आठ महिला देश विदेशात गाजवताहेत मसाला निर्मितीचा व्यवसाय…

रानशिवार

शिल्पा वकलकर, नागपूर

श्रम कुणीही करावे, त्यात यश हमखास आहे. मात्र, ते प्रामाणिकतेतून होणे गरजेचे आहे़ आणि त्यात समोरील व्यक्ती महिला असेल तर…? अनेक प्रश्न निर्माण केले जातात;परंतु आजच्या घडीला राजस्थानमधील जोधपूर शहरातील स्पाईस गर्ल्सची चर्चा भारतच नव्हे, विदेशातील गाजत आहे. हा व्यवसाय फक्त मसाल्याचा आणि सर्व कारभार चालवतात आठ महिला. (आई आणि तिच्या सात मुली) सुरुवातीला वडिलांनीही अपार कष्ट घेतले. आणि खरोखर यातून अनेक महिलांना प्रेरणा मिळून स्वयंरोजगार सुरू करू शकेल, यात शंका नाही.

भगवंती मोहनलाल आणि उषा, पूनम, नीलम, निक्की, कविता, रितू आणि प्रिया सात मुली जोधपूरमध्ये एम. व्ही. स्पायसेसची [ M V SPICES ] चार दुकाने चालवत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे कुटलेले आणि न कुटलेले मसाले आणि मसाल्याचे पदार्थ त्यांच्याकडे उपलब्ध असतात. याशिवाय मसाला चहा, चहाचे मसाले, आमटी/करीसाठीचे मसाले, ख्रिसमस गिफ्ट पॅक्स आदी वस्तूही तयार असतात. विदेशी पर्यटक त्यांच्या दुकानांना आवर्जून भेट दिल्याशिवाय राहत नाही. विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशातूनही मसाले घेता यावेत म्हणून त्यांनी संकेतस्थळही (WEBSITE) तयार केले आहे. त्याद्वारे त्यांना महिन्याला किमान 30 विदेशी आॅर्डर्स मिळतात. कुटुुंबियाव्यतिरिक्त 12 अन्य व्यक्तींनाही त्यांनी रोजगार दिला आहे. तिसºया क्रमांकाच्या नीलमच्या नेतृत्वाखाली हा व्यवसाय सुरू आहे. विशेष म्हणजे मसाले तयार करण्यासाठी कुठलेही यंत्र वापरण्यात येत नाही. कारण त्यामुळेच मसाल्यांना वैशिष्ट्यपूर्ण चव असल्याचे नीलमने सांगितले. आजच्या घडीला त्यांच्या मसाल्याची चव आशिया खंडासह युरोपमध्येही पोहोचली आहे.

भरभराटीचे असे दिवस येण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांना बरेच कष्ट घ्यावे लागले होते. भगवंती 22 वर्षांच्या असताना जोधपूरमधील मोहनलाल यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. खरे तर त्यांना उच्च शिक्षण घेऊन नोकरी करायची होती;परंतु त्यांचे शिक्षण थांबवून लग्न करून देण्यात आले. त्यांचे पती मोहनलाल चांगल्या स्वभावाचे होते़ दुसरीकडे नशीब बलवत्तर नव्हतेच. भगवंती यांनी सलग तीन मुलींना जन्म दिल्याने सासरच्या मंडळींनी त्रास देणे सुरू केले. त्याचा शेवट म्हणजे भगवंती आणि मोहनलाल मुलींसह बाहेर पडले.

मोहनलाल यांचे एक किराणा दुकान होते. त्यांना भगवंती यांच्या हातचे जेवण खूप आवडायचे. त्या वापरत असलेल्या मसाल्यांबद्दल त्यांना विशेष नवल वाटायचे. त्यातूनच या दाम्पत्याने स्वत:च मसाले तयार करायचे ठरवले. तयार केलेले मसाले विकण्यासाठी मोहनलाल मेहरानगड किल्ल्याबाहेर रस्त्यावर बसू लागले. आणि याच ठिकाणी एम. व्ही. स्पायसेस या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सर्व घडी व्यवस्थित बसली असताना मोहनलाल यांचे निधन झाले;परंतु भगवंती यांनी खचून न जाता मुलींना हाताशी घेऊन पतीचा कष्टाचा व्यवसाय पुढे नेला.

(छायाचित्र साभार : इंटरनेट)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *