Home उपराजधानी नागपूर पिवळी नदीवरील पुलामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत : डॉ.नितीन राऊत

पिवळी नदीवरील पुलामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत : डॉ.नितीन राऊत

39

नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पिवळी नदीवर बांधण्यात आलेल्या  पुलामुळे उत्तर नागपूर परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार असून या पुलामुळे या भागातून शहराकडे होणारे दळणवळण सोपे होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले.

पिवळी नदीवर [ PIVALI RIVER] बांधण्यात आलेल्या पुलाच्या लोकार्पण सोहळा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नागपूर शहरातील वांजरा येथे केंद्रीय मार्ग निधीतून 24 कोटी 96 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पिवळी नदीवरील पन्नास मीटर लांबीच्या पुलाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज झाले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार गिरीश व्यास, कृष्णा खोपडे आदी उपस्थित होते.

पावसाळ्यात या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची या पुलामुळे गैरसोयीपासून सुटका होणार असून यामुळे या भागातून शहराकडे जाणारे दळणवळण सोपे होणार असल्याचे श्री.राऊत यांनी सांगितले.

हा पूल रिंग रोड वांजरा बाजूच्या औद्योगिक क्षेत्राशी जोडणारा मुख्य मार्ग असून उत्तर ते पूर्वेकडील भागात मुख्य रस्ता म्हणून वापरला जातो. विटा भट्टी व वांजरा बाजूच्या मुख्य क्षेत्राला जोडणारा भाग आहे. पूर परिस्थितीत सुद्धा दळणवळण सुलभ होणार आहे. पुलाच्या एकशे पन्नास मीटर पुलावरील दोन्ही बाजूंची फरसबंदी करण्यात आली आहे. 1.5 मीटर दोन्ही बाजूंनी रुंद आरसीसी ड्रेन व त्यावर स्लॅब फुटपाथ, सहाशे मी.मी. पाईप लाईन, रस्त्याच्या दुतर्फा सेवासुविधा आदी या कामाची वैशिष्ट्ये आहेत, असे प्रास्ताविकात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संजय दशपुते यांनी सांगितले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख, कार्यकारी अभियंता जनार्धन भानुसे, उपविभागीय अभियंता चंद्रशेखर गिरी, शाखा अभियंता राहूल टेर्भुणे, राजेंद्र वाढई यांच्यासह लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.