राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची महात्मे नेत्रपेढी व रुग्णालयाला भेट

उपराजधानी नागपूर

नागपूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज शहरातील महात्मे नेत्रपेढी व रुग्णालयाला सदिच्छा भेट देऊन रुग्णालयाच्या विभागांची पाहणी केली. खासदार व नेत्रतज्ञ डॉ. विकास महात्मे उपस्थित होते.

1986 पासून एस. एम. एम. आय वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हे नेत्र रुग्णालय व पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्था चालविण्यात येते. याशिवाय विविध समाजसेवी उपक्रमही संस्थेतर्फे राबविण्यात येतात. त्याअंतर्गत असंख्य रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले आहेत, याबद्दल राज्यपालांनी प्रशंसोद्गार काढले. नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दानापैकी एक आहे व सर्वांनी नेत्रदानाचे इच्छापत्र भरून द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

ग्रामीण भागातून दहावी – बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महात्मे रूग्णालयाकडून चालविण्यात येत असलेल्या अभ्यासक्रमाची माहिती श्री. महात्मे यांनी दिली. रोजगाराची हमी देणारा ऑप्थॅल्मिक टेक्निशियन कोर्स युवकांचे सबलीकरण करण्यासाठी उपयुक्त असल्याची माहिती डॉ. महात्मे यांनी राज्यपालांना दिली.

रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापक , विद्यार्थी व पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त सर्वश्री मधुकरराव काळमेघ, अनिल वैरागडे, डॉ. सुनिता महात्मे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कानडे, डॉ. निखिलेश वैरागडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *