Home साहित्य-संस्कृती अभिसांज ... एक कथा विदर्भाच्या मातीतील बक्षीसप्राप्त ग्रामीण कथा : कमाई (भाग २)

विदर्भाच्या मातीतील बक्षीसप्राप्त ग्रामीण कथा : कमाई (भाग २)

59

लेखक: संजय इस्तारी मुंदलकर

(वाचा मागील अंकावरून पुढे अंतिम भाग)

…आताबी मायनं थ्या पाटलीनच्याच घरी जायाले सांगतलं व्हतं. मंग मी पाटलीनवर दात-होठ खात उठलो. गाय अन् वासराले पानी पाजलं. गाय गोयनात नेऊन घातली. तिकून आल्यावर आजीले आंघोईचं पानी टाकून देल्लं. मिनंबी लाईफबाय साबनीनं चांगलं आंग धुतलं. भांग-चांग केला. भोल्याच्या फोटोचं दर्शन घेतलं. बापाच्या फोटोलेबी अगरबत्ती लावली. आजीले जेवाचं वाढून देल्लं. पाटलीनचा राग म्हून मी एक भाकर जास्तीच जेवलो. खरकटे भांडे धुऊन ठुले. आजीले सांगून तंबाकू घोटत वाड्याकडं निंगालो. रस्त्यामंधीच म्हा लंगोटीयार शिºया भेटला. त्याले एक चिमूटभर तंबाकू देल्ला अन् म्होरं निंगालो.
वाड्याच्या मोठ्या दरवाज्यात पाय ठुल्याबरूबर पाटलीनचं डोमडं कुत्रं म्हावर भुकलं. बेज्जा राग आला. मिनं घेतलं तितचंच एक टेम्प अन् टाकला एक झोडपा लेकाच्या आंगावर. तसं थे कुई कुई करत अंदर पयालं. डोम्याचा अवाज आयकून, काय झालं रे, शेरू?, असं बडबडत पाटलीन बाहीर आली. मी दिसल्याबरूबर थे म्हनते कशी, ‘‘अं… तू होय का गणेश?’’
‘‘व्हय…’’ मनं बेंच्यावर फतकल मारत म्हनलं.

पाटलीन मंग कायीतरी कामासाठी अंदर गेली. तवा तिचं थे डोमडं कुत्र पुन्ना बाहीर आलं अन् मले पाह्यल्याबरूबर थे असं पयालं का इचारता सोय नायी. पाटलीनची पोपटपंची सुरू झाली, ‘‘बरं झालं तू आला तर. लक्ष्मी सांगत होती क तू घरीच असतो म्हणून!’’ तवा मले मनात वाटलं का, ‘मी घरी नसतो तं कुठं असतो? पाटलीन काहून असी बोलून राह्यली.’
‘‘काय काम हाये? मायनं पाठोलं म्हून आलो.’’ मिनं जरा टरकावूनच ईचारलं.
‘‘अरे काम म्हणजे, आपल्या तीन म्हशी दुधाच्या आहेत. दोन गायी सुद्धा दूध देते. आता दूध नाही खपत आपल्या गावात, म्हणून माझा विचार असा आहे, की तू हे सर्व दूध बाभुळगावला नेऊन देत जाशील काय?’’
तवा मले वाटलं, हे काय पाटलीनच्या दिमाखात नवं खूय. एवढं मोठं घर. दोन पोरं, दोन पोरी, येणारे-जाणारेबी लयी. एवढ्या झनाले बक्कळ दूध लागल्यावरबी ही पाटलीन दूध इकाच्या गोस्टी करत व्हती. मले तचं कायी पटलं नायी. पन तयार झालो. मिनं पाटलीनले म्हनलं, ‘‘…नेईन…पन…?’’
‘‘अरे, आपल्या राजूची सायकल आहे. रोज सकाळी सायकलवरून त्या शंकरच्या हॉटेलमध्ये दूध मोजून देणं आणि परत येणं बस्स!’’ पाटलीन सांगत व्हती. खूप टायमानं मी त्याले कबूल झालो.

झालं मंग दुसºया दिसापासून दुधाच्या चार-पाच डबक्या घऊन बाबुयगावच्या ईस्टँडवर शंकरच्या हाटीलात नेऊन देत व्हतो. दूध मोजून झाल्यावर शेजारच्या पानठेल्यावर तंबाकू घोटत मी गावाकडं वापस येत व्हतो. कधी-मंधी ईस्टँडले एखांदी चक्करबी मारत व्हतो. थ्या शंकरच्या हाटेलापाशीच एक बुडा गोया, भिस्कटं, खरमुरे, चिरमुरे घिऊन बसत व्हता. तंबाकू देण्या-घेण्यातून त्याच्याशी म्हायी ओयख झाली. मिनं त्याले आबाजीच करून टाकला. एका दिसी थ्या आबाजीनं मले इचारलं, ‘‘काय रे गण्या, पाटलीन तुले काय रोज देते?’’
‘‘दाहा रुप्ये.’’
‘‘परोडते तुले?’’ आबाजीनं बडीचा झुरका घेत इचारलं.
‘‘आता सायकल पाटलीनचीच हाये. तवा परोडतेच म्हनाचं.’’ मिनं सांगतलं.
‘‘…पन हे दरोजच तंगडे दुखोनं. त्यापरीस म्हासारखा धंधा काहून नायी करत, बरेडचाबी धंधा चांगला हाये.’’

तसा मले आबाजीचा इचार पटला व्हता, पन मायचं काय? राधासंग लगीन कराचं म्हंजीन कायी तरी येगय कराले पाह्यजे व्हतं. राधा चुलतमामाची पोरगी असली तरी थे सून म्हून म्हा घरात येनं जरा कठीनच व्हतं अन् ह्या धंध्यासाठी गाठीले पैसाबी लागनार व्हता. हे काम कायी सोपं नोतं. मंग ईचार करून मिनं डबलरोटीचा धंधा कराचं ठरोलच. राधालेबी सांगतलं. मायले मातर याच्यातलं कायीच सांगतलं नायी. तिनं मले हे काम करूच देल्लं नसतं. सकायी दूध पोचून घरी येतायेता दाहा-बारा वाजत व्हते. कवाकवा पाटलीन म्हैशीचा कोठाबी झाडाले सांगत व्हती. मंग दातहोठ खाऊन मले थे करा लागत व्हतं.
एका दिसी मिनं पाटलीनले हिसोब मांगतला. मले बरोबर पंदरा दिवस झाले व्हते.
‘‘काय करतं इतके पैसे घिऊन?’’ पाटलीननं ईचारलं.
‘‘धंधा करनार हाये मी डबलरोटीचा.’’ मिनं सांगतलं.
‘‘पहातेच आता मी हा धंदा किती दिवस चालते तर!’’ असं बोलून पाटलीनं फनकाºयानं अंदर गेली. तवा मले तचा बेज्जा हासा आला.

घरी आलो. डोक्स जरा हलकं वाटलं. म्हां घरी एक जुनी सायकल व्हती. म्हा बापाले त्याच्या मावसभावानं देल्ली व्हती. मिनं तिले बाबुयगावले नेऊन टनटन करून आनली. राधानं थोडे पैसे उसने देल्ले. शंभर-दोनशेचा माल इकत आनला अन् केला लेकाचा धंधा सुरू! सकायी गावात हिंडल्यावर शेजारच्या गावातबी हिंडत व्हतो. पाटलीनच्या वाड्याम्होरून गेलो तं घंटी वाजोत व्हतो. समजा, तिच्यासंग नजरानजर झाल्लीच तं पाटलीन म्हाकडं मारक्या म्हशीसारखी पाहात व्हती. मी मातर मनातच हासो.

अशाच एका दिसी मी म्हा गल्ला मोजत व्हतो. बाजूले आजीबी बसली व्हती. मी ह्या धंध्याले लागलो म्हून आजी लयी खूस व्हती. तवा माय चवतायत म्हा आंगावर आली अन् म्हनते कशी, ‘‘काहून रे गण्या, धंधा सुरू केला तं केला, थ्या पाटलीनले पाह्यल्यावर सायकलची घंटी काहून वाजोतं? थे काय तुले सोयासतरा वर्साची पोरगी दसते… कायले तिच्यासंग हेकडपणा करतं?’’
‘‘काहून त्याच्यामांगं लागली लक्ष्मे…!’’ आजीनं म्हायी बाजू घेतली.
‘‘मंग काय करू तं? तिनं मले कामावून बंन केलं… खा आता मले भाजून.’’ मायनं कापसाचं फडकं खाली आपटत म्हनलं.
मायचा पट्टा सुरूस्स व्हता. मिनं गुपचूप आयकून घेतलं. मंगश्यानं मान तिरपी करून म्हनलं, ‘‘मोठ्ठी चांगलीच हाये थे पाटलीन. कामाचे पैसे तरी बरूबर देते काय?… का ढोरासारखं कामचं करता तिचं. साध्या तुरीच्या शेंगा अन् मूठभर हरभरा आनला तं झोपीत उसनते… अन् बंन केलं म्हून काय झालं, म्हांत ताकत हाये ना तुले पोसाची… काय वो आजी, बरोबर हाये का नाय!’’
‘‘हो रे गण्या!’’
तवा माय म्हांकडं डोये वटारून पाह्यतच राह्यली.

झालं ह्या धंध्यात गाठीले पैसा येत व्हता. मातर थ्यासाठी मले सायकलने फिरा लागत व्हतं. एका दिसी मी शिºयासंग गायीच्या गवतासाठी रामा चोपड्याच्या पडतात गवत कापत व्हतो. तिकून येतानी बेंबळेच्या काठावरच्या निंबाखाली बसलो. शिºयानं तंबाकू घोटत मले ईचारलं, ‘‘काय रे गण्या, तुया धंध्यात नफाबिफा हाये का नायी?’’
‘‘आता शिºया, तसं पाह्यलं तं हायेबी अन् नायीबी.’’
‘‘म्हंजीन?’’
‘‘अरे, सायकलनं मले दरोज दोन-चार गावं फिरा लागते. त्याच्यातच लय टाईम जाते. म्हून म्हा ईचार हाये का, गावातच दुकान सुरू करावं.’’
‘‘तुही आयड्या तं चांगली हाये; पन त्यासाठी पैसा लयी लागन. त्याचं काय?’’
‘‘शिºया, दुकान सुरू कराचं कारनबी दुसरंच हाये.’’
‘‘कोन्तं बे?’’
‘‘अरे शिºया, दुसºया कोनाच्या वावरात काम करून मले राधा अजिबात मियनार नायी.’’
‘‘तं अस्स व्हयं… गण्या तू तं चालू मानूस निंगाला.’’
‘‘हो रे, राधासाठी तेवढं तं कराच लागन.’’
‘‘ठीक हाये गण्या, मी देतो तुले पास्से रुप्ये. लाव छातीले माती अन् लाव दुकान.’’
झालं… मायनंबी म्हा दुकानाले हासत हासत परवानगी देल्ली; कारन का तिलेबी राधा पसंत व्हती. तिथून मोजून चारच दिसांत मिनं दुकानाम्होरं नारय फोडलं.

(सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित)

*****