Home उपराजधानी नागपूर नागपुरातील अमृत प्रतिष्ठानचा 23 वा वर्धापन दिन साजरा, संगीत त्रिमूर्तीचा जयंती महोत्सव

नागपुरातील अमृत प्रतिष्ठानचा 23 वा वर्धापन दिन साजरा, संगीत त्रिमूर्तीचा जयंती महोत्सव

88

NAGPUR CULTURE : संगीत क्षेत्रातील त्रिमूर्ती संगीत कलानिधी दिवंगत पं. विष्णू नारायण भातखंडे, पद्मभूषण दिवंगत डॉ. श्रीकृष्ण नारायण रांजनकर आणि संगीताचार्य दिवंगत पं. अमृतराव निस्ताने यांचा जयंती महोत्सव आणि अमृत प्रतिष्ठानचा 23 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रख्यात संतूरवादक पं. वाल्मिकजी धांडे, अमृत प्रतिष्ठान अध्यक्ष मोहन निस्ताने, गायक-संगीतकार मोरेश्वर निस्ताने यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात तरुण प्रतिभावान कलाकार अथर्व नवसाळकर आणि श्रेयस नवासाळकर यांनी ‘संतूर’वर राग किरवानी सादर केला. श्रेयस नवासाळकर यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटातील ‘दिल की तपीश…’ गाणे संतूरवर सादर केले. अमोल उरकुडे यांनी तबल्यावर केलेली साथ उल्लेखनिय होती. अथर्व आणि श्रेयस या बंधूंनी सादर केलेले प्रभावी सादरीकरण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेले.

शास्त्रीय गायिका जयश्री चनेकर हणवंते यांनी अभोगी रागातील तीन तालातील बंदिश मध्यलयीत ‘पालना झुलावे नंदलाल…’ सादर केली. त्यांना तबल्यावर अमोल उरकुडे आणि हार्मोनियमवर श्रुती पांडवकर यांनी साथ दिली.
तसेच, प्रेक्षकांच्या आग्रहास्तव गायक मोरेश्वर निस्ताने [ SINGER MORESHVAR NISTANE ] , अंकिता टकले आणि श्रुती पांडवकर [ SHRUTI PANDAVKAR ]  यांनी सुगम संगीत गायन सादर केले. त्यांना आशिष तळवेकर आणि अमोल उरकुडे यांनी साथसंगत दिली.

कार्यक्रमाचे संचालन नागपूर आकाशवाणीचे उद्घोषक श्रद्धा भारद्वाज यांनी केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन निस्ताने यांनी कार्यक्रमात सहभागींचे आभार व्यक्त केले यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. विशेष म्हणजे या संपूर्ण संगीतसोहळ्याचे फेसबुकवरून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. अनेक संगीतप्रेमींनी कार्यक्रमाला आभासी पद्धतीने उपस्थिती दर्शवली.