Home रानशिवार ABHIVRUTTA BLOG : संशोधनाविना रानभाज्या

ABHIVRUTTA BLOG : संशोधनाविना रानभाज्या

64
धान्य, भाजीपाल्याचे उत्पादन वाढले. मात्र, खालावणाऱ्या त्यांच्या गुणवत्तेकडे कुणीही लक्ष दिले नाही. शासनाच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे उत्पादकांचे उत्पन्नही जेमतेम राहिले. त्यासाठी तशी धोरणे व योजना अंमलात आणल्या गेल्या. याचा परिणाम जैवविविधता काही प्रमाणात नामशेष होण्यावरही झाला.
महाराष्ट्रात 15 वर्षांपासून दरवर्षी पावसाळ्यात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या 16 व्या वर्षी 33 जिल्ह्यातील 235 तालुक्यांमध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात पावसाळ्यात येणाऱ्या जवळपास 150 रानभाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. आरोग्यवर्धक असलेल्या पण दुर्मिळ होत चाललेल्या या रानमेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रानभाज्यांच्या उपयोगितेची शहरी मंडळींना ओळख व्हावी, राजमान्यता मिळून त्यांचा व्यापारी तत्वावर प्रचार प्रसार व्हावा, हा या महोत्सवामागचा राज्य शासनाचा मूळ उद्देश! या रानभाज्या नामशेष होण्यास शेतकरी जबाबदार असल्यास सूर आवळला जातो. यात कितपत सत्यता आहे? मोठी उपयोगिता असलेल्या या रानभाज्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी शासनाने आजवर कोणते प्रयत्न केले? रानभाज्या विक्रीतून उत्पादकांना किंवा त्या गोळा करणाऱ्यांना किती उत्पन्न मिळते?  यासह काही महत्त्वाच्या बाबी या महोत्सवाच्या निमित्ताने ऐरणीवर येतात.
शेती न करता किंवा निगा न राखता निसर्गत:च उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या/रानमेवा असे संबोधतात. जंगलात, माळरानात किंवा शेताच्या धुऱ्यावर (बांध) लागवड न करता या वनस्पती उगवतात. निसर्गत: या वनस्पतींमध्ये मानवी आरोग्याला आवश्यक असलेली खनिजे, महत्त्वाची अन्नद्रव्ये व अनेक औषधी गुणधर्म आढळून येत असल्याने अलीकडे या रानभाज्या लोकप्रिय होत आहेत. भारतात भाजीपाल्याच्या 55 विविध प्रजाती आहेत. वाढत्या मागणीमुळे उत्पादकता वाढविण्यासाठी यातील बहुतांश भाजीपाल्याच्या पिकांवर संशोधन करण्यात आले. यात रानभाज्या मात्र उपेक्षितच राहिल्या.
आदिवासींचे खाद्य
खरं तर, रानभाज्या या गरीब व आदिवासींचे खाद्य मानले जायचे. भारतात जंगली व डोंगराळ भागात राहणाऱ्य आदविासींच्या सुमारे 427 जमाती आहेत. यातील 47 जमाती महाराष्ट्रात वास्तव्याला आहेत. जगभरातील वनस्पतींच्या 32 लाख 83 हजार प्रजातींपैकी भारतीय आदिवासी 1,530 पेक्षा अधिक वनस्पतींचा खाण्यासाठी नियमित वापरतात. यात 145 कंद, 521 हिरव्या भाज्या, 101 फूलभाज्या, 647 फळभाज्या व 118 बियांचा समावेश आहे.
जैवविविधता नामशेष : जबाबदार कोण?
हरितक्रांती काळात धान्याच्या उत्पादन वाढीवर विशेष भर देण्यात आला. त्यासाठी हायब्रीड व संशोधित बियाणे व रासायनिक खतांच्या वापराची सक्ती करण्यात आली. रोग व किडींपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी कीटकनाशके व बुरशीनाशकांना तर मजुरांच्या तुटवड्यावर पर्याय म्हणून तणनाशकांना प्राधान्य देण्यात आले. अन्नधान्यानंतर भाजीपाल्यांच्या पिकांवर संशाधने करण्यात आली. या प्रक्रियेत धान्य, भाजीपाल्याचे उत्पादन वाढले. मात्र, खालावणाऱ्या त्यांच्या गुणवत्तेकडे कुणीही लक्ष दिले नाही. शासनाच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे उत्पादकांचे उत्पन्नही जेमतेम राहिले. त्यासाठी तशी धोरणे व योजना अंमलात आणल्या गेल्या. याचा परिणाम जैवविविधता काही प्रमाणात नामशेष होण्यावरही झाला. शासनाने उत्पादन वाढीचे श्रेय स्वत:कडे घेतले आणि जैवविविधता नष्ट होण्याचे खापर शेतकरी व उत्पादकांच्या माथी फोडले.
‘महाराष्ट्र जनुक कोश’  
या संपूर्ण प्रक्रियेत रानभाज्यांकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. जेव्हा खालावलेल्या गुणवत्तेचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसायला लागले, तेव्हा याच मंडळींना रानभाज्यांची आठवण झाली. या रानभाज्यांना राजाश्रय मिळावा व त्यांचा व्यापारी तत्वावर प्रचार प्रसार व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने डॉ. माधव गाडगीळ यांच्या पुढाकाराने ‘महाराष्ट्र जनुक कोश’ या प्रकल्पाची आखणी केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून विविध रानभाज्यांचे संकलन व दस्तावेजीकरणाच्या कामांना सुरुवात करण्यात आली. या कामात राज्य शासनाच्या कृषी व वन विभागाची मदत घेतली जात आहे. ‘बायफ’ ही संस्थाही यात कार्यरत आहे. यातून रानभाज्या महोत्सव ही संकल्पना पुढे आली आणि सन 2005 पासून राज्यभर रानभाज्या महोत्सवाला राज्य शासनाने सुरुवात केली.
महाराष्ट्रातील रानभाज्या
अनवे, अमरकंद, अळंबी (अळवे), अंबाडी, आंबुशी, आघाडा, आचकंद, आलिंग, उंबर, उळशाचा मोहर, कडकिंदा, कडूकंद, करटोली/कर्टोल/करटुली/काटोलं, कवदर, कवळी, काटेमाठ/काटेमाट, कुड्याची फुले, कुरडू, कुसरा, कुळू (कोळू), कोंबडा, कोरड, कोलासने (तालिमखाना), कोवळे बांबू (बांबूचे कोंब), केना, कोळू, कौला, कपाळफोडी, कवठ, खापरफुटी, गेंठा, गोमाठी, घोळ/घोळू/चिवई/चिवळी/चिवळी, चवळीचे बोके (नवीन उगवलेल्या चवळीच्या वेलाची टोकाकडची कोवळी पाने), चाई, चाईचा मोहर, चायवळ, चावा, चिचारडी, चिंचुरडा, चिवलाचे कोंब, टाकळा, टेंबरण, टेंभुर्णा, टेरा/टेहरा, तळची, तरोटा, तांदुळजा, तांबोळी, तेर अळू, तेल छत्र, तोंडे, दिघवडी, दिवा, देठा, धापा, धोपा, नारळी, पंदा, पाथरी/पातूर, पिपाना, पानांचा ओवा, पिंपळ, फांग, फांदा, फोडशी, बडकी, बडदा, बहावा, बेरसिंग, बोखरीचा मोहर, बोंडारा, भारंगी (भारिंगा), भुईपालक, भुईफोड, भुईआवळा, भोकर, लाल भोपळ्याच्या छोट्या वेलीची कोवळी पाने, भोपळ्याची फुले, भोपा, महाळूंग, मटारू, माठ, माड, मेके, मोखा/रानकंद मोखा, मोहदोडे (मोहा), रक्त कांचन, रताळ्याचे कोंब, रानकेळी, रानतोंडले, रानपुदाना, राक्षस, रुई, रुंखाळा, लोथी, लोधी, वांगोटी/वांघोटी/वाघाटी/वाघाटा, वाथरटे, सुरण, शेऊळ/शेवळा/शेवळे, शेवग्याची पाने, शेवग्याची फुले, शेवग्याच्या शेंगा, सतरा, सायर, सुरण, सुरणाचा कोवळा पाला, हरभऱ्याची कोवळी पाने, हळंदा, हादगा.
यातील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या रानभाज्यांचे संवर्धन कसे केले जाईल? सर्व रानभाज्यांची गुणवत्ता कायम ठेवून उत्पादकता कशी वाढेल? त्यांचा शेतीसाठी वापर करून उत्पादकांना चार पैसे अधिक कसे मिळतील? या मूलभूत बाबींवर शासन काहीही करायला तयार नाही. त्यामुळे संशोधनाविना असलेल्या या रानभाज्यांचा महोत्सवाचा उपयोग काय?
@ सुनील एम. चरपे
नागपूर – 24
संपर्क : 9765092529
मेल : sunil.charpe@gmail.com
Global Farming या ब्लॉगवरून साभार