Home राजधानी मुंबई राज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री

राज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री

24

मुंबई : एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एसडीआरएफचे केंद्र असावे. तसेच त्याठिकाणी जवांनांना मदत व बचावाचे प्रशिक्षण द्यावे यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले.

दरडग्रस्त गावांचे पुनर्वसन

महाड येथील तळीये गावांचे पुनर्वसन करण्यासाठी योग्य जागा निश्चित करा. तेथील सोयी-सुविधांसाठी नियोजन करा, उद्योजकांची देखील मदत घ्या. गावकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी अडचण येणार नाही असे बघा, तसेच त्यांच्या घरांचा आराखडा लगेच तयार करून कार्यवाही करा. अशा प्रकारे डोंगर उतारांवरील वाड्या आणि वस्त्यां ग्रामीण भागात तसेच शहरी भागात देखील आहेत. धोकादायक स्थितीतील या वाड्या-वस्त्यांचे कशापद्धतीने पुनर्वसन करता येईल, यावर निश्चित असा आऱाखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

नुकसान भरपाई, मदतीचे प्रस्ताव तयार करा

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, नुकसानीबाबतची आकडेवारी आणि करावयाची मदतीबाबत तपशीलवार वस्तूनिष्ठ अहवाल तयार करा, जेणेकरून आपदग्रस्तांना वेळेत आणि तातडीने मदत पोहचविता येईल. पूराचा फटका बसलेल्या सर्वच व्यापारी, व्यावसायीकांची माहिती एकत्र करा, त्यांना राज्य आणि केंद्राच्या कोण-कोणत्या योजनांमधून सवलत देता येईल, मदत करता येईल त्याबाबतचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. तत्काळ मदत देऊच, पुन्हा पुन्हा ही आपत्ती येऊ नये. त्यातून बचाव करता येईल यासाठी पूरसंरक्षक भिंती, धोकादायक वस्त्यांयाबाबत जिल्हा निहाय प्रस्ताव तयार करा. डोंगराळ भागातील खचणारे रस्ते, पायाभूत सुविधांबाबतही एक सर्वंकष आराखडा तयार करा, असेही त्यांनी सांगितले. पंचनामे करण्यासाठी ड्रोन तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच हे पंचनामे वेळेत पूर्ण करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोकणात पुराचा इशारा देणारी यंत्रणा तीन महिन्यात

कोकणामधील एकंदर २६ नद्यांची खोरे असून, याठिकाणी पूराबाबत इशारा देणारी ‘आरटीडीएस’ यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वीत करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून पहिल्या टप्प्यात सात नद्यांवर येत्या तीन महिन्यात अशी यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

पूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार
कोकणात पावसाचा हाहा:कार, घरे बुडाली, रेल्वेगाड्या थांबल्या