कुठं गेली झड अन् ‘घोंगशी’

ललित ...शब्दलालित्य

दिवस बदलले़ गावरानी जाऊन ‘हायब्रिड’ आलं तशी ‘झड’ही लोप पावली़ आता ती दिसत नाही़ का कुणास माणसाला दुर्बुद्धी सुचली नि त्याने निर्सगावर मात करण्यास सुरुवात केली़ या सर्व प्रकारात स्वार्थ विजयी ठरला असला तरी त्याचे परिणाम आज दिसून येत आहे़ पावसाचे थेंब कमी झालेत़ आजच्या पिढीला ‘झड’ नावाची संकल्पना गावीही नाही़ पुस्तकातच तो शब्द वाचण्यात येतो़.

लेखक
संजय इस्तारी मुंदलकर  [ AUTHOR SANJAY MUNDALKAR] 

तीन ते चार दिवस पावसाची एकसारखी संततधार म्हणजे झड़ हा पाऊस मोठ्यानं कधीही कोसळत नाही़ मात्र, त्याची रिपरिप सुरू असते़ त्यामुळं शेतातली कामं बंद़ रस्त्यावर चिखलच चिखल! डोळ्याच्या कपारीतून शिवारभर पांढरं धुकंच धुक दिसून येते़ डवरणीची, निंदणीची सर्व काम ठप्प़ सगळा मजूरवर्ग घरीच असतो़ सुरुवातीला आरामदेह वाटणारी झड नंतर मात्र नकोशी वाटते़ ऐरवी कौलाकौलातून सकाळ, दुपारी निघणारा धूर सकाळपासून रात्री उशिरापर्यंंत पावसाच्या थेंबाथेंबाशी बिलगलेला असतो़ मजूर बायाबाप्ये गप्पाटप्पात रंगलेल्या दिसून येतात़ बिड्यांच्या धुराबरोबर गोष्टीचा फड रंगलेला असतो़ गावाच्या चौकातील एखाद्या हॉटेलमध्ये मैफल बसलेली असते़ कुणी भज्याची आर्डर दिलेली असते, तर कुणी चहाचा खर्च करणारा असतो़ एखादा म्हातारा जुन्या गोष्टीच्या पोतड्या उघडून दाखवितो़ तरणी पोरं त्याच्या गोष्टी कान टवकारून ऐकत असतात़ तो म्हातारा आपल्या हयातीमधील झडीच्या गोष्टी मोठ्या खुबीने सांगत ऐकणाºयांची उत्कंठा वाढवित असतो़ गावाला पुराचा वेढा, पाण्यातून वाहत गेलेले गुरंढोरं, बुडालेली पिकं, पुरातून वाहत जाणाºया व्यक्तीला कसे बाहेर काढले आदींचे वर्णन तो हातवाºयाच्या मदतीने किंवा उभे राहून, दंड थोपटून कथन करीत असतो़ त्या हॉटेलात पाय ठेवण्यास जागा कमी पडल्यास काहीजण ‘घोंगशी’ घेऊन उभे असतात़ ही ‘घोंगशी’ पोत्याची वरची एक बंद बाजू आत घालून तयार केलेली असते़ कुणी घोंगडी अंगावर घेऊन आलेला असतो़

काही शेतकरी दोघा तिघाच्या गटानं अंगावर ‘घोंगशी’ घेवून शिवारात गेलेली असतात़ संपूर्ण शिवार पांढºया तुषारी पावसात न्हाऊन निघालेलं असतं़ पºहाटीच्या, ज्वारीच्या ‘वई’त पाणीच पाणी भरलेलं असतं़ ते धुºयावरून पिकाच्या नुकसान-फायद्याचा अंदाज घेतात़ डवरणं किंवा निंदणाची काम किती दिवसांनंतर सुरू होतील, असा निशाणा लावत धुºयावरील गवतातून त्यांचा विळा भराभर चालत असतो़ मग डोक्यावरील ‘घोंगशी’वरच गवताचा भारा घेवून शेतातल्या पायवाटेतल्या चिखलातून त्यांचे पाय भराभर गावाकडे चालत निघतात़ एखाद्यावेळी पायात काटा रुतल्यास समोरच्याला हाक देत धुºयावर भारा ठेवत काटा काढण्यात येतो़ पायातून रगत निघाल्यानंतरही त्यांचे पाय गाव लगबगीने जवळ करीत असतात़ कारण न जाणो गावाशेजारच्या नाल्याला पूर आल्यास पंचाईत होण्याची शक्यता असते़

घरी आल्यावर गोठ्यातल्या ‘गोहानी’त थोडंथोडं गवत टाकण्यात येते़ पावसाची रिपरिप सुरू असल्यानं जनावरेही एकाच खुट्याला बांधलेली असतात़ शेणाचा सडा असतो़ मग घरधनी ओल्यावरची जनावरं कोरड्या जागेत बांधतो़ आता सांजवेळ झालेली असते़ चिल्टाईचा जोर वाढलेला असतो़ तोपर्यंत घरातल्या धुनी पुन्हा पेटलेली असते़ इकडं घरातलं एखादं पोट्टं दूध सरल्याचं सांगतो तेव्हा तो दुधाच्या खास बादलीत चर्चर् धारा काढत फक्कड चहा बनविण्यास बजावतो़ बाहेर रिपरिप सुरूच असत़े शाळालाही बुट्टी असल्यानं पोरंसोरं लहानशी ‘घोंगशी’ अंगावर चढवून चिखलातून नाचत असतात़ अशावेळी घरासमोरून एखादा दोस्त ‘घोंगशी’पांघरून जात असल्यास त्याला हाक देत चहा पिण्याचा आग्रह केला जातो़ मग घराच्या ‘वसरी’त बैठक मारत चहा पित झडीच्या, पिकाच्या गोष्टी सुरू होतात़ सोबत तंबाखू नाहीतर बिड्या फुंकण्यात येतात़ तोपर्यंत घरातले कंदिल पेटलेले असतात़ बाहेर अंधारून आलेलं असतं़ रातकिड्यांच्या किरकिरीला सुरुवात होते़ चिल्टही कानाभोवती पिंगा घालतात़ मग एखादा म्हातारा धग पेटवून त्यावर कडुलिंबाचा पाला टाकतो़ त्यातील धुरानं चिलटं,डास पळतात, असा समज असतो़

रात्री जेवणावळीला एखादा घरधनी आपल्या बापाला, आईला, बायकोला, लेकरांना पिकांची ‘कंडिशन’ सांगतो़ त्यावर सर्वांची मते घेतली जातात़ बाहेर थंडीने हुडहुडी चालविलेली असते़ मग ‘वसरी’त गोधड्या साथरल्या जातात़ मग गोष्टींची उतरण सुरू होते,तसा डोळा झाकत येतो़ झडीचा एक दिवस सरलेला असतो आणि ‘घोंगश्या’ दुसºया दिवसासाठी कोरड्या होण्यासाठी एखाद्या खुटीवर किंवा पºहाटी, तुºहाटीच्या कवट्यावर पहुडलेल्या असतात़

दिवस बदलले़ गावरानी जाऊन ‘हायब्रिड’ आलं तशी झडही लोप पावली़ आता झड दिसत नाही़ का कुणास माणसाला दुर्बुद्धी सुचली नि त्याने निर्सगावर मात करण्यास सुरुवात केली़ या सर्व प्रकारात स्वार्थ विजयी ठरला असला तरी त्याचे परिणाम आज दिसून येत आहे़ पावसाचे थेंब कमी झालेत़ आजच्या पिढीला ‘झड’ नावाची संकल्पना गावीही नाही़ पुस्तकातच तो शब्द वाचण्यात येतो़ त्या दिवसांतील धुरांची वलये गुंडाळून बसलीय़ शिवार आता पहिल्यासारखं भिजत नाही़…

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *