उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतचे विविध शासकीय कामांचे कार्यादेश

राजधानी मुंबई

मुंबई : देशभरातील तरुणांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहात कॅन्सर स्क्रीनिंग, प्लॅस्टिकपासून दीर्घकालीन टिकणारे रस्ते बनविणे, फिशपॉन्डचे आधुनिकरण, एयर फिल्टरमार्फत इंधन बचत, पोल्ट्री व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्यात आल्या. त्यातील उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना [ STARTUP WEEK 2021] आज कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते हॉटेल ट्रायडन्ट येथे आयोजित समारंभात गौरविण्यात आले.

तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी स्टार्टअप्सना संपूर्ण प्रोत्साहन देण्यात येईल, असे मंत्री श्री. मलिक यांनी यावेळी सांगितले. तर, स्टार्टअप्स आणि राज्य शासनामध्ये भागीदारी वाढविण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येतील, असे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

 

विजेत्या उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा संबंधित शासकीय विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतचे विविध शासकीय कामांचे कार्यादेश देण्यात येणार आहेत. सप्ताहासाठी देशभरातून १ हजार ८४६ स्टार्टअप्सनी नोंदणी केली होती, त्यातील निवडक १०० स्टार्टअप्सनी सोमवारपासून ऑनलाईन आयोजित सप्ताहात मंत्री, गुंतवणूकदार, तज्ज्ञ, उद्योजक, शासकीय अधिकारी यांच्यासमोर सादरीकरण केले. त्यातील उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना आज गौरविण्यात आले. प्रशासनात नाविन्यता आणणारे व अभिनव बदल घडवू शकणारे कृषी, शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्यसुविधा, शाश्वतता (स्वच्छ ऊर्जा, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन), प्रशासन आणि इतर क्षेत्रातील स्टार्टअपचे सादरीकरण करण्यात आले.

 

मंत्री नवाब मलिक म्हणाले की, राज्य शासनामार्फत राबविण्यात आलेल्या या सप्ताहास देशभरातील तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला. एकविसावे शतक हे डिजिटल क्रांतीचे शतक आहे, यामध्ये जगात भारत देश अग्रस्थानी राहील. महाराष्ट्र राज्य या क्षेत्रात आपले विशेष योगदान देत आहे. स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याबरोबरच यासंदर्भातील धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. विविध खरेदी, शासनास हव्या असलेल्या विविध सेवा यामध्येही तरुणांच्या नवसंकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना संधी देण्यात येईल. राज्यात महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत. यापुढील काळातही युवक-युवती आणि महिलांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी शासनामार्फत विविध निर्णय घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *