Home राजधानी मुंबई 40 लाख लोकांना मिळाले हक्काचे छत : ग्रामविकासमंत्री

40 लाख लोकांना मिळाले हक्काचे छत : ग्रामविकासमंत्री

47

MUMBAI CAPITAL : महाआवास अभियानामध्ये आज गृहप्रवेश केलेली ३ लाख २३ हजार कुटुंबे आणि बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर असलेली ४ लाख ६८ हजार कुटुंबे अशा एकूण ८ लाख कुटुंबांची सरासरी सदस्य संख्या लक्षात घेतली तर सुमारे 40 लाख लोकांना घरकुलाचे छत मिळाले आहे. कोरोनाचे संकट असतानाही सर्व यंत्रणेने एकजुटीने हे अभियान यशस्वी केले. भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यात आली. गवंडी प्रशिक्षण, घरकुल मार्ट, बहुमजली इमारती, गृहसंकुले यांसारखे वेगवेगळे प्रयोग करुन घरांचा दर्जा चांगला राहील यासाठी दक्षता घेण्यात आली. आता चालू वर्षात प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्यांनाही घरे देण्यात येतील. राज्यात ग्रामीण भागात स्वत:चे घर नाही असे एकही कुटुंब बाकी राहू देणार नाही, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, ग्रामविकास विभागाने विविध विभागांच्या सहयोगातून महाआवास अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविले. अनुसूचित जाती, जमाती यांनाही सामाजिक न्याय, आदिवासी विकास यांच्या योजनेतील घरकुलांचा लाभ देण्यात आला. त्यामुळे वंचित घटकांचा सामाजिक स्तर उंचावण्यात या अभियानाचा मोठा फायदा झाला. यापुढील काळातही सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसुचित जातीतील लाभार्थ्यांसाठी घरकुल योजनांकरिता भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, कोरोना संकटाच्या काळात ग्रामविकास यंत्रणेने महाआवास अभियानाद्वारे केलेली कामगिरी अभूतपूर्व अशी आहे. या योजनेद्वारे गोरगरीब, वंचित घटकांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळाला. अभियान काळात उद्दिष्ट निश्चित केलेले सुमारे ८ लाख घरकुलांपैकी आज ३ लाख २३ हजार जणांचा गृहप्रवेश झाला आहे. उर्वरीत लाभार्थीही महिन्याभरात गृहप्रवेश करतील. सामान्य लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये या अभियानाने महत्वपूर्ण योगदान दिले आहे, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते ‘महाआवास अभियान-यशोगाथा’ या पुस्तिकेचे आणि राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाची दिनदर्शिका (शैक्षणिक वर्ष) चे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर ‘महा आवास’ संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला.