Home प्रादेशिक विदर्भ ‘माविम’मुळे महिलांची अर्थसाक्षरता व सक्षमतेकडे वाटचाल : ॲड.यशोमती ठाकूर

‘माविम’मुळे महिलांची अर्थसाक्षरता व सक्षमतेकडे वाटचाल : ॲड.यशोमती ठाकूर

39
  • 115 गटांना सुमारे 3 कोटी रुपयांचे कर्ज वितरण

अमरावती : महिलांच्या सर्वांगीण विकासामध्ये माविमची अत्यंत मोलाची भूमिका आहे. बचत गटाच्या माध्यमातून अर्थार्जन करणाऱ्या असंख्य महिलांना माविम अर्थसाक्षरता व आर्थिक सक्षमता प्रदान करीत आहे. नवतेजस्वीनी योजनेअंतर्गत नावीन्यपूर्ण व अत्याधूनिक व्यवसायांचे प्रशिक्षण माविमच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. आज जिल्ह्यातील 115 गटांना सुमारे 3 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले गेले, यावरून महिलांमध्ये असलेली उद्योगप्रियता लक्षात येते. सर्व स्तरातील महिलांचा त्यांच्या बचत गटात सक्रीय  सहभाग असावा. अल्पसंख्यांक महिलांनीदेखील त्यांचा बचतगट तयार करून विकास साधावा, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी केले.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील कृषक भवन येथे माविमच्या रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत आयोजित विविध उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते महिला स्वयंसहायता बचत गटांना भाजीपाला विक्री ई-कार्ट रिक्षा आणि महिला बचत गटांना कर्ज वितरीत करण्यात आले.

कार्यक्रमाला माविमच्या मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, आयसीआयसीआय बँकेचे विभागीय व्यवस्थापक सुहास बोबडे, मानव विकास मिशनचे औरंगाबादचे माजी उपायुक्त रुपचंद राठोड, माविमचे निवृत्त जिल्हा समन्वय अधिकारी खुशाल राठोड, माविमच्या जिल्हा सनियंत्रण अधिकारी मिनाक्षी शेंडे आदी उपस्थित होते.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या, महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे ही काळाची गरज आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येतात त्यात बचत गटांनी सहभागी व्हावे.  माविममुळे महिलांना आपल्या आवडीच्या व  निपूण असलेल्या क्षेत्रात व्यवसाय करण्याची संधी निर्माण होते. माविमच्या मदतीने महिलांनी सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

महिलांनी पारंपारीक उद्योगाव्यतिरिक्त अत्याधूनिक व्यवसायांची कास धरावी, असे श्रद्धा जोशी यांनी सांगितले. माविमच्या माध्यमातुन महिलांना उद्योगासाठी उपलब्ध करुन देण्यात येणारे प्रशिक्षण तसेच अधिक उपयुक्त इतर बाबींचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.