Home आंतरराष्ट्रीय बातम्या पी. व्ही. सिंधूला कांस्यपदक, वैयक्तिक दोन पदके जिंकणारी पहिली महिला खेळाडू

पी. व्ही. सिंधूला कांस्यपदक, वैयक्तिक दोन पदके जिंकणारी पहिली महिला खेळाडू

72
टोकियो : पी.व्ही. सिंधूने कांस्यपदक पटकावले असून, वैयक्तिक दोन पदके जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
फुलराणी स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदक जिंकून दिले. कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात तिने चीनच्या खेळाडूचा फडशा पाडत पदक पटकावले आणि भारताच्या बॅडमिंटनमध्ये इतिहास घडवला. बॅडमिंटनमध्ये दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती पहिली खेळाडू ठरली असून वैयक्तिक दोन पदके जिंकणारी ती पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे. वैयक्तिक खेळामध्ये पैलवान सुशील कुमारनंतर सिंधू भारताची दुसरी खेळाडू ठरली आहे. सिंधूने याआधी रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये रौप्यपदक जिंकले होते.
 पी. व्ही. सिंधू हिचे ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई : टोकियो ऑलिंपिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेचं कांस्यपदक जिंकणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधु हिचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. पी. व्ही. सिंधुनं देशासाठी दुसरं ऑलिंपिक पदक जिंकून देशाचा गौरव वाढवला आहे. तिनं जिंकलेल्या ऑलिंपिक कांस्यपदकाचा आनंद देशवासियांसाठी सुवर्णपदकापेक्षा कमी नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी तिचे कौतुक केले आहे.

उपमुख्यमंत्री आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, पी. व्ही. सिंधुकडून देशाला ऑलिंपिक सुवर्णपदकाची अपेक्षा होती. संपूर्ण स्पर्धेत तीनं कामगिरीही दमदार केली. सुवर्णपदक जिंकून देण्याच्या प्रयत्नात ती कुठेही कमी पडली नाही. तिच्या कामगिरीचा देशवासियांना अभिमान आहे. पी. व्ही. सिंधुनं कांस्यपदक जिंकलं असलं तरी तिच्या खेळ आणि पदकामुळे देशवासियांना मिळालेला आनंद सुवर्णपदकापेक्षा कमी नाही. यापुढच्या काळातही पी. व्ही. सिंधुकडून अशीच जागतिक दर्जाची सर्वोत्कृष्ट कामगिरी घडेल. तिच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक उदयोन्मुख युवक खेळांकडे वळतील. जागतिक दर्जाची कामागिरी करुन पदक जिंकतील. देशाचा गौरव वाढवतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.