Home साहित्य-संस्कृती काव्याभिलाषा KAVYABHILASHA … वाजतोय फक्त ढगांचा मृदंग सरीत अभंग

KAVYABHILASHA … वाजतोय फक्त ढगांचा मृदंग सरीत अभंग

109

मृदंग

नाही माझ्या दारी
पडल्यात सरी
अधुरीच वारी
पावसाची…

दुरूनच गेली
ढगाची पालखी
कुणी पाठीराखी
राहिला ना…

वाजतोय फक्त
ढगांचा मृदंग
सरीत अभंग
विरलेला…

विजांच्या चिपळ्या
थेंबांतून टाळ्या
दिंडीतल्या हाळ्या
निपचित…

पावसाविना रे
उरला न जोश
मनाचा जल्लोष
मनातच…

गावला न मला
सावळा विठ्ठल
पावसाची हूल
जीवघेणी…

धरती नभाची
होऊ दे रे भेट
पावसाने थेट
पांडुरंगा….

उज्वला सुधीर मोरे (देबाजे)
वाशिम

(सर्वाधिकार सुरक्षित)

***

वाट

मी आज
तिथंच उभी,
जिथून तू सोडलीस
साथ माझी …
वैशाखात तुझी
नितळ प्रतिमा
साठवून मी
वाट पाहतेय
श्रावणाची …
येणार तो
तसा तुही …

संजय मुंदलकर
नागपूर

(सर्वाधिकार सुरक्षित)