राजकारणातील अजातशत्रू ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर : तब्बल पाच दशके राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून कारकीर्द गाजविणारे, राजकारणातील अजातशत्रू, अत्यंत साधे व्यक्तिमत्त्वाचे धनी ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकारणातील वटवृक्ष हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

गणपतराव देशमुखांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी याबाबत माहिती दिली. आबासाहेबांनी वयाच्या 95 व्या वर्षी सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. राजकारणामध्ये ज्यांनी त्यांच्यासोबत काम केले,त्या सर्वांसाठी हा मोठा धक्का आहे. सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आबासाहेबांची प्रकृती आतापर्यंंत चांगली होती; शुक्रवारी रात्री नऊ वाजता आबासाहेबांचे निधन झाले.

सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले

राजकारण-समाजकारणातील एक साधे, सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून दिवंगत देशमुख यांची वाटचाल कदापिही विसरली जाणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री म्हणतात की, आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात कायम राहील. सर्वच पक्षांत त्यांच्या विचारसरणीचे चाहते होते. संसदीय कार्यप्रणालीवर त्यांचा नितांत विश्वास होता. त्यामळे विधिमंडळाच्या कामकाजातही त्यांचा सर्वपक्षीयांना मार्गदर्शक म्हणून आधार होता, धाक होता. कष्टकरी- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारा नेता म्हणून त्यांची तळागाळापर्यंत ओळख होती.

आदर्श लोकप्रतिनिधी हरपला : उपमुख्यमंत्री अजित पवार

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी अर्ध्या शतकाहून अधिकच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीला सुसंस्कृत चेहरा दिला. राजकारणाला नैतिक अधिष्ठान दिलं. महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महाराष्ट्र विधिमंडळाचा गौरव वाढवला. गणपतराव आबांच्या निधनानं मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला आहे. महाराष्ट्रानं सद्गुणी सुपुत्र गमावला आहे.महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव आबा कायम स्मरणात राहतील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *