मुख्यमंत्री म्हणाले, जनतेचे प्राण वाचवण्याला शासनाचे प्रथम प्राधान्य

राजधानी मुंबई

मुंबई : काही काळासाठी आपले सणवार, उत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश आपण सर्वमिळून जगाला देऊ या, संयम आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केले. त्यांनी आज शासनाचे प्रथम प्राधान्य हे जनतेचे प्राण वाचवण्याला आहे, हे देखील स्पष्ट केले.

आज राज्यातील गोविंदा पथकांशी ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला तेंव्हा ते बोलत होते. उपस्थित दहीहंडी पथकांच्या पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्र्याच्या कळकळीच्या विनंतीला प्रतिसाद देत दहीहंडीऐवजी कोरोनाचे सावट लक्षात घेऊन सामाजिक तसेच आरोग्य विषयक उपक्रम हाती घेऊन हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करू अशी भावना व्यक्त केली.

बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार सुनील प्रभू, आ. प्रताप सरनाईक, माजी मंत्री सचिन अहीर, माजी आमदार बाळा नांदगांवकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय.एस.चहल, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहल पंडित, बाल टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभु, डॉ. अजित देसाई, विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त,  पोलीस अधिकारी,  दहिहंडी समन्वय समितीचे पदाधिकारी, गोविंदा पथकाचे सदस्य उपस्थित होते.

पहिल्यांदा आरोग्याचा विचार
मुख्यमंत्री म्हणाले की, सणवार, उत्सवाबाबतच्या आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत पण आज विषय आरोग्याचा आणि नागरिकांचे प्राण वाचवण्याचा आहे. त्यामुळे जेंव्हा पहिले प्राधान्य कशाला द्यायचे हा प्रश्न समोर येतो तेंव्हा साहजिकच पहिल्यांदा आरोग्याचा विचार करावा लागतो. मागील दीड वर्षांपासून आपण कोरोना विषाणुविरूद्ध लढत आहोत, त्यामुळे आपल्यावर बंधने आली आहेत, पण ही बंधने कुणासाठी याचा देखील विचार करण्याची गरज आहे. या निर्बंधाविरुद्ध आंदोलन करण्याचे काहीजण बोलतात. त्यांनी शासनाविरोधात आंदोलन करण्यापेक्षा कोरोनाविरुद्ध आंदोलन करावे.

जगभराचा अनुभव कटू
सगळे जग या विषाणुने त्रासेलेले आहे. गेल्या दोन लाटेत जी बालके अनाथ झाली, ज्यांच्या घरातील कर्ते पुरुष किंवा महिला गेल्या, कुटुंबच्या कुटुंब अनाथ झाली, त्याची कारणे समजून घेण्याची गरज आहे. दोन लाटेतला आपला अनुभव भयानक आहे. आपलाच नाही तर जगाचा अनुभवही कटु आहे. दोन डोस दिलेल्या देशातही तिसऱ्या लाटेने आता कहर मांडला आहे. अनेक देशात पुन्हा निर्बंध लावले जात आहेत.

 

अजूनही काळजी घेण्याची गरज
नीती आयोगाने परवाच आपल्या अहवालात तिसऱ्या लाटेची शक्यता आणि लागणाऱ्या आयसीयु बेडची संख्या याचा अंदाज व्यक्त करून आपली काळजी वाढवली आहे. हा विषाणु घातक आहे. अजून आपल्याकडे ठोस औषध उपलब्ध नाही पण कोरोनाला रोखण्याचा मार्ग आपल्याला कळला आहे. आपल्याकडेही काही जिल्ह्यात दुसरी लाट जोरात आहे. काही ठिकाणी संसर्ग कमी झालेला दिसत असला तरी आपल्यासाठी हा “विंडो पिरियड” आहे. ज्याचा उपयोग आपल्याला आपलं अर्थचक्र सुरळित ठेवण्यासाठी आणि तळहातावर पोट असलेल्यांना दिलासा देण्यासाठी करावयाचा आहे.

तर नाईलाजाने…
आपली यंत्रणा आजही आपला जीव धोक्यात घालून कोरानाशी लढत आहे. आपण समजूतीने वागलो नाहीत तर या धोक्यातून आपण कधीच बाहेर पडू शकणार नाही असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, आपण आपली आरोग्य व्यवस्था सक्षम करत आहोत, आपण एकाच दिवशी ११ लाख लोकांचे लसीकरण करून एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे.  आपण ऑक्सीजन, आय.सी.यु बेडची संख्या वाढवत आहोत. पण आपली ऑक्सीजन निर्मिती ही रोज १२०० ते १३०० मे.टन इतकीच मर्यादित आहेत.  इतर रुग्णांना लागणारी ऑक्सीजनची गरज वगळता   कोरोना रुग्णांसाठीच्या ऑक्सीजनची मागणी  ७५० मे.टनच्या वर गेल्यास आपल्याला नाईलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *