कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी 480 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण 

उपराजधानी नागपूर

25 मेट्रीक टन साठवणूक क्षमतेच्या ऑक्सिजन टँक दाखल

कोविड तयारीचा पालकमंत्र्यांकडून आढावा

नागपूर :  कोरोनाच्या [ CORONA PANDEMIC ] संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून लहान मुलांसाठीच्या उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहेत. जिल्ह्याला 480 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेवून उपलब्धताबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.

आज तामिळनाडू येथून 125 मेट्रीक टन साठवणूक क्षमता असलेल्या ऑक्सिजन जम्बो टँक आज शहरात दाखल होत आहेत. हे जम्बो टँक शासकीय मनोरुग्णालय परिसरात स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत [ MINISTER DR NITEEN RAUT ] यांनी आज दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कोरोनासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, लसीकरण तसेच तिसऱ्या लाटेच्या संदर्भात घ्यावयाची खबरदारी याबाबतचा आढावा पालकमंत्री डॉ. राऊत यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीस विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. भृशूंडी, डॉ. सरनाईक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, महापालिका उपायुक्त राम जोशी, उद्योग सहसंचालक श्री. धर्माधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून लसीकरणाचा वेग वाढविण्याची सूचना करताना पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले की, शहरात तसेच जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आहे. परंतु संभाव्य परिस्थिती लक्षात घेता वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्याला 480 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेवून तामिळनाडू येथून 125 मेट्रीक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन स्टोरेज टँक मनोरुग्णालयात बसविण्यात येणार असून आज जम्बो टँक शहरात दाखल झाला आहे. 1 कोटी 96 लक्ष रुपये यासाठी खर्च येणार असून येत्या 15 दिवसात ऑक्सिजन साठवणूकीची व्यवस्था पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *