Home राजधानी मुंबई पूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

38
राज्यातील पुरामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा

मुंबई : पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणीपुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून, पूल पाण्याखाली गेले आहेत. तेथील वाहतूक तातडीने सुरु होईल, यासाठी दुरुस्ती हाती घ्या. पूरग्रस्त भागात [ FLOODED AREA IN KOKAN ] रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थिती आणि नुकसानीबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी आढावा घेतला. बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय चहांदे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ड़ॉ. प्रदीप व्यास, ऊर्जा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रदान सचिव असीमकुमार गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. महेश पाठक, पशु संवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा गृह निर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजय गौतम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव देबडवार, अन्न व औषध प्रशासन आय़ुक्त परिमल सिंह आधी उपस्थित होते. पूरग्रस्त भागातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, वीजपुरवठा यांच्या अनुषंगाने बैठकीत तपशीलवार आढावा घेण्यात आला.

रस्त्यांची दुरूस्ती युद्धपातळीवर करा

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार यांनी माहिती दिली की, महाबळेश्वर, पोलादपूर आणि पन्हाळा याठिकाणचे रस्ते अर्धे खचले आहेत. त्याठिकाणी पाईप्स टाकून एकमार्गी वाहतूक सुरु करण्यात येत आहे. एकूण २९० रस्ते दुरूस्त करण्याची गरज असून, ४६९ रस्त्यांवरची वाहतूक बंद आहे. ८०० पूल आणि मोऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. प्रत्येक विभागात एक-एक अतिरिक्त मुख्य अभियंता दर्जाचा अधिकारी नियुक्त केला आहे. तो प्रत्यक्ष सर्वेक्षण करत आहे.

वीजपुरवठा सुरळीत करा

ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, बारामती- सातारा आणि पेण अशा दोन उपकेंद्रांचे नुकसान झाले आहे. १४ हजार ७३७ ट्रान्सफॉर्मर्स नादुरूस्त झाले होते, त्यापैकी ९ हजार ५०० दुरूस्त झाले आहेत. नादूरुस्त ६७ उपकेंद्रांपैकी ४४ परत सुरू करण्यात आले आहेत. एकंदर ९ लाख ५९ हजार बाधित ग्राहकांपैकी साडे सहा लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. महाडमध्ये दोन मोठे वीज मनोरे तातडीने दुरूस्त करणे सुरु आहे.

पाणीपुरवठा योजनांची तातडीने दुरुस्ती

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनी सांगितले की, रत्नागिरी, चिपळूण, खेड, पोलादपूर याठिकाणी पाणीपुरवठा योजनांचे नुकसान झाले असून, रत्नागिरीत १७ गावांना तसेच सिंधुदुर्गात २० गावांत पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी टँकर्सद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. पूरग्रस्त ७४६ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांचे नुकसान झाले आहे.

साथरोग पसरू नये म्हणून काळजी

आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, पूरग्रस्त ४९६ गावांमध्ये ४५९ वैद्यकीय पथके प्रत्यक्ष घरोघर भेटी देत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात २९३ तर रत्नागिरी जिल्ह्यात ६ मदत छावण्या उघडण्यात आल्या आहेत. ही पथके पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटप, किटकनाशक औषधांची फवारणी करत आहेत. याशिवाय सर्पदंशावरील लशीची पुरेशी उपलब्धता आहे. गरोदर माता आणि लहान मुलांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. लेप्टास्पायरोसीस टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक औषधे देणे सुरु केले आहे. याशिवाय गंभीर रुग्णांना पुरेश्या रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :
तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार
कोकणात पावसाचा हाहा:कार, घरे बुडाली, रेल्वेगाड्या थांबल्या