Home राष्ट्रीय जंगल व्यवस्थापनामध्ये आदिवासींचा सहभाग असावा

जंगल व्यवस्थापनामध्ये आदिवासींचा सहभाग असावा

26

नवी दिल्ली : आदिवासी लोक आजही मोठ्या संख्येने जंगलाच्या सानिध्यात राहतात.  त्यामुळे आदिवासी लोकांचा जंगलांचा चांगला अभ्यास आहे. केंद्रीय वने विभागाने महाराष्ट्रातील 24 लाख एकर जंगलात 13, 500 संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापित  केल्या आहेत. या समित्यांमध्ये आदिवासी लोकांचा सहभाग असावा. अथवा नव्या योजनेव्दारे आदिवासींचा सहभाग करण्यात यावा, अशी मागणी राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर आणि आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांची भेट घेऊन केली.

श्री. झिरवाळ यांनी केंद्रीय मंत्री श्री जावडेकर आणि श्री मुंडा यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना निवेदन सादर केले. या बैठकीत राज्यातील आदिवासींशी निगडीत अनेक विषयांवर चर्चा झाली. तसेच, आदिवासांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे संबंधितांना निर्देशित करण्याची, मागणीही श्री. झिरवाळ यांनी केली.

जंगलांमध्ये इको पर्यटन सुरू करावे : आदिवासी समाजाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जंगलांध्ये इको-पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात यावे, अशी मागणी श्री झिरवाळ यांनी आजच्या बैठकीत केली. यामुळे आदिवासी समाजाला नवीन रोजगार मिळेल. वैविध्यपूर्ण वन संपदा राज्यात आहे. त्याचा परिचय सर्वदूर करण्यासाठी आणि जंगलांचे महत्व पटविण्यासाठीही इको-पर्यटन महत्वाचे ठरेल, असेही श्री झिरवाळ यांनी बैठकीनंतर सांगीतले.

जंगलात वास्तव्यास असणारा आदिवासी जंगलातील लाकडावर अवलंबून असतो. त्यांची ही अवलंबितता कमी करण्यात यावी यासाठी त्यांना सौर ऊर्जा पंप, सौर ऊर्जा स्टोव्ह आणि सौरदिव्यांसह गॅस कनेक्शन देण्याची मागणी, श्री. झिरवाळ यांनी केंद्रीय मंत्री श्री. मुंडा यांच्याकडे केली.