Home रानशिवार यत्र तत्र सर्वत्र … खास बातम्या

यत्र तत्र सर्वत्र … खास बातम्या

27
बकरी ईद संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई :  कोविड-19 मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी 21 जुलै राजी बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.  कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.

सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.

***

खनिकर्म निविदा प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : खनिकर्म महामंडळातील निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी नागपूरच्या विभागीय आयुक्तांची एकसदस्यीय समिती गठित करण्यात आली असून या समितीला एक महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.

आ. नाना पटोले यांनी नागपूर खनिकर्म महामंडळ व महाजनको यांच्यादरम्यान कोळसा पुरवठा व स्वच्छ करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची श्री. देसाई यांनी  तात्काळ दखल घेऊन उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह यांना पुढील कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार शासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांची एकसदस्यीय समिती गठित केली आहे. एक महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या संदर्भातील शासन आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. दरम्यान, महाजनको आणि नागपूर खनिकर्म महामंडळ यांच्यात ही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. प्रक्रियेशी राज्य शासनाचा थेट संबंध नसल्याचे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.

***

कोविड प्रतिबंधक लसीमुळे नंपुसकत्व नाही

दिल्ली : कोविड प्रतिबंधक लसीमुळे नंपुसकत्व येत नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या संदर्भात माध्यमांतून विविध स्वरुपाच्या बातम्या प्रसारित होत आहेत, त्याचे खंडन मंत्रालयाने केले आहे.

या प्रचाराला कुठलाही वैज्ञानिक आधार नसून पूर्ण परीक्षणाअंती संपूर्ण सुरक्षितता लक्षात घेऊनच लसींच्या वापराला मंजुरी मिळाली असल्याचंही कोविड-१९ कृती दलाचे अध्यक्ष डॉ एन. के.अरोरा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता लसीकरण करुन घेण्याचे आरोग्य मंत्रालयाने आवाहन केले आहे.

*****