Home राजधानी मुंबई भरपूर बक्षिसाच्या छायाचित्र स्पर्धेत भाग घ्यायचा, मग ही बातमी वाचा…

भरपूर बक्षिसाच्या छायाचित्र स्पर्धेत भाग घ्यायचा, मग ही बातमी वाचा…

72
file photo

मुंबई : जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त (19 ऑगस्ट) नवोदित आशय निर्मात्यांना एकत्र आणण्यासाठी आणि महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने (DoT) एक आठवडाभर चालणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये फोटोग्राफी स्पर्धा, हेरिटेज वॉक, फूड फोटोग्राफी, ट्रॅव्हल फोटोग्राफी आणि कथाकथन यावर आधारित ऑनलाईन कार्यशाळा असतील, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने ११ ऑगस्ट २०२१ पासून इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर #MaharashtraThroughMyLens ही फोटोग्राफी स्पर्धा जाहीर केली आहे. यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या पर्यटनाशी निगडीत कुठलाही फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर किंवा फेसबूक वॉलवर #MaharashtraThroughMyLens या हॅशटॅगसह तसेच महाराष्ट्र टूरिझमच्या अधिकृत हँडलला   (www.facebook.com/maharashtratourismofficial आणि http://www.instagram.com/maharashtratourismofficial) टॅग करून या स्पर्धेत प्रवेश नोंदवू शकता. फोटो अपलोड करताना तो वन्यजीव, लँडस्केप, साहस, निसर्ग, ग्रामीण आणि शहरी जीवन, वारसा, संस्कृती, खाद्य इत्यादी पुरताच मर्यादित असावा असे नाही. यामध्ये आपण आपली कल्पकता वापरू शकता, असे डॉ. सावळकर यांनी सांगितले.

स्पर्धकाच्या फोटोग्राफीची अभिनव शैली, फ्रेमिंग, कॉम्पोझिशन, एडिटिंग स्किल्स आणि सोशल मीडियावरील त्यांच्या फोटोला मिळालेला प्रतिसाद हे निकष विचारात घेऊन विजेत्यांची निवड केली जाईल. 19 ऑगस्ट 2021 रोजी ऑनलाइन पद्धतीने निकाल घोषित केले जातील. प्रथम पुरस्कार 25 हजार रुपये, द्वितीय पुरस्कार 10 हजार रुपये आणि तृतीय पुरस्कार 5 हजार रुपये याप्रमाणे बक्षीसे दिली जातील. त्याचबरोबर इतर निवड झालेल्या 20 स्पर्धकांना प्रत्येकी  1 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

याच उपक्रमातील दुसऱ्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील हेरीटेज वॉक असेल. यामध्ये वरिष्ठ छायाचित्रकारासोबत उत्साही २० छायाचित्रकारांना हेरीटेज वॉकची संधी मिळेल. हा हेरिटेज वॉक 19 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेत असेल. हेरीटेज वॉकच्या माध्यमातून विविध वारसा इमारतींना भेट देण्याची आणि वेगवेगळ्या दृष्टीकोनातून छायाचित्रे टिपण्याची संधी मिळेल. ही छायाचित्रे  #MaharashtraThroughMyLens या हॅशटॅगसह महाराष्ट्र पर्यटनच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सला टॅग करुन सोशल मीडियावर अपलोड करण्यात येतील. जागतिक छायाचित्रण दिनी 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी महाराष्ट्र पर्यटनच्या इन्स्टाग्राम हँडलवर (www.instagram.com/maharashtratourismofficial) ऑनलाईन कार्यशाळा होईल. कार्यशाळेत त्या त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींकडून नव्याने या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना फूड फोटोग्राफी, ट्रॅव्हल फोटोग्राफी, कथाकथन यावर आधारित मार्गदर्शन केले जाईल. या इंस्टाग्राम ऑनलाइन कार्यशाळा प्रत्येकी ३० मिनिटांच्या असतील.