सभागृहात २४ सदस्य आणि मंत्रिमंडळात केवळ ३ महिला मंत्री

राज-पाट

शिल्पा मुंदलकर

महाराष्ट्र सरकारमध्ये सध्या ३३ कॅबिनेट (मुख्यमंत्र्यासह) आणि १० राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मात्र, विधिमंडळात 24 सदस्य असूनही, मंत्रिमंडळात फक्त तीनच महिला आमदारांना संधी देण्यात आली आहे. (महायुतीच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे आणि विद्या ठाकूर यांना स्थान देण्यात आले होते.) विशेष म्हणजे यात शिवसेनेच्या एकाही महिला नेत्याचा समावेश नाही. काँग्रेसने दोन महिलांना मंत्रिमंडळात [ MAHARASHTRA MINISTRY ] संधी दिली आहे. तर, एका राष्ट्रवादीच्या महिला आमदाराचा समावेश आहे.
काँग्रेसकडून वर्षा गायकवाड (धारावी, मुंबई)आणि यशोमती ठाकूर (तिवसा, अमरावती) यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. यशोमती ठाकूर काँग्रेसचा विदर्भातील महत्त्वाचा आणि आक्रमक चेहरा आहे. वर्षा गायकवाड काँग्रेसच्या मुंबईतील महत्त्वाच्या आमदार मानल्या जातात. आघाडी सरकारमध्येही त्यांनी मंत्रिपद सांभाळले आहे. राष्ट्रवादीच्या प्रथमच आमदार झालेल्या अदिती सुनील तटकरे (श्रीवर्धन, रायगड) यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली. असे असले तरी मंत्रिमंडळातील संख्या पाहता महिला मंत्र्यांची संख्या नसल्यातच जमा आहे.
महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये सर्वाधिक महिला आमदारांची सध्या काँग्रेसमध्ये आहे. महाराष्ट्र विकास आघाडीतील काँग्रेसमध्ये ४४ महिला आमदारांपैकी
सुलभा खोडके (काँग्रेस-अमरावती), यशोमती ठाकूर (काँग्रेस-तिवसा), प्रतिभा धानोरकर (काँग्रेस-वरोरा), वर्षा गायकवाड (काँग्रेस-धारावी), प्रणिती शिंदे (काँग्रेस-सोलापूर मध्य) अशा पाच आमदार आहेत. त्यापैकी दोन महिलांना संधी देण्यात आली. राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांपैकी सुमनताई पाटील (राष्ट्रवादी-तासगाव-कवठेमहाकाळ) आणि अदिती तटकरे (राष्ट्रवादी-श्रीवर्धन)अशा दोन महिला आमदार आहेत. यात एका महिलेला राज्यमंत्रिपद बहाल करण्यात आले. तर, शिवसेनेच्या ५६ आमदारांपैकी यामिनी जाधव (शिवसेना-भायखळा) आणि लता सोनवणे (शिवसेना-चोपडा) अशा दोन महिला आमदार आहेत. मात्र, या पक्षाने एकाही महिला सदस्याचा समावेश केला नाही.
आॅक्टोबर २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक [ ASSEMBLY ELECTION 2019 ]  पार पडली. यंदा या निवडणुकीतून तरुणवर्गाला संधी मिळाली आणि ते निवडूनही आले. महिला उमेदवांराबद्दल बोलायचे झाल्यास यंदा विविध राजकीय पक्षांनी एकूण २३५ महिलांना आमदारकीची उमेदवारी दिली. एकूण ३,२३७ उमेदवारांपैकी हे प्रमाण ७.२५ टक्के आहे. यापैकी २४ महिला (८.३३ टक्के) उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीत जिंकून आल्या. मागील निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण वाढले आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत २० महिलांना यश मिळाले होते़़ तसेच, टक्केवारी ७़३ इतकी होती. याशिवाय २५ अपक्ष उमेदवारांनी आपले नशिब अजमावून पाहिले़ हीच संख्या मागील निवडणुकीत ३३ इतकी होती़ विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांनीही आपल्या पक्षासोबत बंडखोरी केल्याचे दिसून आले.
प्रणिती शिंदे काँग्रेस(सोलापूर), यामिनी जाधव शिवसेना (भायकुळा), सुमन आबा पाटील राष्ट्रवादी (तासगांव), मंदा म्हात्रे भाजप, (बेलापूर), माधुरी मिसाळ भाजप (पर्वती पुणे), मुक्ता टिळक भाजप (पुणे), मंजुळा गावित काँंग्रेस (साक्री), भारती लावेकर भाजप(वर्साेवा), सीमा हिरे भाजप(नाशिक), विद्या ठाकूर भाजप (गोरेगांव), देवयानी फरांदे भाजप (नाशिक), मोनिका राजळे भाजप (शेवगांव), लता सोनवणे शिवसेना(चोपडा जळगांव), वर्षा गायकवाड काँग्रेस (धारावी मुंबई), नमिता मुंदडा भाजप (केज बीड), अदिती तटकरे राष्ट्रवादी(श्रीवर्धन), श्वेता महाले भाजप (चिखली बुलडाणा), यशोमती ठाकूर काँग्रेस (तिवसा), प्रतिभा धानोरकर काँगे्रस (वरोरा), मेघना बोर्डीकर भाजप(जिंतूर), गीता जैन काँग्रेस(मीरा भायंदर), सरोज अहिरे राष्ट्रवादी(देवळाली नाशिक), सुलभा खोडके काँग्रेस (अमरावती), मनीषा चौधरी भाजप (दहिसर)आदींचा समावेश आहे.
लोकसंख्याच्या तुलनेचा विचार केला असता राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना महिलांचा विचारच केला नाही, जी काही उमेदवारी दिली, ती केवळ नाईलाजास्तव दिल्याचे दिसून आले. कारण तेच ते चेहरे पुढे आणले होते. यात नातेसंबंधांना प्राधान्य दिल्याने नवीन, सक्षम उमेदवारांचा शोध घेण्यात राजकीय पक्ष अपयशी ठरल्याची टीका राजकीय जाणकारांनी केली होती. एकीकडे बेटी बचाओ बेटी पढाओ, महिला सक्षमीकरणाचा घोशा लावायचा आणि दुसरीकडे प्रत्यक्ष वेळ आल्यास त्याकडे दुर्लक्ष करायचे, हा प्रकार अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे, हेही दुर्दैवच!
भारतीय राजकारणाने हे लक्षात घ्यावे की, सध्याची लोकसंख्या ही तरुणांची आहे, सळसळत्या उत्साहाची आहे़ या तरुणाईला राजकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल हवा आहे. आणि ही बाब राजकारणात खोलवर अर्थात सत्तेत आल्याशिवाय यशस्वी होणार नाही, हेही त्यांनी जाणले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात आता शिक्षित, प्रशासकीय नियोजनाच्या, दूरदृष्टीच्या तरुणांचा भरणा अधिक असावा, असे सूचवावे वाटते. भारतीय राजकारणाने महिलांना अन्य क्षेत्रासोबतच राजकीय क्षेत्र पूर्णपणे उघडे करून द्यावे. महिलांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष यासारख्या पदांची मागणी नव्हे, आग्रह धरावा. दिवंगत इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, दिवंगत केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या राजकीय चाणाक्षपणातून हेच दाखवून दिले आहे. प्रशासनावर त्यांची जोरदार पकड होती. त्यामुळे महिलावर्गाला प्रत्यक्ष निवडणूक, सत्तेतील भागीदारी आणि प्रशासकीय निर्णयप्रक्रियांतून दूर ठेवता कामा नये.
राज्याच्या निर्मितीपासूनच कमी स्थान
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून महिलांच्या प्रमाणाबाबत अवलोकन केल्यास अगदी यंदाच्या मंत्रिमंडळापर्यंत महिला मंत्र्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतपतच आहे. यात काही आजी माजी मंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. (काहींना देवाज्ञा झालेली आहे.) प्रतिभा पाटील, प्रभा राव, डॉ. प्रमिला टोपले, शांती नाईक, ताराबाई वर्तक, शालिनीताई पाटील, प्रमिला याज्ञिक, रजनी सातव, कमलाबाई अजमेरा, डॉ. ललिता राव, पार्वतीबाई मालगोंडा, यशोधरा बजाज, सेलिन डिसिल्वा, दमयंती देशभ्रतार, चंद्रिका केनिया, पुष्पाताई हिरे, निर्मला राजे भोसले, डॉ. सुशीला बलराज, शरत्चंद्रिका पाटील, डॉ. शालिनी बोरसे, वसुधा देशमुख आदींचा समावेश आहे. नंतरच्या काळात शोभाताई फडणवीस, सुलेखा कुंभारे, विद्या ठाकूर, पंकजा मुंडे, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर आदींना स्थान मिळाले़ यंदाच्या मंत्रिमंडळात अदिती तटकरे तरुण महिला चेहरा आहे.

Edited by : Shilpa Mundalkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *