला माहेरी निघून गेली. माझ्या मोबाईलवर ‘एसएमएस’ पाठवून तिनं बोलणं टाळलं़
़़़आणि अचानक मी जागेवरून ताडकन् उठून उभा झालो.
कारण समोरील घड्याळात नऊ वाजायला आलेले. आता तर माझी चांगलीच धांदल उडाली. शेगडीवर आंघोळीसाठी पाणी ठेवलं. नंतर जेवणाचं काय, असा प्रश्न माझ्या पुढ्यात होताच. शेवटी ‘मेस’मध्ये जेवण्याचं पक्कं केलं़ एवढ्यात मोबाईलची रिंग धडपडली.
‘‘हॅलो पापा, गूड मॉर्निंग़..’’
‘‘व्हेरी गूड मॉर्निंग. हं…बोल बेटा़ कधी येतोस़’’ त्याच्या आवाजानं मला गहिवरून आलं़
‘‘पापा, आम्ही उद्या येतोय.’’
‘‘अरे व्वा!’’
‘‘घरी आल्यानंतर मम्मी तुम्हाला एक ‘गूड-न्यूज’ सांगणार आहे.’’ तो उत्साहितपणे म्हणाला़
‘‘कुठली रे?’’ माझ्या शब्दात आतुरता होती.
‘‘सॉरी पापा, ते मला माहिती नाही. मम्मीला आजीशी बोलताना मी अगदी थोडसं ऐकलंय.
तिच सांगेल तुम्हाला. बरं…हाऊ आर यू?’’
‘‘मी ठीक आहे; पण तू लवकर ये.’’
‘‘हो पापा, आय लव्ह यू?’’
‘‘यू टू़़़’’
कुठली गूड न्यूज असावी, अशा विचारात असतानाच मला आॅफिसची आठवण झाली. सरळ बाथरूममध्ये शिरलो आणि सर्व आटोपूनच बाहेर पडलो. कपाटात जिन्स पँट दिसत नव्हता. शर्टची एक बटण तुटली होती. नाकानं आॅक्सिजन घेण्याइतपतच अनिवार्य असल्यामुळं कपडे अंगावर चढवले. कुलूप ठोकून पोर्चमध्ये आलो तर गाडी सुरू होत नव्हती. होणार कशी, त्यात पेट्रोलच नव्हतं. सरकार दर तीन महिन्यांनी भाव वाढवून सामान्य नोकरदारांच्या खिश्यावर डल्ला मारत होते़ काही दिवसांपूर्वी मी सायकलच वापरण्याचा निर्णय घेतला होता; पण इतरांसारखाच बडेजावपणा मलाही चिकटला होता़ ‘स्टेटस्’ नावाचं गोचिड चिकटलं होतं़ आणि मुख्य म्हणजे आजच्या या धावपळीच्या दिवसांत दुचाकी असणं ही काळाचीच गरज होती़ मग डोकं शांत ठेवलं. नंतर आठवलं की पंप घराशेजारीच आहे. उशीर झाला तर ‘लेटमार्क’ होताच. आणि उम्याबरोबरच माझी साहाय्यक प्रियंकाचा निरोप कॅबिनमध्ये पाय टाकल्याबरोबर मिळाला असता. गाडीत पेट्रोल टाकलं़ एका मध्यमवर्गीय खानावळीत दोन घास पोटात ढकलून आॅफिसमध्ये शिरलो. टकलू तेलपाणे यांचे अद्याप आगमन बाकी होतं. म्हणून थोडक्यात निभावलं़ नाही म्हणता पाच मिनिटं उशीर झालाच.
दुसºया दिवशी रविवाऱ छान सकाळी दहापर्यंत ताणून दिली. आमच्या मॅडमचा ‘माहेर दौरा’ सुरू झाल्यापासून माझी झोप पार उडाली होती़ नंतरचे सर्व कार्यक्रम आरामानंच आटोपून घेतले. माझं सर्व लक्ष दोघांच्याही पावलांकडं़़़ एकदोनदा कॉल केला; पण नॉटरिचेबल! बसमध्ये असल्याने कदाचित रेंजमध्ये नसावा. तोपर्यंत बारा वाजले़ जेवणात छान पोळ्याच करायचं ठरविलं. मात्र, ती कणीक मळता-मळता मी नाकीनऊ आलो. सुरुवातीला कणकेत पाणीच खूप पडलं़ पेस्टच तयार झाली़ त्यानंतर पुन्हा त्यात कणकेची भर टाकली, तर मोठा गोळा तयार झाला़ जवळपास दहा-एक लोकांना पुरतील इतक्या पोळ्या बनू शकणार होत्या़ इतक्या कणकेचं काय करणार, असा प्रश्न उभा राहिला़ पहिली पोळी कशीबशी लाटून तव्यावर टाकली. तिचा आकार श्रीलंकेसारखा झाला. दोनदा तर तिला योग्य मापदंडात बसविण्याचा प्रयत्न केला. माप काही सापडत नव्हते आणि हवा तो आकार येत नव्हता. शेवटी म्हटलं आकार काय, निराकार काय पोळी पोटातच तर जाणार आहे़ म्हणून सगळ्या पोळ्या वेगवेगळ्या साचात बसवल्या़ भारतासह श्रीलंका,नेपाळ, म्यानमार असे देश अवतरले होते़
तेवढ्यात दारावर किलबिल झाली. दार उघडलं. समोर चिंटू उभा. मला बघताच तो अंगाला बिलगला. मॅडमचं लक्ष माझ्या हाताकडं गेलं.
‘‘चिंटू, अगदी वेळेवर आलोय आपण. स्वयंपाक सुरू दिसतोय. चल लवकर पोटपुजा करूयात़’’ अर्थातच टोमण्याचा इशारा माझ्याकडंच होता.
इतक्यात किचनमधून कसला तरी गंध आला़ मी आत पळालो. कारण पोळी तव्यावर होती. किचनमध्ये आलो तर ती लंकेसारखी खाक झाली. हसत हसत पुढं होऊन तिनं गॅस बंद केला. बाईसाहेबात बराच बदल झाला होता़ केसातील गजºयानं मी आणखी धुंद झालो. सरकलो तिच्याजवळ!
‘‘कुठली गोड बातमी आहे?…चिंटू सांगत होता़’’ मी कानोसा घेत हळूच विचारलं.
‘‘तुम्हीच ओळखा बघू़’’ तिनं प्रतिप्रश्न केला़
‘‘आम्ही काय ओळखणार? माझ्यासाठी तुम्हीच गोडगोड!’’
‘‘चिंटूसोबत खेळण्यासाठी कुणीतरी येतयं.’’ ती माझ्या कुशीत शिरत उत्तरली.
‘‘अरे व्वा ! म्हणजे आम्ही ब्बाप होणार!’’
‘‘अहो हळू बोला़’’ मी म्हणाली़
मी अत्यानंदित होत तिला घट्ट मिठी मारली़.

लेखक
संजय मुंदलकर
(सर्वाधिकार सुरक्षित)
9552981514

*****