Home पूर्व विदर्भ महानिर्मितीकडून राखेची उपयोगिता वाढविण्यावर भर : डॉ.नितीन राऊत

महानिर्मितीकडून राखेची उपयोगिता वाढविण्यावर भर : डॉ.नितीन राऊत

55

चंद्रपूर : राखेचा महत्तम विनियोग, पर्यावरणपूरक, स्वस्त आणि सुरक्षित वापर करण्याकरीता रेल्वेद्वारे राख वहन करण्याचे महानिर्मितीने [ MAHANIRMITI ]  उचलले पाऊल अभिनंदनीय आहे. आगामी काळात राखेचे महत्त्व वाढून आर्थिक स्त्रोत निर्माण होणार आणि इतर उद्योगांनासुध्दा उभारी मिळेल, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील  राखेने  भरलेल्या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवतांना ते बोलत होते.  यावेळी सुमारे 59  वॅगनमध्ये 4200 मेट्रिक टन राख रेल्वेद्वारे रवाना करण्यात आली.

कार्यक्रमाला खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आभासी पद्धतीने महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(प्रकल्प) व्ही.थंगापांडीयन, संचालक(वित्त) बाळासाहेब थिटे तर चंद्रपूर येथुन महानिर्मितीचे संचालक(खणिकर्म) पुरुषोत्तम जाधव, कार्यकारी संचालक(पर्यावरण व सुरक्षितता) डॉ.नितीन वाघ, मुख्य अभियंता पंकज सपाटे, ॲशटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक संजय मानधनिया, मध्य रेल्वेचे के. एन. सिंग, अंबुजा सिमेंट कंपनीचे मुख्य वितरण अधिकारी नीरज बंसल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे प्रामुख्याने उपस्थित होते.

उर्जामंत्री डॉ.राऊत [ MINISTER DR NITEEN RAUT ] म्हणाले, या प्रयोगाचे यशापयश बघून महानिर्मितीच्या कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रामधूनही रेल्वेद्वारे राखेची वाहतूक करण्याचे नियोजन आहे. रेल्वेद्वारे एकावेळी मोठ्या प्रमाणात राख वाहून नेता येते. शिवाय रेल्वेद्वारे राख वहन केल्यास अवजड वाहनांमुळे होणारे अपघात आणि वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होते. महानिर्मितीच्या राख साठवण बंधाऱ्यापर्यंत राख वाहून नेण्याच्या खर्चासोबत राख साठवण बंधाऱ्याची ऊंची वाढवण्याच्या कामाच्या खर्चात देखील बचत होते. राख वाहून नेणाऱ्या बल्करमधून एका वेळेस साधारणत: 20 ते 22 मेट्रिक टन राख वाहून नेता येते. मात्र, रेल्वेद्वारे एका वेळेस साधारणत: 3500 ते 4000 मेट्रीक टन राख कमी खर्चात वाहून नेता येते.