Home ब्लॉग ABHIVRUTTA BLOG : डेटाअभावी रुईचा बाजार स्थिर

ABHIVRUTTA BLOG : डेटाअभावी रुईचा बाजार स्थिर

45
रुईच्या उत्पादनाचा ठराविक आकडा अंदाजे सांगितला जात असल्याने कापड उद्योग व रुई खरेदीदार तोच आकडा ग्राह्य धरून रुईच्या गाठींची खरेदी व साठा करण्याचे नियोजन करते. त्यामुळे रुईच्या बाजारात कायम स्थिरता राहात असल्याने कापसाच्या बाजारात फारसी तेजी येत नाही
बाजारपेठेत वस्तूंच्या किमतीतील चढ-उतार हा मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते. मात्र, याला काही शेतमाल अपवाद आहेत. भारतात कापूस आणि त्यापासून तयार होणाऱ्या रुईचा बाजार हा केवळ त्यांच्या उत्पादनाच्या अंदाजावर अवलंबून आहे. रुईच्या किती गाठीचे उत्पादन होणार आहे, त्याची नेमकी आकडेवारी संपूर्ण हंगामभर उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे रूई खरेदीदारांची नजर केवळ एकूण उत्पादनावर असते. ‘डेटा’ उपलब्ध करून दिला जात नसल्याने रुईच्या बाजारात स्थिरता असते. या स्थिरते मुळे कापसाचे उत्पादन घेतले तर दर फारसे वाढत नाही. त्यामुळे कापूस उत्पादकांचे नुकसान होते.
भारतात दरवर्षी सरासरी 130 लाख हेक्टरमध्ये कपाशीचे पीक घेतले जाते. यात महाराष्ट्राचा वाटा हा सरासरी 10.7 टक्के म्हणजे 43 लाख ते 43 लाख 70 हजार हेक्टर एवढा आहे. देशात पाच हजार, तर महाराष्ट्रात 1,600 जिनिंग-प्रेसिंग आहेत. या जिनिंग-प्रेसिंगमधून दर महिन्याला रुईच्या किती गाठी तयार केल्या जातात, याची निश्चित आकडेवारी प्राप्त होत नाही. यासाठी प्रभावी शासकीय व प्रशासकीय यंत्रणादेखील नाही. त्यामुळे चालू हंगामात रुईच्या गाठींचे नेमके किती उत्पादन झाले, याची माहिती कापड उद्योग व रूई खरेदीदारांना मिळत नाही. दुसरीकडे, संपूर्ण हंगामात रुईच्या उत्पादनाचा ठराविक आकडा सांगितला जातो. हा ठराविक आकडा रुईचा बाजार कायम स्थिर ठेवण्यासाठी कारणीभूत ठरतो. याला कापूस, रुई व कापड उद्योगातील तज्ज्ञ मंडळींनी दुजोरा दिला आहे.
आपल्या देशात जिनिंग-प्रेसिंग मालक त्यांच्याकडील रुईच्या गाठींची विक्री ‘सीसीआय’ व कापड उद्योगांना करतात. देशातील रुईच्या गाठींचे उत्पादन हे कापसाच्या उत्पादनावर ठरविले जाते. त्यामुळे कापूस व रुईच्या उत्पादनाचा अंदाज दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरपासून व्यक्त व्हायला सुरुवात होते. वास्तवात, या काळात कापूस शेतातून घरीच यायचा असतो. दुसरीकडे, प्रतिकूल वातावरण, किडींचा प्रादुर्भाव व अन्य कारणांनी कापसाच्या उत्पादनात येणारी घट विचारात घेतली जात नाही. या व नंतरच्या काळात रुईच्या उत्पादनाचा ठराविक आकडा अंदाजे सांगितला जात असल्याने कापड उद्योग व रुई खरेदीदार तोच आकडा ग्राह्य धरून रुईच्या गाठींची खरेदी व साठा करण्याचे नियोजन करते. त्यामुळे रुईच्या बाजारात कायम स्थिरता राहात असल्याने कापसाच्या बाजारात फारसी तेजी येत नाही, असे अभ्यासू व अनुभवी जिनिंग-प्रेसिंग मालकांनी खासगीत सांगितले.
‘डीआयसी’मार्फत आकडेवारी शक्य
देशभरातील जिनिंग-प्रेसिंगला शासनाकडून ‘डीआयसी’ (जिल्हा उद्योग केंद्र) मार्फत दरवर्षी सबसिडी दिली जाते. त्यामुळे ‘डीआयसी’मधील अधिकाऱ्यांचा त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व जिनिंग-प्रेसिंगसोबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध येतो. शासनाने प्रत्येक जिनिंग-प्रेसिंगला त्यांनी दर महिन्याला रुईच्या किती गाठींचे ‘ जिनिंग व प्रेसिंग’ केले, याची माहिती ठेवून ती ‘डीआयसी’ कार्यालयांना गोळा करायला लावली तर, ही समस्या सहज सुटू शकते आणि देशभरात रुईच्या किती गाठींचे उत्पादन झाले, याची माहिती दर महिन्याला एका ‘क्लिक’वर सर्वांनाच उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती हिंगणघाट, जिल्हा वर्धा येथील प्रकाश व्हाईट गोल्ड जिनिंग-प्रेसिंगचे मालक ओम डालिया यांनी दिली.
आकडेवारीतील तफावत
देशात रुईच्या गाठींचे किती उत्पादन होणार, याबाबत दरवर्षी मोठी तफावत दिसून येते. चालू हंगामात देशात 370 लाख रुईच्या गाठींचे उत्पादन होणार असल्याची माहिती केंद्र शासनाचे वस्त्रोद्योग मंत्रालय आणि सीसीआयच्या सूत्रांनी दिली. दुसरीकडे, ‘सीआयए’ (कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया)च्या सूसुत्रांनी देशात 358.50 लाख गाठींचे उत्पादन होणार असल्याची शक्यता व्यक्त केली. देशभरातील जिनिंग-प्रेसिंग मालकांच्या संघटनांनी यावर्षी रुईचे 310 लाख गाठींचे उत्पादन होणार असल्याचे स्पष्ट केले. या आकडेवारीत किमान 12 व कमाल 60 लाख गाठींची तफावत दिसून येते. वास्तवात, देशभरात रुईच्या गाठींचे उत्पादन हे अंदाजे 280 ते 310 लाख गाठींच्या आसपास झाले.
अंदाजामुळे फसगत
शासनाने रुईच्या गाठींच्या उत्पादनाची निश्चित आकडेवारी वेळोवेळी जाहीर केली तर कापड उद्योगासाठी सोयीचे होईल. रुईच्या गाठींचे उत्पादन कमी असल्याचे निदर्शनास येताच कापड उद्योग रुईच्या गाठी खरेदी करण्यासाठी स्पर्धा करतील आणि त्यातून रुईच्या गाठींचे व पर्यायाने कापसाचे दर वधारण्यास मदत होईल. गाठींचे उत्पादन वाढत असल्याचे दिसून आले तर रुई व कापसाचे भाव कोसळण्याची शक्यता निर्माण होईल. यातून मार्ग काढण्यासाठी रुईच्या गाठींच्या निर्यातीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. या प्रकारामुळे कापड उद्योगात खळबळ निर्माण होऊ शकते. हा प्रकार टाळण्यासाठी रुई उत्पादनाचा केवळ अंदाज व्यक्त केला जातो. या प्रकारामुळे कापूस व रुई उत्पादकांची फसगत होते, याला कापड उद्योजकांसह जिनिंग-प्रेसिंग मालकांनी दुजोरा दिला आहे. शिवाय, कापूस व रुईचे उत्पादन कमी झाल्याचे आकडेवारीवरून लक्षात येताच वेळीच कापूस अथवा रुईच्या गाठी आयात करण्याबाबत योग्य निर्णय घेणे कापड उद्योजकांसाठी सोयीचे होईल. त्यामुळे रुई उत्पादनाचा ‘डेटा’ तयार करणे व त्यात पारदर्शकता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
@ सुनील एम. चरपे,
नागपूर – 24
संपर्क – 9765092529
मेल – sunil.charpe@gmail.com
[ Global Farming या Blog वरून साभार ]