Home साहित्य-संस्कृती काव्याभिलाषा काव्याभिलाषा … काय बोलला पाऊस ? सांगा मातीच्या कानात

काव्याभिलाषा … काय बोलला पाऊस ? सांगा मातीच्या कानात

69

मेळा

गच्च भरल्या मेघात
बघ दाटला पाऊस…
सरीतून ऐकेन मी,
त्याच्या मनातले गूज

सरी उतरल्या खाली
पायी बांधुनिया चाळ…
शिवारात रांगणार,
आता पावसाचे बाळ

मोरपीस अलगद
तशा झरतात धारा…
वार्‍यासवे पावसाचा,
आला फुलून पिसारा

काय बोलला पाऊस ?
सांगा मातीच्या कानात
स्वप्न हिरवे फुलले,
तिच्या प्रत्येक कणात

जणू वाटावा विठ्ठल
तसा पाऊस सावळा
ढग वारकरी सारे,
त्यांचा आभाळात मेळा

उज्वला सुधीर मोरे (देबाजे)
वाशिम

(कवयित्री उज्वला मोरे काव्यासह ललित लेखन करतात़. तसेच, शिक्षिकाही आहेत.) (सर्वाधिकार सुरक्षित)

***

पावस

तुझ्या संगती प्रिय पावस रुसला का
रे सख्या……मन भावन रुसला का

मी ही होते तुझीच तुझी
कोसळल्या सरी अन् सरी
थेंबात दाटे आठवणी किती
श्वास विसरला प्रीतगाणी का
रे सख्या……मन भावन रुसला का

मन माझे बहरात न्हाले
आभाळ धुंद भरून आले
मोहरली ऋतू पालवी शहारली
पाठी पेटला वणवा का
रे सख्या……मन भावन रुसला का

संजय मुंदलकर
नागपूर

(कवी हे पत्रकार असून कथालेखकही आहेत.)

(सर्वाधिकार सुरक्षित)

*****