रोजगार मेळाव्याचे आयोजन सामाजिक जबाबदारीतून : पोलिस अधीक्षक जी. श्रीधर

विदर्भ

अकोला : पोलिस आणि रोजगार मेळाव्याचा काय संबंध, असा प्रश्न या मेळाव्याच्या निमित्ताने अनेकांच्या मनात उपस्थित झाला असेल; मात्र अकोला पोलिसांनी सामाजिक जबाबदारीतून या दोन दिवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गुरूवारी येथील पोलिस लॉनमध्ये आयोजित ‘स्वयंम रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्या’ च्या उद‍्घाटनप्रसंगी केले.

पोलिसांची मुले, कोरोना काळात आई आणि वडील गमावलेल्या मुलांसाठी अकोला पोलिस, तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी आणि बाल कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार 12 आणि शुक्रवार 13 ऑगस्ट रोजी पोलिस लॉन येथे ‘स्वयंम रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे उद्घाटन गुरूवारी सकाळी अकरा वाजता पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याहस्ते करण्यात आले.  व्यासपीठावर जी. श्रीधर, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, बालकल्याण मंडळाचे सदस्य अॅड. संजय सेंगर, अॅड. अनिता गुरव उपस्थित होते. याप्रसंगी या मेळाव्याला सर्वतोपरी सहकार्य करणारे विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल, समर्थ ग्रुप ऑफ एज्युकेशनचे संचालक प्रा. नितीन बाठे आणि गुजरात अंबुजा एक्सपोर्टचे ऑपरेशन प्रेसिडेन्ट ब्रीजमोहन चितलांगे यांची विशेष उपस्थिती होती.

जी. श्रीधर म्हणाले, की अनेकवेळा मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत ती संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रामुख्याने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. विधी संघर्ष बालकांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. परंतु त्यांनाही सामाजिक प्रवाहात येण्याची संधी मिळावी यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आपले दैनंदिन कर्तव्य बजावण्यासोबतच उद्योजक आणि बेरोजगार यांच्यामधील दुवा म्हणून अकोला पोलिस विभाग काम करणार आहे, या दोन दिवसीय मेळाव्यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात विशेष कक्ष स्थापन करून बेरोजगार युवक, युवती आणि महिलांना यापुढेही रोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची ग्वाहीदेखील जी. श्रीधर यांनी दिली.

पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींनी तसेच बाल न्याय मंडळ अंतर्गत असलेल्या विधी संघर्षग्रस्त मुलांनी या मेळाव्याचा लाभ घेतला. उद्या, शुक्रवार, 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजताच्या दरम्यान खुल्या वर्गातील युवकांना मेळाव्यात सहभागी होता येईल. दुपारी 2 ते 5 वाजताच्या दरम्यान महिला, विधवा महिला, परित्यक्ता घटस्फोटित महिलांसाठी हा मेळावा खुला राहणार आहे. मेळाव्याचे प्रास्ताविक रामदास पेठ पोलिस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांनी केले. संचालन जया भारती इंगळे आणि निलेश गाडगे यांनी केले. शहर वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांनी आभार मानले.

शुक्रवार, 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजताच्या दरम्यान खुल्या वर्गातील युवक-युवतींना मेळाव्यात सहभागी होता येईल. युवक-युवतींनी अवश्य भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *