ब्लाईंड रिलीफ असोसिएशनचे कार्य समाजासाठी आदर्शवत : राज्यपाल

उपराजधानी नागपूर

नागपूर : नेत्रहिनांसाठी शहरातील दि ब्लाईंड रिलीफ असोसिएशन निष्ठेने करीत असलेले  कार्य हे  या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांसाठी आदर्शवत आणि एक मानदंड निर्माण करणारे असल्याचे, प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी [ Governer Koshyari ] यांनी आज केले.

राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आज शहरातील दक्षिण अंबाझरी मार्गावरील ‘दि ब्लाईंड रिलीफ असोसिएशन’ला भेट दिली. त्यानिमित्ताने संस्थेच्या  नवदृष्टी सभागृहात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे, सचिव  नागेश कांडगे उपस्थित होते.

प्रारंभी त्यांनी परिसरातील संस्थेच्या अंध विद्यालयास भेट दिली. यावेळी अंध जलतरणपटू ईश्वरी पांडे यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. कोश्यारी यांचे स्वागत केले. राज्यपालांनी संस्थेचे संस्थापक स्व. रावसाहेब वामनराव वाडेगावकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास अभिवादन करून तेथील परिसरात वृक्षारोपण केले. अंध विद्यालयातील अभ्यासिका, ब्रेल संगणक कक्ष, कार्यशाळेची पाहणी केली. संस्थाध्यक्ष श्री. पांढरीपांडे यांनी अंध विद्यालयाची माहिती यावेळी दिली.

सूरदासांच्या अवीट रचनांचा दाखला देत श्री. कोश्यारी म्हणाले की, दिव्यांग हे उच्च प्रतिभेचे धनी असतात. समाजात आजूबाजूला शारीरिक व्यंगत्व असणाऱ्यांकडे कलेचे विशेष अंग असल्याचे दिसून येते. त्यांचा न्यूनगंड दूर करून त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेचे कार्य हे कौतुकास्पद आहे. नेत्रहीनांना स्वावंलबी करणारी ‘दि ब्लाईड रिलीफ असोसिएशन’ ही दिव्यांग विकासाचे देशातील  उत्कृष्ट मॉडेल करू शकणारी संस्था आहे. 1928 पासून नेत्रहीनांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली ही संस्था आजही तितक्याच निष्ठेने आणि समर्पण भावनेने कार्य करत आहे. मानवसेवा हीच ईशसेवा असल्याचे सांगून भविष्यात  संस्थेला अपेक्षित सहकार्य करण्याबाबत राज्यपालांनी आश्वस्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *