संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आवश्यक असणारी पूर्वतयारी करण्याच्या सूचना

आरोग्य राजधानी मुंबई
  • अधिष्ठातांनी अधिक सतर्क रहावे
  • लवकरच रिक्त पदे भरण्यात येणार
  • येत्या रविवारी वेबिनारमध्ये डॉक्टरांनी सहभागी व्हावे
  • लसीकरणावर भर द्यावा

मुंबई : देशातले वैद्यकीय तज्ज्ञ, टास्क फोर्सचे सदस्य यांनी राज्यात कोविडची तिसरी लाट [ CORONA THIRD WAVE ] येईल, अशी शक्यता वर्तविली असल्याने राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने सतर्क राहून आवश्यक असणारी पूर्वतयारी करावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी संबंधित अधिष्ठाता यांना दिल्या.

मंत्री अमित देशमुख [ Medical Education Minister Amit Deshmukh ] यांनी राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयातील सर्व अधिष्ठांताशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, उपसचिव संजय सुरवसे यांच्यासह सर्व शासकीय वैद्‌यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.

मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, कोविड विषाणूची तिसरी लाट येईल अशी शंका वर्तविण्यात येत असल्याने आपल्या सर्वांना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यामुळे शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याबाबत अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुगणालयाच्या अधिष्ठातांनी पुढील काही दिवस अधिक सजग राहून कोणताही निष्काळजीपणा होणार नाही याची काळजी घ्यावी.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या रविवारी कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉक्टरांसोबत आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत. या वेबिनारमध्ये विविध विषयातील तज्ज्ञ, टास्क फोर्सचे सदस्यही सहभागी होणार असून सर्व अधिष्ठाता यांच्यासह त्या-त्या महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी या वेबिनारमध्ये सहभागी व्हावे. याशिवाय जिल्ह्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी यांनाही सहभागी करुन घ्यावे.

सार्वजनिक खासगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन करून वैद्यकीय सुविधात वाढ करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे वैद्यकीय महाविद्यालांमध्ये चांगली गुंतवणूक आणि तज्ज्ञ मंडळी येण्यास मदत होणार आहे. सर्व अधिष्ठाता यांनी या फायदा आपल्या महाविद्यालयाला कसा होईल याचा अभ्यास करावा.

गेल्या जवळपास दीड वर्षांपासून कोविडमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. आता मात्र वर्ग 1 ते  वर्ग 4 मधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु असल्याने लवकरच नवीन भरती होणार आहे. वर्ग 1 आणि वर्ग 2 ची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तर वर्ग 3 ची भरती वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत होणार आहे. तर वर्ग 4 मधील पदे अधिष्ठाता यांना करार पध्दतीवर घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

येणाऱ्या काळात सर्व अधिष्ठाता यांनी सर्व महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सोईसुविधा,ऑक्सिजनची उपलब्धता, व्हेंटिलेटर्सची संख्या यांच्यासह तांत्रिक साहित्य तयार ठेवावे. रुगणालयात प्रत्यक्ष काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना संरक्षणात्मक साधने देण्याबरोबरच प्रत्येकाचे लसीकरण करुन घ्यावे. आपल्या सर्वांनाच महाराष्ट्र लवकरात लवकर कोविडमुक्त करावयाचा असून यासाठी राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी आपले योगदान द्यावे. यापुढील काळात आणखी दक्ष राहून रुग्णांची सर्व प्रकारची काळजी घेत कोविडविरोधातील युध्द जिंकण्यासाठी सज्ज व्हावे. येत्या काळातही राज्यातील अधिष्ठाता, डॉक्टर्स, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी आपले योगदान देतील अशी अपेक्षा यावेळी मंत्री श्री. देशमुख यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *