Home राजधानी मुंबई जाणीव ट्रस्टतर्फे मुंबईत भव्य बक्षिसांची ‘माझा बाप्पा’ घरगुती गणेश दर्शन स्पर्धा, महाअंतिम...

जाणीव ट्रस्टतर्फे मुंबईत भव्य बक्षिसांची ‘माझा बाप्पा’ घरगुती गणेश दर्शन स्पर्धा, महाअंतिम विजेत्यास हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चषक

64

मुंबई : सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य करणार्‍या ‘जाणीव’ या संस्थेच्या वतीने मुंबई व उपनगरांतील गणेशभक्तांसाठी ऑनलाईन‘माझा बाप्पा’ घरगुती गणेशदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मुंबई व उपनगरांतील ६ लोकसभा मतदारसंघांतर्गत येणार्‍या एकूण ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये होणार्‍या या ऑनलाईन स्पर्धेत पर्यावरण, पाणी हेच जीवन, कोरोनामुक्त घर, ग्लोबल वॉर्मिंग या सामाजिक विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. स्पर्धेतील महाअंतिम विजेत्यास हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चषकदेऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत यांच्या संकल्पनेतून आकारास आलेली घरगुती गणेशमूर्ती व सजावटीपुरती मर्यादित असलेली ही ऑनलाईन स्पर्धा तीन स्तरांवर घेतली जाणार असून विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. ३६ विधानसभा मतदार संघांमध्ये होणार्‍या प्राथमिक फेरीमध्ये एकूण १०८, तर प्रत्येक विधानसभा मतदार संघांमधून विजयी ठरलेल्या प्रथम क्रमांकप्राप्त विजेत्यांच्या लोकसभा मतदार संघ स्तरावर होणार्‍या अंतिम फेरीतून एकूण १८ विजेते क्रमांक काढण्यात येतील. या फेरीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या ६ विजेत्यांची महाअंतिम फेरी होईल. या सहा स्पर्धकांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन विजेते क्रमांक व तीन उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात येतील.
महाअंतिम फेरीमध्ये प्रथम क्रमांक मिळवणार्‍या विजेत्यास हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चषकआणि द्वितीय ‘जागृती सन्मान (महाअंतिम)’ व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास ‘संवेदना सन्मान (महाअंतिम)’ पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल. तसेच तीन उत्तेजनार्थ क्रमांकांनाही पारितोषिके दिली जातील. सर्व सहभागी स्पर्धकांना ‘जाणीव प्रशस्तीपत्र’देण्यात येईल.

स्पर्धेमध्ये एकूण १३२ पारितोषिके दिली जाणार असून, त्यांचे स्वरुप रोख रक्कम, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र असे असेल. प्राथमिक फेरीमध्ये प्रथम क्रमांक मिळवणार्‍या एकूण ३६ विजेत्यांना ‘जाणीव सन्मान (प्राथमिक)’आणि द्वितीय क्रमांकप्राप्त विजेत्यांना‘जागृती सन्मान (प्राथमिक)’ व तृतीय क्रमांकप्राप्त विजेत्यांना ‘संवेदना सन्मान (प्राथमिक)’ पारितोषिक देण्यात येईल.

अंतिम फेरीमध्ये प्रथम क्रमांकप्राप्तविजेत्यांना ‘जाणीव सन्मान (अंतिम)’आणि द्वितीय क्रमांकप्राप्त विजेत्यांना ‘जागृती सन्मान (अंतिम)’ व तृतीय क्रमांकप्राप्त विजेत्यांना ‘संवेदना सन्मान (अंतिम)’ पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेतील सहभाग हा नि:शुल्क आहे.
स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी सविस्तर तपशील व प्रवेश अर्जासाठी www.mazabappa.in या वेबसाईटला भेट द्यावी आणि अधिकाधिक संख्येने स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.