Home पूर्व विदर्भ पाच हजारांची लाच स्वीकारताना एकास अटक

पाच हजारांची लाच स्वीकारताना एकास अटक

22

भंडारा : तुमसर येथील तहसील कार्यालयात येथे काम करणारा खाजगी इसम देवराम हरिराम पंचबुद्धे याला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो) पथकाने रंगेहात पकडले.

माहितीनुसार, यातील तक्रारदार हे नवेगाव (ता. तुमसर जि. भंडारा) येथील रहिवासी असून गावातील सामाजिक कार्यकर्ता आहेत. तक्रारदाराने गावातील चार लोकांचे श्रावणबाळ आणि एका व्यक्तीचे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे फॉर्म स्वत: तुमसर कार्यालयात जमा केले; परंतु संबंधितांना त्यांना मिळाले नाहीत. त्यामुळे तक्रारदाराने पंचबुद्धे याची भेट घेतली असता पाच लाभार्थ्यांच्या कामासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यानंतर त्यांनी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदविली़

यानंतर पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनियरित्या शहनिशा करून सापळा रचून मंगळवारी 13 जुलै 2021 रोजी तहसील कार्यालय तुमसर येथे लाच रक्कम स्वीकारल्याने देवराम हरिराम पंचबुद्धे याला रंगेहात पकडले. त्यावरून तुमसर जि. भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक मिलींद तोतरे, पोलिस उपअधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनात योगेश्वर पारधी, राजेंद्र कुरूडकर, कोमल बनकर, सुनिल हुकरे, कुणाल कढव, चेतन पोटे यांनी केली.